मुंबईः खाद्यपदार्थांच्या वितरणाचा ऑनलाइन मंच असणाऱ्या झोमॅटो आणि स्विगी यांनी त्याच्या जाळ्यामार्फत स्वतःच्या खाद्यपदार्थांची विक्री सुरू करून, स्पर्धेच्या नियमांचा भंग करणारी अनुचित प्रथा अनुसरल्याबद्दल, रोष व्यक्त करतानाच, त्यांच्यावर कारवाईची मागणी ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन्स ऑफ इंडिया’ने (एफएचआरएआय) सोमवारी केली.

हॉटेल व्यावसायिकांच्या या संघटनेचे म्हणणे असे की, झोमॅटो आणि स्विगी यांचे स्वरूप हे रेस्टॉरन्ट आणि ग्राहकांना जोडणारा मंच या धाटणीचे सुरुवातीला होते. आता त्यांनी स्वत:च खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. या कंपन्यांनी स्वत:ची उत्पादने आणली आहेत. बाजारपेठेतील वर्चस्वाचा वापर करून या कंपन्या आता थेट रेस्टॉरन्टशी स्पर्धा करू लागल्या आहेत. रेस्टॉरन्टची विदा वापरून या कंपन्या ग्राहकांना विविध सवलती देण्यासारख्या अनुचित प्रथा त्या वापरतात. यामुळे रेस्टॉरन्ट व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

हेही वाचा >>> रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी

आक्षेप काय?

झोमॅटो आणि स्विगी कंपन्यांकडून त्यांच्या उत्पादनांची विक्री सुरू असली तर त्यांना या संबंधाने मिळालेल्या मंजुरीबाबत स्पष्टता नाही. यामुळे या खाद्यपदार्थांची सुरक्षितता आणि गुणवत्ता यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. झोमॅटो आणि स्विगीकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे रेस्टॉरन्टचे नुकसान होत आहे. याचा परिणाम छोट्या व मध्यम आकाराच्या रेस्टॉरन्ट चालकांच्या जीवितावर होत आहे, असे एफएचआरएआयने नमूद केले आहे.

हेही वाचा >>> चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपांवर झोमॅटोचे उत्तर काय?

एफएचआरएआयच्या आरोपांबाबत झोमॅटोची उपकंपनी ब्लिंकइटचे मुख्याधिकारी अलबिंदर धिंडसा म्हणाले की, झोमॅटोकडून आपल्या खासगी उत्पादनांची विक्री स्वत:च्या मोबाईल ॲपवरून केली जाणार नाही. आम्ही आमच्याच मंचावर रेस्टॉरन्टशी स्पर्धा करणार नाही. ब्लिंकइटकडून १० मिनिटांत खाद्यवस्तू वितरण करणारी बिस्ट्रो सेवा सुरू आहे. त्याचे संचालनही स्वतंत्र मोबाईल ॲपद्वारे सुरू आहे. या सेवेचाही झोमॅटोकडून वापर केला जात नाही असे नमूद करत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.