पीटीआय, नवी दिल्ली
देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक सुझुकी मोटरसायकल इंडियाने हरियाणातील खारखोडा येथे नवीन उत्पादन प्रकल्पाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात १,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीकडून मंगळवारी सांगण्यात आले.
आयएमटी खारखोडा एचएसआयआयडीसी औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प १०० एकर जमिनीवर पसरलेला असून, पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७.५ लाख दुचाकींचे उत्पादन करण्याची त्याची क्षमता असेल. स्थानिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देत वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा प्रकल्प २०२७ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे भारतात सुझुकी मोटरसायकलची उत्पादन क्षमता आणखी वाढणार आहे.
नवीन प्रकल्प सुमारे २००० लोकांना रोजगार प्रदान करेल. शिवाय तो जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या आणि प्रदेशात रोजगार निर्माण करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, असे सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक केनिची उमेदा म्हणाले. कंपनीच्या गुरुग्राम (हरयाणा) येथील प्रकल्पातून दरसाल १३ लाख दुचाकींची निर्मिती केली जात आहे.