पुणे : टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सने स्वीडनमधील दिवाळखोर कंपनी ‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कम्पोनंट्स ग्रुप स्वीडन’ (आयएसी स्वीडन) ताब्यात घेण्याची सोमवारी घोषणा केली. सुमारे ८० कोटी डॉलरची वार्षिक उलाढाल असलेल्या आणि वाहन उद्योगासाठी इंटिरियर सिस्टीम्स आणि सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या संपादनाने टाटा ऑटोकॉम्पला युरोपीय बाजारात विस्तारास मदत मिळेल.

आयएसी स्वीडन ताब्यात घेतल्याने टाटा ऑटोकॉम्पचे प्रवासी व वाणिज्य वाहन क्षेत्रातील प्रमुख युरोपीयन वाहन निर्मित्यांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील आणि जागतिक बाजारपेठेतील विस्तार वाढणार आहे. टाटा ऑटोकॉम्पच्या निवेदनानुसार, आयएसी स्वीडन ताब्यात घेतल्याने तिचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल आणि तिच्या सध्याच्या ग्राहक संबंधांचाही फायदा होईल.

कंपनीला यातून महत्त्वपूर्ण संधी प्राप्त होतील आणि प्रगत उत्पादन क्षमतांचा फायदा होईल. हा व्यवहार युरोपीय नियामकांच्या मान्यतेनंतर पूर्णत्वास जाईल. दरम्यान, या व्यवहाराबाबतचे कोणतेही आर्थिक तपशील कंपनीने जाहीर केले नाहीत.

याबाबत टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, आयएसी स्वीडन ताब्यात घेणे हे आमच्या दीर्घकालीन जागतिक विस्ताराच्या दृष्टिकोनाशी सुसंगत पाऊल आहे. आयएसी स्वीडन ही उच्च-गुणवत्तेची इंटिरियर सोल्यूशन्स प्रदान करणारी कंपनी आहे. आम्ही नवोपक्रम व उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आयएसी स्वीडन ही उच्च गुणवत्ता मूल्य जपणारी कंपनी असून, तिच्या परंपरेचा आम्हाला भविष्यात फायदा होईल.