Tata Capital IPO News : टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टाटा कॅपिटलची सुमारे १७,००० कोटींची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची आशा आहे. रिझर्व्ह बँकेने समभाग सूचिबद्धतेसाठी मुदतवाढ दिल्यानंतर या बुहप्रतिक्षीत आयपीओ पुढील महिन्यात बाजारात पदार्पण करण्याची आशा आहे.

मध्यवर्ती बँकेने टाटा कॅपिटलला या यादी भांडवली बाजारात समभाग सूचिबद्ध करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. कंपनी १८ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनासह आयपीओच्या माध्यमातून २ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांचा निधी उभारू इच्छित आहे. एप्रिलमध्ये टाटा कॅपिटलने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला होता.  

ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाच्या सुमारे २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर टाटा कॅपिटलचा मोठा आयपीओ बाजारात धडकणार आहे. रिझर्व्ह बँकेने सूचिबद्धतेसाठी  ३० सप्टेंबरची वेळ दिली होती, मात्र प्रक्रियात्मक कारणांमुळे त्यांनी मुदतवाढ दिली आहे, असे या प्रकरणाशी निगडित असलेल्या सूत्रांची सांगितले. या एनएसडीएलच्या ४,००० कोटी रुपयांच्या आयपीओला देखील जुलैमध्ये आयपीओ बाजारात आणण्याआधी सेबीने चार महिन्यांपेक्षा अधिक मुदतवाढ दिली होती.

टाटा कॅपिटलने प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून सुमारे ४७.५८ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. त्यापैकी २३ कोटी नवीन समभागांची विक्री करण्याची शक्यता असून उर्वरित समभाग आंशिक समभाग विक्री अर्थात ‘ओएफएस’च्या माध्यमातून प्रवर्तक टाटा सन्सच्या हिश्शातून विकले जाण्याची शक्यता आहे. तसेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ३.५८ कोटी समभाग विक्री करेल.

सध्या, टाटा कॅपिटलमध्ये टाटा सन्सचा ८८.६ टक्के हिस्सा आहे, तर आयएफसीकडे १.८ टक्के हिस्सा आहे. या आयपीओद्वारे उभारण्यात आलेला निधी कंपनीच्या टियर-१ कॅपिटल बेसच्या वाढीसाठी वापरला जाईल, जेणेकरून भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण होतील, ज्यामध्ये पुढील कर्जे समाविष्ट आहेत. 

सुमारे दोन दशकांच्या अवधीनंतर आलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओनंतर, आता भांडवली बाजाराला आजमावणारी टाटा समुहातील दुसरी कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी केली, १,०४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो गेल्या वर्षीच्या ४७२ कोटी रुपयांपेक्षा दुप्पट राहिला आहे. एकूण उत्पन्न जून २०२४ च्या तिमाहीत ६,५५७ कोटी रुपयांवरून ७,६९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.