मुंबई: घरादाराची सुरक्षा म्हणजे गोदरेज कुलूप असे समीकरण बनून गेलेल्या आणि तब्बल सव्वाशे वर्षांचा वारसा लाभलेल्या गोदरेज समूहाला आता नव्या युगाला साजेशा आधुनिक डिजिटल कुलपांच्या श्रेणीत मोठी व्यवसाय संधी दिसून येत आहे. सध्या पाच टक्क्यांखाली असलेली ही कुलपांची श्रेणी उच्च दुहेरी अंकातील वाढीसह तीन वर्षांत १० टक्क्यांहून अधिक वाटा मिळवेल आणि एकूण उलाढालीत १०० कोटी रुपयांचे योगदान देईल, असा विश्वास गोदरेज लॉक्स ॲण्ड आर्किटेक्चरल फिटिंग्ज, सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी यांनी व्यक्त केला.

पुढील काही वर्षे अगदी ३५ ते ४० टक्के अशा उच्च दुहेरी अंकातील वाढ डिजिटल कुलपांच्या श्रेणीत दिसून येईल, तर येत्या तीन वर्षांत स्वीकृती आणि नवनवीन उत्पादनांच्या विस्तारासह, डिजिटल कुलूप विभागाचा वाटा एकूण श्रेणीच्या १० टक्क्यांहून अधिक असेल, असे ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना श्याम मोटवानी म्हणाले. सर्वोत्तम वास्तुरचना आणि भविष्यावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांचा गौरव करणाऱ्या दुसऱ्या ‘जीवीज्’ पुरस्काराच्या पूर्वसंध्येला गोव्यात आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी हा संवाद साधला. गोदरेज लॉक्सची गोव्यात दोन, तर या राज्याच्या सीमेला लागून महाराष्ट्रात कुडाळ येथे तिसरा उत्पादन प्रकल्प सध्या कार्यरत आहे.

भारतात २०२२ अखेर स्मार्ट दरवाजांसाठी डिजिटल कुलपांची बाजारपेठ साधारण २०० कोटी रुपयांच्या घरात असून, २०३० पर्यंत या बाजारपेठेचा चारपटीने विस्तार होण्याची अपेक्षा आहे. किमतीबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर मोटवानी म्हणाले, ग्राहकांचा पसंतिक्रम, निवड आणि विश्वासार्ह डिजिटल डोअर लॉकिंग सोल्यूशनसाठी ते देण्यास तयार असलेली किंमत समजून घेण्यावर कंपनीचा सध्या भर आहे. जर आवश्यक भासल्यास, ग्राहकांच्या इच्छेनुसार गुणवत्तेशी तडजोड न करता पण किफायतशीर नवीन उत्पादनेही सादर केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पारंपरिक यांत्रिक कुलपांमध्ये गोदरेजच्या ‘नवताल’ या नाममुद्रेचा ३३ टक्के वाटा असून, गोदरेज नाममुद्रेकडून अशीच कामगिरी डिजिटल कुलपांमध्ये केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन उत्पादन विकास, नावीन्य, उत्पादन क्षमता, ब्रॅण्ड प्रतिमावर्धन आणि विपणन व प्रसार मोहिमेवर गोदरेज लॉक्सकडून दरवर्षी एकूण उत्पन्नाच्या सुमारे ८ टक्के गुंतवणूक केली जाते. १४ ते १५ टक्के दराने वाढ साधायची झाल्यास इतकी गुंतवणूक आवश्यकच ठरते, असे मोटवानी म्हणाले. निष्णात अभियंते, तज्ज्ञ औद्योगिक रचनाकारांचा समावेश असलेल्या ३४ जणांचा संघ हा पिंपरी-चिंचवड येथे नवीन उत्पादनांच्या रचना तसेच संशोधन व विकासासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोदरेज ॲण्ड बॉयसचे एक अंग असलेल्या गोदरेज लॉक्सचे दारासाठी कुलपे आणि घराच्या अंतर्भागात म्हणजेच स्वयंपाकघर, न्हाणीघर यासाठी वास्तुशास्त्रीय जोडणी व प्रणाली असे दोन व्यवसाय विभाग असून, या दोन विभागांचा एकूण महसुलात अनुक्रमे ६० टक्के आणि ४० टक्के असा वाटा आहे. देशात वाढत्या नागरीकरणासह, जनतेच्या वाढत्या आकांक्षांना अनुरूप जोडणी व प्रणाली विभागाने अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित केली असून, त्यांची मागणीही वाढत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.