पीटीआय, नवी दिल्ली
टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे पंतप्रधान नरेंद्र यांच्या भेटीसाठी पुढील आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर येत असून, कंपनीकडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे, अशी माहिती जाणकार सूत्रांनी बुधवारी दिली.
मस्क हे भारत दौऱ्यादरम्यान पुढील आठवड्यात सोमवारी (२२ एप्रिल) पंतप्रधान मोदी यांना भेटतील. त्यावेळी मस्क हे गुंतवणुकीची योजना जाहीर करतील. भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी वाहन बाजारपेठ असून, त्यात आता टेस्ला प्रवेश करणार आहे. टेस्लासाठी अमेरिका आणि चीन या मोठ्या बाजारपेठा आहेत. तेथे विक्री कमी झाल्याने मनुष्यबळात १० टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेस्लाने मुंबई आणि दिल्लीत नवीन दालनांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. कंपनीच्या बर्लिनमधील उत्पादन प्रकल्पात उजव्या बाजूला चालक आसन असलेल्या मोटारींचे उत्पादनही सुरू झाले आहे. तिथून भारतात मोटारी निर्यात केल्या जातील.
भारतात अद्याप विद्युत शक्तीवरील अर्थात ई-मोटारींची विक्री कमी आहे. सध्या देशातील ई-व्ही बाजारपेठ छोटी असून, त्यात टाटा मोटर्सचा सर्वाधिक हिस्सा आहे. देशात २०२३ मध्ये विक्री झालेल्या मोटारींमध्ये केवळ २ टक्के ई-व्ही होत्या. सरकारने २०२३० पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
हेही वाचा… Maharashtra News Live : ‘विरोधकांना बीड लोकसभेला उमेदवारही मिळत नव्हता’; पंकजा मुंडेंचा टोला
आयात शुल्कात कपातीमुळे निर्णय
मस्क यांनी गेली अनेक वर्षे भारतात आकारण्यात येणाऱ्या जास्त आयात शुल्काला विरोध केला होता. यात बदल व्हावा, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी घेतली होती. केंद्र सरकारने मार्च महिन्यात नवीन ई-व्ही धोरणात आयात शुल्क १०० टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणले आहे. देशात ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करून उत्पादन प्रकल्प सुरू करणाऱ्या मोटार निर्मिती कंपन्यांसाठी हे धोरण आहे. त्यामुळे टेस्लाकडून ही गुंतवणूक केली जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.