पुणे : टाटा ऑटोकॉम्पने स्कोडा समूहाशी रेल्वे प्रोपल्शन सिस्टीम आणि त्याच्याशी निगडित सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापित केला आहे. ही धोरणात्मक भागीदारी देशातील वाढत्या रेल्वे आणि मेट्रो वहनशीलता बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे.
टाटा ऑटोकॉम्प आणि स्कोडा या दोन्ही भागीदारांच्या संयुक्त मालकीची नवीन कंपनी मध्यम गतीच्या व प्रादेशिक रेल्वे गाड्या, मेट्रो व हलकी रेल्वे वाहने यासाठी कन्व्हर्टर्स, ड्राईव्ह्स आणि ऑक्सिलरी कन्व्हर्टर्स यांच्या निर्मिती करेल. या नवीन कंपनीची उत्पादन प्रक्रिया ही भारतावर केंद्रित असेल. या संयुक्त उपक्रमामध्ये काही कोटी युरोची गुंतवणूक करण्यात आली आहे.
याबाबत टाटा ऑटोकॉम्पचे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले, उच्च दर्जाच्या रेल्वे तंत्रज्ञानाचा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुरवठादार असलेल्या स्कोडा समूहाबरोबरची भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. या भागीदारीद्वारे आम्ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्रपोल्शन सिस्टीम आणि इतर सुटे भाग सादर करणार असून, यामुळे भारतीय रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रात आमचा विस्तार वाढेल.
टाटा ऑटोकॉम्पचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी मनोज कोल्हटकर म्हणाले, सार्वजनिक परिवहन उद्योगातील जागतिक पातळीवरील आघाडीच्या संस्थांपैकी एक असलेल्या स्कोडा समूहाशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी रेल्वे क्षेत्रातील कंपनीची उपस्थिती अधिक बळकट करेल. या माध्यमातून भारतीय रेल्वे तसेच मेट्रो विभागासाठी सुरक्षित व कार्यक्षम उपाययोजना सादर करण्यात योगदान दिले जाईल.