वृत्तसंस्था, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टीसीएसने सुमारे २८३ अब्ज डॉलरचा महसूल असलेल्या आयटी क्षेत्रात मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआय-चालित परिवर्तनामुळे आयटी क्षेत्रात अनेक सुधारणा होत आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने १२,००० हून अधिक नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याने एआयशी निगडित ट्रेंडची सुरुवात झाली आहे, ज्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत २८३ अब्ज डॉलरच्या क्षेत्रातून सुमारे पाच लाख नोकऱ्या कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एआय-संबंधित कामांचे वाढते कार्यादेश आणि त्यातुलनेत कर्मचाऱ्यांमधील कौशल्य विसंगतीमुळे टीसीएसने २ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला. ही खासगी क्षेत्रातील कंपनीकडून करण्यात येणार मोठी कर्मचारी कपात आहे. यामुळे टीसीएसमधील सुमारे १२,२०० मध्यम आणि वरिष्ठ श्रेणीतील कर्मचारी नोकऱ्या गमावतील. भारतात मध्यमवर्ग निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या उद्योगात मूलभूत कोडिंगपासून ते मॅन्युअल चाचणी आणि ग्राहक समर्थनापर्यंत सर्व गोष्टींसाठी एआयचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे.
मार्च २०२५ पर्यंत या क्षेत्राकडून ५६.७० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आणि भारताच्या जीडीपीमध्ये आयटी क्षेत्राचा ७ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करणारे मोठे क्षेत्र असल्याने त्याचा इतर क्षेत्रांवर होणार परिणाम मोठा आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, भारतातील बहुतेक अभियंत्यांना तंत्रज्ञानाने सामावून घेतले आहे, परंतु वाढत्या एआय वापरामुळे अधिक कार्यक्षमता निर्माण होत असल्याने आणि सध्याच्या अनेक कर्मचाऱ्यांनी ते नवीन कौशल्यांची आत्मसात केले नसल्याने बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे, असे या उद्योगातील दिग्गज, विश्लेषक आणि कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे.
सध्या भारतीय आयटी उद्योग एका मोठ्या संक्रमणाच्या मध्यभागी उभा आहे, यामुळे नवनवीन कौशल्य आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.भविष्यात आयटीमधील बहुतांश काम एआयआधारित असल्याने नोकर कपातीचा धोका कायम असल्याचा इशारा सिलिकॉन व्हॅलीस्थित कॉन्स्टेलेशन रिसर्चचे संस्थापक आणि अध्यक्ष रे वांग यांनी दिला आहे.
कोण नोकरी गमावू शकतात?
आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरी गमावण्याचा धोका असणाऱ्यांमध्ये पायाभूत सुविधा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. कमीत कमी तांत्रिक कौशल्य असलेले व्यवस्थापक, आयटीमधील टेस्टिंग आणि बग्स शोधणारे कर्मचारी, बेसिक तांत्रिक सपोर्ट देणारे कर्मचारी, नेटवर्क आणि सर्व्हरसंबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे. सुमारे ४००,००० ते ५००,००० कर्मचाऱ्यांना पुढील दोन ते तीन वर्षांत नोकरी गमवावी लागू शकते. कारण त्यांची कौशल्ये क्लायंटच्या मागण्यांशी जुळत नसल्याचे टेक मार्केट इंटेलिजेंस फर्म अनअर्थइन्साइटचे संस्थापक गौरव वासू म्हणाले. या नोकऱ्यांपैकी सुमारे ७० टक्के नोकऱ्या या ४-१२ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम करतील. यामुळे (टीसीएसमधील नोकर कपातीने निर्माण झालेली भीती) पर्यटन, लक्झरी शॉपिंगसंबंधित ग्राहकांच्या मागणीला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवाय रिअल इस्टेटसारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीलाही झळ बसेल.
टीसीएस, इन्फोसिस, एचसीएलटेक, टेक महिंद्र, विप्रो, एलटीआयमाइंडट्री आणि कॉग्निझंट एकत्रितपणे १३ ते २५ वर्षांचा अनुभव असलेल्या ४,३०,००० हून अधिक कामगारांना रोजगार देतात, असे स्टाफिंग फर्म एक्सफेनो सांगितले.