मुंबई : देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दमदार कामगिरीने जून तिमाहीच्या निकाल हंगामाची गुरुवारी उत्साहजनक सुरुवात झाली. सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ६ टक्क्यांच्या वाढीसह १२,७६० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत तिने १२,०४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
बाजार भांडवलानुसार, देशातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपनीच्या तिमाही महसुलात १.३ टक्क्यांची वाढ झाली असून, तो ६३,४३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी याच तिमाहीत तिचा महसूल ६२,६१३ कोटी रुपये होता. तर त्याआधीच्या म्हणजे जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात १.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यावेळी तो ६४,४७९ कोटी रुपये नोंदवला गेला होता.
टीसीएसने प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्याच्या समभागासाठी ११ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. येत्या ४ ऑगस्ट २०२५ भागधारकांच्या खात्यात लाभांश जमा केला जाणार आहे. लाभांश देयकासाठी लाभार्थ्यांची नोंद करण्यासाठी कंपनीने १६ जुलै २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
जागतिक स्तरावरील भू-राजकीय अनिश्चिततेमुळे एकंदर मागणीत घट झाली. मात्र सकारात्मक बाजू म्हणजे, सर्व नवीन सेवांमध्ये चांगली वाढ झाली. सरलेल्या तिमाहीत मोठे कार्यादेश प्राप्त झाले आहेत. सुमारे ९.४ अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. याआधीच्या चौथ्या तिमाहीत १२.२ अब्ज डॉलरचे कार्यादेश प्राप्त झाले होते. जून तिमाहीत दीर्घकालीन शाश्वत वाढीमध्ये गुंतवणूक सुरू ठेवली असून गतिमान वातावरणाशी जुळवून घेत स्थिर नफा मिळवला आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतीवासन म्हणाले
टीसीएसने एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत ६,०७१ कर्मचारी जोडले. यासह, ३० जून २०२५ पर्यंत टीसीएस कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ६,१३,०६९ होती. एआय कौशल्य प्राप्त असलेले कंपनीमध्ये १,१४,००० कर्मचारी कार्यरत आहेत. टीसीएसने दिलेल्या माहितीनुसार, आयटी सेवांमधील कर्मचारी घटण्याचा दर पहिल्या तिमाहीत १३.८ टक्क्यांपर्यंत वाढला, जो मागील तिमाहीत १३.३ टक्के होता.
गुरुवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग १.८० रुपयांच्या घसरणीसह ३,३८२ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १२.२३ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.