वृत्तसंस्था, पीटीआय

जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने अमेरिकेचे सार्वभौम पतमानांकन ‘एएए’वरून ‘एए प्लस’पर्यंत खाली आणले आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेवरील प्रचंड मोठे सार्वजनिक कर्ज, कमजोर वित्तीय क्षेत्र, अडखळलेल्या स्थितीत असलेल्या काही संरचनात्मक सुधारणा यासारख्या नकारात्मक घटकांमुळे ‘फिच रेटिंग्ज’ने पतमानांकन खाली आणले आहे.

वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, सरकारच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेमुळे २०११ मध्ये स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबल रेटिंग्सने देखील पतमानांकन कमी केले होते. त्यावेळी अमेरिकी राजकोषीय कर्जफेडीचा खर्च १.३ अब्ज डॉलरने वाढला होता. मे महिन्याच्या सुरुवातीला, ‘फिच’ने अमेरिकी सार्वभौम पतमानांकन ‘रेटिंग वॉच निगेटिव्ह’ या श्रेणीत हलवताना, आगामी काळात पतमानांकन खाली आणण्याचा इशारा दिला होता.

अमेरिकी अर्थव्यवस्थेत बहुविध आर्थिक धक्क्यांसह कर कपात आणि नवीन खर्चाच्या तरतुदीमुळे अर्थसंकल्पीय तूट वाढली आहे. तसेच फिचच्या अहवालात गेल्या २० वर्षांमध्ये प्रशासनाच्या मानकांमध्ये सातत्याने होणारी घसरण या घटकांना नमूद करण्यात आले आहे आणि राजकीय फायद्यासाठी पुन्हा पुन्हा कर्ज-मर्यादा वाढविण्याच्या घटनांमुळे वित्तीय व्यवस्थापनावरील विश्वास ढळत चालला आहे, असेही अहवालाने म्हटले आहे.

देशाच्या झपाट्याने वाढणाऱ्या कर्जाचा बोजा २०२५ पर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ११८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो ३९.३ टक्क्यांच्या ‘एएए’ मध्यकापेक्षा अडीच पट अधिक असेल. ‘कर्जाचे जीडीपी’शी गुणोत्तर दीर्घ कालावधीत वाढत जाईल, ज्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेची भविष्यातील आर्थिक बाह्य धक्के सहन करण्याची क्षमता क्षीण होईल. पतमानांकन कमी करणे हे अर्थव्यवस्थेतील दीर्घावधीसाठी अनिश्चिततेचा दृष्टिकोनालाच दर्शविणारे आहे, असे अहवालाचे निरीक्षण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकी सरकार असहमत

अपेक्षेप्रमाणे, व्हाइट हाऊस आणि अमेरिकी अर्थमंत्रालयाने ‘फिच रेटिंग्ज’कडून सार्वभौम पतमानांकनात केलेल्या घसरणीवर टीका केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात घसरणीला भरून काढणारी सुधारणा विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने मजबूत फेरउभारीला दर्शविले आहे, असे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिवांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.