भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यांपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने एसआयपी नोंदणीकृत ग्राहकांसाठी यूपीआय ऑटोपे सुविधेचा प्रारंभ करत असल्याची आज महत्त्वपूर्ण घोषणा केली. मिरे अॅसेट म्युच्युअल फंड, केफिनटेक आणि बिलडेस्कद्वारे वित्तीय क्षेत्रातील यूपीआय ऑटोपे हा संयुक्तपणे विकसित केलेला उपक्रम आहे. या उपक्रमामुळे मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांना यूपीआय ऑटोपे वैशिष्टांचा वापर करून आपल्या एसआयपीची नोंदणी करण्यास मदत होते आणि त्यामुळे गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होऊन गुंतवणूक प्रक्रिया आणखी सुलभ व सहजसोपी झाली आहे. नवीन उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा परिपूर्ण अनुभव मिळत आहे.
यूपीआय ऑटोपे पद्धत गुंतवणूकदारांना त्यांची आवर्ती नियमित गुंतवणूक योजना अर्थात एसआयपीची रक्कम भरण्याची पद्धत स्वयंचलित करण्याची परवानगी देते. एका विशिष्ट तारखेला ग्राहकाच्या बँक खात्यातून एसआयपीची रक्कम आपोआप काढून घेतली जाईल. मिरे अॅसेट म्युच्युअल फंड यूपीआय ऑटोपे सुविधा गुंतवणूकदाराना बँक खात्यातून त्यांच्या इच्छित मिरे मालमत्ता म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी समस्यामुक्त अशा मासिक कपात पद्धतीसाठी सक्षम करते. या नवीन सुविधेमुळे गुंतवणूक प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि शिस्तबद्ध झाली आहे. यूपीआय ऑटोपे पद्धतीला सहाय्य करणारे सर्व यूपीआय अॅप्लिकेशन वापरून गुंतवणूकदार आता आवर्ती ई-आदेश म्हणजेच आज्ञावली जारी करू शकतात.
मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाची यूपीआय ऑटोपे सेवा प्रत्यक्ष वेळेनुरूप अर्थात रिअल टाइम एसआयपीच्या गुंतवणूकीचा आदेश कार्यान्वित करुन गुंतवणूकदारांना आणखी सक्षम करते. पेमेंट पद्धत म्हणून यूपीआयचे व्यापक स्वरुप लक्षात घेता, प्रचंड संख्येतील ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या एसआयपी सुविधेचे नवे दालन ही सेवा विश्वासार्ह आणि सोयीस्कर पद्धतीने खुले करत आहे. मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लिमिटेडच्या प्रॉडक्टस्, मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख श्रीनिवास खानोलकर नवीन सेवेबद्दल बोलताना म्हणाले, “मिरे अॅसेटमध्ये आमच्या प्रमुख तत्त्वांपैकी एक म्हणजे ग्राहकाला प्रथम प्राधान्य या दृष्टिकोनानुसार आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना कार्यक्षम सुविधा सादर करण्यावर नेहमीच भर दिलेला आहे. यूपीआयने पेमेंट क्षेत्रामध्ये आधीच क्रांती घडवली आहे. यूपीआय ऑटोपेसह आम्ही एक नवीन सुविधा ग्राहकांना सादर करत आहोत आणि त्यात एसआयपी पद्धतीमध्ये क्रांती करण्याची क्षमता आहे. या सुविधेमुळे आमच्या गुंतवणुकदारांना त्यांच्या एसआयपी आज्ञावली नोंदणीसाठी यूपीआय ऑटोपे हे प्राधान्य माध्यम म्हणून स्वीकारण्यात मदत होईल, याची आम्हाला खात्री आहे.”
एनपीसीआयने निर्धारित केलेल्या सध्याच्या मर्यादेनुसार, १५ हजार रुपयांपर्यंतची (पंधरा हजार) गुंतवणूक आज्ञावली यूपीआय ऑटोपे वापरून तयार केली जाऊ शकते. अॅम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार (३० सप्टेंबर २०२३), एसआयपी हप्त्याची सरासरी रक्कम २२५० रुपयांवर पोहोचली आहे. (म्युच्युअल फंड क्षेत्रात दरमहा १६ हजार ०४२ कोटी रुपये गुंतवणूक होत असून, एसआयपीची एकूण खाती ७.१२ कोटींवर पोहोचली आहेत.) भारतात डिजिटल पेमेंट्सचा प्रवेश होत असताना मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय ऑटोपे) व्यवहारांचे उद्दिष्ट दरमहा विक्रमी उच्चांक प्रस्थापित करणे हे आहे.