मुंबई : अदानी समूहासमोरील अडचणी कायम असून मंगळवारच्या सत्रात अदानी पोर्ट्स, एनडीटीव्ही आणि अदानी एनर्जी या समूहातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी भारतात इराणमधून एलपीजी गॅस आयात केला काय याची चौकशी अमेरिकेकडून केली जात असल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सोमवारी दिले. अदानी समूहाने मात्र हे वृत्त फेटाळले असून हा आरोप पूर्णपणे निराधार आणि चुकीचा असल्याचे म्हटले असले तरी मंगळवारी त्याचे बाजारात नकारात्मक पडसाद उमटले.
अदानी समूहाच्या मुंद्रा बंदरामार्गे इराणमधून एलपीजी भारतात आयात झाला आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकी अधिकारी करत आहेत. काही टँकर नियमितपणे मुंद्रा आणि पर्शियन गल्फ आखातादरम्यान ये-जा करत होते. या टँकरच्या हालचालींवरून असे दिसून आले की ते निर्बंधांचे उल्लंघन करत आहेत, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात म्हटले आहे. तथापि इराणमधून येणारे जहाज अथवा इराणी मालकीचा कोणताही माल देशातील आपल्या कोणत्याही बंदरांवर आले नाही. तसेच अमेरिकेकडून इराणवर लादण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन झाले नसल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी भांडवली बाजारात अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांना विक्रीचा फटका बसला. अदानी पोर्ट्सचा समभाग २.३७ टक्क्यांनी घसरून १४३२.३० रुपयांवर बंद झाला. एनडीटीव्ही २.३५ टक्क्यांनी घसरून १६२.३५ रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्स २.०६ टक्क्यांनी घसरून ८५६.५५ रुपये आणि अदानी पॉवरचा समभाग १.८९ टक्क्यांनी घसरून ५४४.०८ रुपयांवर, तर अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १.८९ टक्क्यांनी घसरला.
अदानी टोटल गॅस १.६२ टक्क्यांनी, अदानी ग्रीन १.५८ टक्क्यांनी, सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड १.१६ टक्के, अंबुजा सिमेंट ०.८८ टक्के, एसीसी ०.२२ टक्के आणि एडब्ल्यूएल ॲग्री बिझनेस ०.०६ टक्के घसरला.