पीटीआय, नवी दिल्ली

नवीन कार्यादेश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विक्रीतील अभूतपूर्व विस्तारामुळे देशातील सेवा क्षेत्राची कार्यगती मे महिन्यातील पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून सरलेल्या जूनमध्ये विस्तारली आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जून महिन्यात ६०.५ गुणांवर नोंदला गेला. मे महिन्यात तो ६०.२ गुणांवर नोंदण्यात आला होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते. सेवा क्षेत्रातील सुमारे ४०० कंपन्यांकडून प्रश्नावली भरून घेऊन हे मासिक सर्वेक्षण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>आयसीआयसीआय प्रु. एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंडात १६ जुलैपर्यंत गुंतवणूक खुली

भारताच्या सेवा क्षेत्रातील क्रियाकलापांच्या वाढीला जूनमध्ये वेग आला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही ठिकाणाहून नवीन कार्यादेशात वाढ झाली. यामुळे सेवा कंपन्यांनी ऑगस्ट २०२२ नंतरची सर्वाधिक जलद गतीने कर्मचारी संख्येत वाढ केली, असे एचएसबीसी इंडियाच्या भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या. वाढती मागणी आणि नवीन व्यवसायांचा विस्तार हे या वाढीचे मुख्य घटक राहिले. भारतीय सेवा प्रदात्यांद्वारे प्राप्त झालेल्या नवीन कार्यादेशात जूनमध्ये वाढ होत राहिली. आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिका, आखाती देश आणि अमेरिका यांसारख्या देशांतून नवीन कामे त्यांनी मिळविली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमतीच्या आघाडीवर, खाद्यपदार्थांवरील वाढता खर्च, इंधन आणि मजुरीच्या खर्चातील वाढीमुळे सेवा प्रदात्यांनी त्यांच्या सरासरी खर्चात मध्यम वाढ नोंदवली. महागाईचा वेग जूनमध्ये चार महिन्यांतील नीचांकावर राहिला आहे. उत्पादित सेवांची विक्रीदेखील कमी वेगाने वाढत आहे. मात्र येत्या १२ महिन्यांच्या कालावधीत व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये वाढ होईल अशी खात्री आहे, असा आशावाद सर्वेक्षणातील २३ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.

नवीन कार्यादेशांच्या परिणामी कंपन्यांना पहिल्या तिमाहीअखेर अतिरिक्त कर्मचारी भरती सुरू केली. ऑगस्ट २०२२ पासून कर्मचाऱ्यांची भरती जलद गतीने वाढत आली आहे. नवीन कामे पूर्ण करण्यासाठी हंगामी आणि कायमस्वरूपी कर्मचारी घेण्यात आले.- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया