Jharkhand Has More Rich People Than Gujarat: नोकरदार आणि व्यावसायिकांनी २०२४-२५ या वर्षात दाखल केलेल्या आयकर रिटर्नच्या विश्लेषणातून श्रीमंत मानल्या जाणाऱ्या आणि श्रीमंत नसलेल्या राज्यांमध्ये लक्षणीय फरक दिसून आला आहे. याचबरोबर या आकडेवारीतून झारखंडचे नागरिक गुजरातच्या नागरिकांपेक्षा श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील २०% करदात्यांनी १२ लाख ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न जाहीर केले. परंतु समृद्धीशी संबंधित असलेल्या गुजरातमध्ये ही संख्या फक्त ७% आहे.
या आकडेवारीवरून असेही दिसून येते की, २५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वाधिक करदात्यांच्या यादीत गुजरातचा क्रमांक पहिल्या १० राज्यांमध्येही नाही. दुसरीकडे, महाराष्ट्राने या श्रेणीत वर्चस्व गाजवले आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
भारतातील करदात्यांचा सर्वात मोठा गट दरवर्षी २.५ लाख ते ७.५ लाख रुपयांच्या दरम्यान उत्पन्न नोंदवतो. मध्यमवर्गीयांपैकी अर्ध्याहून अधिक लोक या गटात येतात आणि त्यापैकी फक्त २.५% लोक २५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात. यावरून भारतात उच्च-मध्यम उत्पन्न गट किती मर्यादित आहे, हे दिसून येते.
महाराष्ट्रात सुमारे १.४ लाख लोकांनी २५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न जाहीर केले आहे, जे देशात सर्वाधिक आहे. त्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडू दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकमध्ये ‘लखपती’ लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथील २०% पेक्षा जास्त करदाते वार्षिक १२ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात. याउलट, गुजरात तळाशी आहे, तर बिहारचाही या यादीत मोठा वाटा आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक ४६ लाखांहून अधिक आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर दिल्लीमध्ये करदात्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रीय पातळीवर, राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे ३% लोक कर भरतात. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश राज्य, रिटर्न भरण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असूनही, हा वाटा फक्त १.५% आहे.
या आकडेवारीवरून भारतातील मध्यमवर्गियांमध्ये असलेली तीव्र दरी दिसून येते. झारखंड आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये उच्च उत्पन्न असलेल्या लोकांचे प्रमाण वाढत आहे, तर गुजरात सारखे पारंपारिक आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली मानले जाणारे राज्य या विशिष्ट उत्पन्न श्रेणीत मागे आहेत.