मुंबई: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे स्वत: जातीने चीनमधील कंपन्यांसोबत भागीदारीची चर्चा करीत आहेत, असे वृत्त होते. यासंबंधाने अदानी समूहाने भांडवली बाजाराला वास्तविक माहिती देणारे खुलासेवार निवेदन सोमवारी दिले. जागतिक स्तरावर टेस्लाची स्पर्धक असलेल्या चीनच्या बीवायडी या कंपनीसोबत बॅटरी उत्पादन आणि स्वच्छ इंधन तंत्रज्ञानासाठी भागीदारीचा कोणताही इरादा नसल्याचे आणि उभयतांमध्ये कोणतेही सख्य जुळणार नसल्याचा खुलासा अदानी समूहाकडून सोमवारी करण्यात आला.

समूहाने स्पष्ट केले आहे की, चीनमधील बीवायडी आणि बीजिंग वीलायन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी या कंपन्यांसोबत भागीदारी करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णत: चुकीचे आहे. भारतात बॅटरी उत्पादनासाठी बीवायडी कंपनीसोबत भागीदारीची आमच्याकडून कोणतीही चर्चा सुरू नाही. याचवेळी बीजिंग वीलायन न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कंपनीसोबतही भागीदारीबाबत चर्चा करण्यात आलेली नाही.

सौर पॅनल ते पवन ऊर्जा उपकरणे निर्मिती आणि हरित हायड्रोजन अशा स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात अदानी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सौर पॅनल निर्मिती क्षेत्राची १० गिगावॉटची वार्षिक क्षमता गाठण्याचे समूहाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. याचबरोबर समूहाकडून नजीकच्या काळात पवनऊर्जा उपकरण निर्मिती क्षमता दुपटीने वाढवून वार्षिक ५ गिगावॉटवर नेण्यात येणार आहे. तसेच, समूहाकडून हरित हायड्रोजन निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रोलायजरची निर्मिती सुविधा सुरू केली जाणार आहे. या नियोजित प्रकल्पांवर सध्या समूहाचे लक्ष केंद्रीत असल्याचे सांगणयात आले.

बीवायडी काय आहे?

बीवायडी ही सध्या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. या चिनी कंपनीने अमेरिकी एलॉन मस्क यांच्या टेस्लासारख्या कंपनीला देखील कडवे आव्हान निर्माण केले आहे. ‘बिल्ड युवर ड्रीम्स’ (Build Your Dreams) हे ब्रीदवाक्य आणि त्याच्याच आद्याक्षरापासून तिने बीवायडी हे नावही धारण केले. १९९५ मध्ये बॅटरी उत्पादक म्हणून सुरुवात करून, बीवायडीने विशेषत: इलेक्ट्रिक वाहन आणि त्याच्याशी संलग्न तंत्रज्ञान उत्पादनांमध्ये मोठे यश मिळवले आहे. भारतातही सरकारच्या नव्या ई-व्ही धोरणाला अनुसरून, बीवायडीने उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, दक्षिणेतील राज्यातील प्रकल्पासाठी जागेची चाचपणीही सुरू केल्याचे वृत्त आहे.