पीटीआय, नवी दिल्ली : भाजीपाल्यासह खाद्यवस्तूंची महागाई तात्पुरत्या स्वरूपाची असून, नवीन पीक हंगामातील माल बाजारात आल्यानंतर किमती कमी होतील, असे केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी नमूद करतानाच, जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि देशांतर्गत पातळीवरील उलथापालथ यामुळे आगामी महिन्यात महागाई कायम राहील, असा इशाराही दिला.

अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या जुलै महिन्याच्या आर्थिक पुनर्वेध अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत क्रयशक्ती आणि गुंतवणुकीची मागणी यातील वाढ कायम राहणे अपेक्षित आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षांत भांडवली खर्चात वाढ केली असून, यामुळे खासगी गुंतवणुकीला प्रमाण मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली आहे. जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.४४ टक्क्यांवर नोंदविला गेला. ही या दराची मागील १५ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. विशेषत: खाद्यवस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. डाळी, तृणधान्ये आणि भाज्यांच्या किमती मागील वर्षांच्या तुलनेत दोन अंकी प्रमाणात कडाडल्याचे दिसून आले आहे.

खाद्यवस्तूंची महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. नवीन माल बाजारात दाखल झाल्यानंतर त्यांच्या किमती कमी होतील. लवकरच बाजारात खाद्यवस्तूंचे भाव कमी झालेले पाहायला मिळतील. खाद्यवस्तूंची महागाई तात्पुरत्या स्वरूपाची आहे. मात्र बेभरवशाच्या बनलेल्या बाह्य स्थितीमुळे आगामी काही महिन्यांत महागाईचा ताण आणखी वाढू शकतो, ज्यामुळे सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेला बदलत्या स्थितीबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे अहवालात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोमॅटो ऑगस्टअखेर स्वस्त?

टोमॅटोचे भाव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कमी होतील. कारण त्या वेळी नवीन माल बाजारात येईल. तूर डाळीची आयात वाढविण्यात आली असून, त्यामुळे डाळींची महागाई कमी होण्यास मदत झाली आहे. याचबरोबर सरकारने उचललेल्या काही पावलांमुळे आगामी काळात खाद्यवस्तूंची महागाई कमी झालेली दिसेल, असे अर्थमंत्रालयाच्या मासिक अहवालाने नमूद केले आहे.