पीटीआय, नवी दिल्ली

बाजारातील आव्हानात्मक वातावरणातही, मारुती सुझुकी इंडिया आणि महिंद्र अँड महिंद्रने वाहन विक्रीचा वेग कायम राखला आहे. तर या वाहन विक्री स्पर्धेत टाटा मोटर्स आणि ह्युंदाईची पीछेहाट झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्स यांनी गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थान मिळवले आहे. तर दीर्घकाळ दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी वाहन विक्रेता कंपनी राहिलेली ह्युंदाई मोटर चौथ्या स्थानावर ढकलली गेली आहे.

मारुती सुझुकीने एकूण देशांतर्गत प्रवासी वाहन १ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यांनी १.३८ लाख वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी १.३७ लाख वाहनांची विक्री झाली होती. बाजारपेठेतील आव्हानात्मक वातावरण आणि कोणतेही नवीन वाहन सादर न होता, कामगिरी चांगली राखण्यात यशस्वी झालो आहोत, असे एमएसआयचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन आणि विक्री) पार्थो बॅनर्जी म्हणाले.

महिंद्र अँड महिंद्रने एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारात त्यांच्या युटिलिटी वाहनांच्या विक्रीत २८ टक्क्यांनी वाढ नोंदवली आणि ५२,३३० वाहनांची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४१,००८ वाहनांवर मर्यादित होती. दुसरीकडे टाटा मोटर्सने देशांतर्गत बाजारात ईव्हीसह प्रवासी वाहनांच्या विक्रीत ६ टक्क्यांनी घट नोंदवली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४७,८८३ वाहने राहिली होती. ह्युंदाईच्या वाहन विक्रीमध्ये १२ टक्क्यांची घट झाली आहे, एप्रिलमध्ये वितरकांना ४४,३७४ वाहने पाठवली आहेत, जी गेल्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये ५०,२०१ वाहने वितरकांकडे धाडली होती. ‘मेक इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड’ या धोरणाच्या माध्यमातून, कंपनीच्या निर्यातीवर भर देत आहोत, असे ह्युंदाई मोटर इंडियाचे तरुण गर्ग म्हणाले.

किआ इंडियाने एप्रिल २०२४ मध्ये वितरकांना २३,६२३ वाहने पाठवली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर एप्रिल महिन्यात ३३ टक्के वाढ नोंदवून २७,३२४ वाहनांची विक्री केली.