मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा कायम असून, त्या परिणामी सलग चौथ्या सत्रात नफावसुली झाल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी बुधवारी सुमारे १ टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६६७.५५ अंशांनी घसरून, ७५,५०२.९० पातळीवर स्थिरावला. सत्रात त्याने ७१५.९ अंश गमावत ७५,००० पातळीच्या खाली घसरून ७४,४५४.५५ ही दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली होती. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सेन्सेक्सने ७६,००९.६८ ही सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली होती. मात्र सत्रांतर्गत प्रचंड अस्थिरतेमुळे शुक्रवारपासून सलग चार सत्रांत निर्देशांकाचा बंद स्तर नकारात्मक राहात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८३.४५ अंशांची घसरण झाली आणि तो २२,७०४.७० पातळीवर स्थिरावला. सोमवारच्या सत्रात निफ्टीनेदेखील २३,१११.८० हे ऐतिहासिक शिखर गाठले होते.
हेही वाचा >>> पेटीएम-अदानींमध्ये हिस्सा खरेदीवर चर्चा सुरू नसल्याचा निर्वाळा
सेन्सेक्समध्ये, टेक महिंद्र, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिसच्या समभागात घसरण झाली. तर पॉवर ग्रिड, सन फार्मा, नेस्ले, आयटीसी आणि भारती एअरटेल यांचे यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.
येत्या आठवड्यात अमेरिकेतील उपभोगावरील खर्चाबाबत आकडेवारी जाहीर होणार असून तिचा महागाईच्या आकडेवारीवर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियातील ताजा कल पाहता, जगभरात चलनवाढीची चिंता अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. त्या परिणामी नजीकच्या काळात अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता धूसर होत चालली आहे. देशांतर्गत आघाडीवर वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या सुमार कामगिरीसह इतर क्षेत्रांमध्ये काहीसे निराशाजनक वातावरण आहे, असे मत निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्स ७५,५०२.९० -६६७.५५ (-०.८९%)
निफ्टी २२,७०४.७० -१८३.४५ (-०.९०%)
डॉलर ८३.३९ २१
तेल ८४.९४ ०.८८