पीटीआय, नवी दिल्ली
देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांचे एकूण वेतनमान दुप्पट झाले असून, ते आता सुमारे १३.७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास पालिया यांचे वेतन ५३.६४ कोटी रुपये आहे. त्यातुलनेत अध्यक्षांचे वेतन निम्म्याहून कमी आहे.
प्रेमजी यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोणतेही मानधन, भत्ते घेतले नाहीत. कारण कंपनीचा वर्षभरातील वाढीव एकत्रित निव्वळ नफा नकारात्मक होता. त्यांनी त्यांच्या वेतनात सुमारे २० टक्के कपात करत ६.४ कोटी रुपयेच कंपनीकडून घेतले. मात्र, २०२४-२५ या आर्थिक वर्षात, बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या विप्रोचा निव्वळ नफा १८.९ टक्क्यांनी वाढून १३,१३५.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी रिशाद यांचे एकत्रित वेतनमान सुमारे १३.७ कोटी रुपये झाले, जे आर्थिक वर्ष २०२४ मधील ६.४ कोटी रुपयांच्या तुलनेत दुप्पट झाले आहे.
तथापि ७ एप्रिल २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची भूमिका स्वीकारणाऱ्या श्रीनिवास पालिया यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकूण सुमारे ५३.६४ कोटी रुपये वेतनरूपात मिळाले आहेत. तरीही पालिया यांचे एकूण वेतनमान हे विप्रोचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी डेलापोर्ट यांनी दिल्या गेलेल्या एकूण मेहनतान्यापेक्षा निम्म्याहून कमी आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुमारे १६८ कोटी रुपये वेतनरूपाने मिळाले होते.