Sundar Pichai Interview On AI: एआय क्षेत्रातील प्रगतीमुळे सध्या सर्वत्र एआयचीच चर्चा सुरू आहे. अशात गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी, जर एआय फुगा फुटला तर या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर काय परिणाम होईल, यावर भाष्य केले आहे. बीबीसी न्यूजशी बोलताना सुंदर पिचाई म्हणाले की, एआयमधील गुंतवणुकीत झालेली वाढ ही एक असामान्य गोष्ट असली तरी, सध्याच्या एआय तेजीत काही प्रमाणात अविवेकीपणा आहे.

सिलीकोन व्हॅलीसह इतर ठिकाणीही ही भीती निर्माण होत आहे की, एआय कंपन्यांचे मूल्य गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढले आहे आणि कंपन्या यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे एआयचा फुगा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जर एआयचा फुगा फुटला, तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांपासून गुगल सुरक्षित राहील का? असे विचारले असता, पिचाई म्हणाले की, गुगल त्या संभाव्य परिणामांचा सामना करू शकेल, परंतु यावेळी त्यांनी इशाराही दिला. ते म्हणाले, “मला वाटते की कोणतीही कंपनी, आमच्यासह, यातून सुटणार नाही.”

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यावेळी युजर्सनाही इशारा दिला की, त्यांनी एआयकडून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.

पिचाई यांनी नमूद केले की, एआय क्रिएटिव्ह कामांसाठी उपयुक्त आहे, परंतु युजर्सनी त्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी सांगितले की, “लोकांनी या एआयचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे शिकले पाहिजे आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये.”

गुगलने मे महिन्यात त्यांच्या सर्च इंजिनमध्ये जेमिनी चॅटबॉटद्वारे एआय मोड सुरू केला आहे. याबाबत बोलताना सुंदर पिचाई म्हणाले की, “आम्हाला शक्य तितकी अचूक माहिती देण्यासाठी आम्ही जे काम करत आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे, परंतु सध्याच्या अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानात काही त्रुटी आहेत.”

गुगलच्या एआय धोरणाबाबत बोलताना सुंदर पिचाई म्हणाले की, “चिप्स आणि डेटापासून ते एआय मॉडेल्स आणि प्रगत संशोधनापर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान साखळीवरील नियंत्रणात गुगलची ताकद आहे. यामुळे कंपनी एआय बाजारपेठेतील कोणत्याही परिणामांना तोंड देण्यासाठी तयार आहे.”