पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) मार्चमध्ये ४.९ टक्के वाढ नोंदविली. फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली असून, यासाठी खाणकाम क्षेत्रातील घसरण प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले.
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ फेब्रुवारी महिन्यात ५.६ टक्के होती. मार्चमध्ये त्यात घट होऊन ती ४.९ टक्क्यांवर आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही वाढ १.९ टक्के होती. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी निर्देशांकातील वाढ ५.८ टक्के नोंदविण्यात आली. आधीच्या वर्षात ही वाढ ५.२ टक्के होती.
हेही वाचा >>>इक्विटी फंडातील ओघ एप्रिलमध्ये चार महिन्यांतील नीचांकी; ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक वाढत जात एप्रिलमध्ये २० हजार कोटींवर
खाणकाम क्षेत्राच्या उत्पादनातील वाढ मार्चमध्ये १.२ टक्के नोंदविण्यात आली. ती गेल्या वर्षी मार्चमधील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा मोठी घसरण नोंदविण्यात आली. याचवेळी निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर मार्चमध्ये ५.२ टक्के असून, गेल्या वर्षी याच महिन्यात तो १.५ टक्के होता. वीजनिर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर मार्चमध्ये ८.६ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत तो १.६ टक्के होता.