मुंबई : उल्लू डिजिटल या समाजमाध्यम कंपनीने, प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) निधी उभारण्यासाठी मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अर्थात ‘बीएसई एसएमई’ मंचाकडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे. मसुदा प्रस्तावात दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून कंपनी सुमारे ६२.६ लाख समभागांची विक्री करणार असून, त्यायोगे १३५ ते १५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा तिचा मानस आहे.
या ‘आयपीओ’ला मंजुरी मिळाल्यास, ही आतापर्यंतची कोणाही एसएमई कंपनीकडून या माध्यमातून होणारी सर्वात मोठी भांडवल उभारणी ठरेल. याआधी स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटने ‘आयपीओ’च्या माध्यमातून एसएमई मंचावर १०५ कोटी रुपयांची आजवरची सर्वाधिक निधी उभारणी केली आहे. त्यापाठोपाठ आशका हॉस्पिटल्स १०१.६ कोटी रुपये, बावेजा स्टुडिओ ९७ कोटी रुपये, खजांची ज्वेलर्स ९७ कोटी रुपये आणि वाईज ट्रॅव्हल इंडिया ९४.७ कोटी रुपये या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उभारला आहे.
हेही वाचा >>> डिझेल आणि खनिज तेलावरील ‘विंडफॉल’ करात वाढ
उल्लू डिजिटल प्रा. लिमिटेडकडून ओटीटी मंच ‘उल्लू ॲप’ कार्यरत असून, कंपनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सामग्रीचे वितरण, प्रदर्शन, जाहिरात, विपणन आणि वितरण यामध्ये गुंतलेली आहे, ज्यात वेबमालिका, लघुपट आणि इतर काही कार्यक्रमांचादेखील समावेश आहे.
विभू अग्रवाल आणि त्यांची पत्नी मेघा अग्रवाल यांच्या मालकीची ही कंपनी असून झी एंटरटेनमेंट आणि शेमारू एंटरटेनमेंट यांसारख्या भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांसोबत तिची स्पर्धा आहे. कंपनी नवीन सामग्रीच्या निर्मितीसाठी ३० कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय शोच्या खरेदीसाठी २० कोटी रुपये आणि तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. तसेच कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांची रक्कम वापरली जाईल आणि उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.
विभू आणि मेघा अग्रवाल यांच्याकडे उल्लूमधील ९५ टक्के समभाग आहेत, उर्वरित ५ टक्के समभाग भागधारक झेनिथ मल्टी ट्रेडिंग डीएमसीसीकडे आहेत.