वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील अतिश्रीमंतांकडून ६० टक्के संपत्तीची गुंतवणूक आलिशान घरे आणि सोन्यांत केली जात असल्याचे ‘बर्नस्टाईन’च्या ताज्या अहवालाने सोमवारी पुढे आणले. देशातील एकूण संपत्तीपैकी ६० टक्के आणि एकूण वित्तीय मालमत्तांपैकी ७० टक्के मालमत्ता ही वरच्या स्तरातील एक टक्के लोकांकडे एकवटली असल्याचे वास्तवही अहवालाने अधोरेखित केले.
जागतिक संशोधन संस्था ‘बर्नस्टाईन’च्या अहवालानुसार, देशातील घरगुती संपत्ती १९.६ लाख कोटी डॉलर आहे. त्यातील ११.६ लाख कोटी डॉलर म्हणजेच ५९ टक्के संपत्ती अतिश्रीमंतांच्या ताब्यात आहे. अतिश्रीमंतांमध्ये ३ कोटी डॉलरची संपत्ती असलेले अतिउच्च संपदा असणारे व्यक्ती (अल्ट्रा एचएनआय) आणि १० लाख डॉलरची संपत्ती असलेल्या धनाढ्यांचा समावेश आहे. देशातील एकूण कुटुंबांमध्ये अतिश्रीमंतांचे प्रमाण केवळ १ टक्का असून, त्यांचा देशातील एकूण घरगुती संपत्तीतील वाटा मात्र ६० टक्के आणि सेवायोग्य वित्तीय मालमत्तेतील वाटा ७० टक्के आहे.
अतिश्रीमंतांकडे असलेल्या ११.६ लाख कोटींच्या संपत्तीपैकी केवळ २.७ लाख कोटी डॉलरची वित्तीय मालमत्ता आहे. त्यात समभाग, म्युच्युअल फंड, विमा, बँक अथवा सरकारी ठेवींचा समावेश आहे. या संपत्तीचे व्यवस्थापन सक्रियपणे, शुल्काधारीत सल्ल्याने केले जाते. अन्य संपत्ती ८.९ लाख कोटी डॉलरची असून, त्यात घरे, सोने, प्रवर्तक हिस्सा, चलनी मालमत्ता यांचा समावेश आहे. ही संपत्ती बाह्य व्यक्तींद्वारे व्यवस्थापित केली जात नाही आणि सहजपणे स्थलांतरित करता येत नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उत्पन्न, संपत्तीच्या वाटपात मोठी दरी
देशात १.२ कोटी डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असलेले ३५ हजार अतिश्रीमंत आहेत. त्यांचे सरासरी उत्पन्न ४८ लाख डॉलर आहे. त्यांची सरासरी मालमत्ता ५.४ कोटी डॉलर असून, त्यातील २.४ कोटी डॉलर वित्तीय मालमत्ता आहे. देशाच्या एकूण वित्तीय मालमत्तेपैकी ४.५ लाख कोटी डॉलर म्हणजेच ७० टक्के वित्तीय मालमत्तेवर अतिश्रीमंतांचे नियंत्रण आहे. भारतात उत्पन्नातील तफावत वाढत असताना संपत्तीतील तफावतही अधिक प्रकर्षाने समोर येत आहे. देशातील एक टक्का जनता ४० टक्के उत्पन्न कमावते, तर उरलेल्या जनतेच्या वाट्याला अगदी छोटा हिस्सा येतो, असे ‘बर्नस्टाईन’चा अहवाल सांगतो.