पीटीआय, नवी दिल्ली

सिंगापूरमधील सरकारी गुंतवणूक कंपनी ‘टेमासेक’कडून देशातील सर्वात मोठ्या खासगी रुग्णालयांच्या साखळीची मालकी असणाऱ्या मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेसमधील अतिरिक्त ४१ टक्के हिस्सा १६,३०० कोटी रुपयांना (२ अब्ज डॉलर) खरेदी केला जाणार आहे. यामुळे मणिपालमधील ‘टेमासेक’चा एकूण हिस्सा ५९ टक्क्यांवर जाईल. भारतीय आरोग्यनिगा क्षेत्रातील हा आजवरचा सर्वांत मोठा आर्थिक व्यवहार ठरणार आहे.

टेमासेक हा हिस्सा टीपीजी या कंपनीकडून, तसेच मणिपालचे संस्थापक रंजन पै यांच्या कुटुंबीयांकडून खरेदी करणार आहे. टेमासेक आणि टीपीजी या कंपन्यांनी सोमवारी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, दोन्ही कंपन्यांनी या व्यवहाराचे आर्थिक तपशील जाहीर केलेले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेमासेककडून मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेसमधील १६,३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भागभांडवली हिस्सा खरेदी केला जाणार आहे. मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेसचे मूल्य सध्या ४० हजार कोटी रुपये आहे. सध्या टेमासेककडे मणिपालचा ११ टक्के हिस्सा आहे. आता अतिरिक्त ४१ टक्के हिस्सा खरेदी केल्यानंतर टेमासेकचा एकूण हिस्सा ५९ टक्क्यांवर जाईल.

या व्यवहारात टीपीजी कंपनी ही मणिपालमधील संपूर्ण हिस्सा विकून बाहेर पडणार आहे. याचवेळी पै कुटुंबीय मात्र त्यांची हिस्सेदारी सध्याच्या ५० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आणणार आहेत. भारतातील सरकारी मालकीची गुंतवणूक कंपनी ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ)’कडूनही त्यांचा संपूर्ण हिस्सा टेमासेकला विकला जाणार आहे.मणिपालची देशभरात १६ शहरांत २९ रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांची ८,३०० खाटांची एकूण क्षमता आहे. मणिपालच्या रुग्णालयांचे मुख्यालय बंगळूरुमध्ये असून, दरवर्षी कंपनीच्या रुग्णालयांमध्ये ५० लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात.

मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेसमधील मोठा हिस्सा ‘टेमासेक’ ताब्यात घेत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणूक करताना दूरदृष्टी आणि सामाजिक जबाबदारीबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे.- रंजन पै, अध्यक्ष, मणिपाल समूह