मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांकडून सोन्याला जास्त पसंती दिली जात असले तरी, त्यांचा ओढा चांदीकडेही वाढू लागला असून, प्रत्यक्षात चांदीने सोन्यापेक्षा या वर्षात जास्त परतावा दिल्याचेही दिसून आले आहे. सोमवारी चांदीचा भाव १४ वर्षांतील उच्चांकी स्तर गाठणारा ठरला.
भारत हा जगातील सोन्यापाठोपाठ, चांदीचाही सर्वांत मोठा ग्राहक आहे. देशातील चांदीची गरज ही बहुतांश प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोमवारी चांदीचा भाव प्रति किलो १ लाख १४ हजार ८७५ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या उत्पादनात घट झाल्याने आगामी काळात तिचा भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून चांदीला मागणी वाढत आहे. चांदीच्या भावात गेल्या तीन महिन्यांत २१ टक्के वाढ झाली आहे. याच कालावधीत सोन्याच्या भावात केवळ ५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सोन्याच्या भावात ३४ टक्के वाढ झाली होती तर चांदीच्या भावातील वाढ २३ टक्के होती. आता हे चित्र बदलले असून, सोन्यापेक्षा चांदीच्या भावातील वाढ अधिक आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांकडून देखील चांदीला प्राधान्य दिले जात आहे.
गुंतवणूक आणि उद्योग या दोन्ही कारणांमुळे चांदीला मागणी वाढत आहे. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमधून चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असल्याने चांदीची मागणी उत्पादनापेक्षा जास्त वाढत आहे. सर्वसाधारपणे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदार त्यांच्याकडील नाणी, विटा अथवा एक्स्चेंज ट्रेडेड फंडांची (ईटीएफ) विक्री करतात. मात्र, यावेळी भाव उच्चांकी पातळीवर पोहोचूनही गुंतवणूकदार विक्री करताना दिसत नाहीत, अशी माहिती चांदी आयातदार आम्रपाली समूहाचे गुजरातचे मुख्याधिकारी चिराग ठक्कर यांनी दिली.
चांदीच्या ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) जूनमध्ये विक्रमी २०.०४ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या मे महिन्यात ही गुंतवणूक ८.५३ अब्ज रुपये होती. चांदीच्या ईटीएफमध्ये जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ३९.२५ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. याच तिमाहीत सोन्याच्या ईटीएफमध्ये २३.६७ अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. त्यामुळे या बाबतीतही चांदीने सोन्याला मागे टाकले आहे.