Telegram Co Founder Pavel Durov : टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह यांना २०२४ मध्ये एका प्रकरणात फ्रान्समधून अटक झाली होती, तेव्हा ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पावेल दुरोव्ह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. २०१८ मध्ये त्यांच्याबरोबर घडलेल्या एका प्रकाराबाबत आता त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.

विषबाधेच्या प्रयत्नातून आपण वाचल्याचं दुरोव्ह यांनी सांगितलं आहे. मात्र, याचा व्यवसायावर लक्ष केंद्रीत राहण्याला आपण प्राधान्य दिलं आणि आतापर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवली असल्याचा दावा दुरोव्ह यांनी केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना पावेल दुरोव्ह यांनी हा खुलासा केला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. पावेल दुरोव्ह यांनी म्हटलं की, “माझ्या आयुष्यातील तो एकमेव क्षण होता, जेव्हा मला वाटलं की मी मरत आहे.”

पावेल दुरोव्ह यांनी सांगितलं की, “मी आणि माझा भाऊ एका प्रकल्पासंदर्भात काम करत होतो. तेव्हा माझ्या रेंटच्या घरात मी एकटा असताना घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने काहीतरी दिलं आणि एक तासानंतर जेव्हा मी माझ्या पलंगावर होतो, तेव्हा मला वाटलं की माझ्या संपूर्ण शरीरात वेदना जाणवत आहेत. मी उठून बाथरूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी तिथे जात असताना मला माझ्या शरीराची कार्ये बंद पडू लागल्याचं जाणवलं”, असं दुरोव्ह यांनी म्हटलं.

“तसेच तेव्हा श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच दृष्टी आणि ऐकूण देखील गमावल्याचं वाटत होतं. खूप तीव्र वेदना होत होत्या. हृदय, पोट, सर्व रक्तवाहिन्या…, हे आता स्पष्ट करणं कठीण आहे. पण एका गोष्टीबद्दल मला खात्री होती ती म्हणजे हो, हेच ते आहे. मला श्वास घेता येत नव्हता, मला काहीही दिसत नव्हतं, खूप वेदना होत होत्या. मला वाटलं की मी आता संपलो, त्यानंतर मी जमिनीवर कोसळलो. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जमिनीवरून उठलो. पण मी उभा राहू शकला नव्हतो. मला खूप अशक्त वाटत होतं. त्यानंतर जवळपास मी दोन आठवडे चालू शकलो नाही”, असं पावेल दुरोव्ह यांनी सांगितलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

पावेल दुरोव्ह कोण आहेत?

पावेल दुरोव्ह (वय ३९) यांचा जन्म सोविएत युनियनमध्ये झाला होता. त्यांनी रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी ‘VKontakte’ नावाच्या सोशल मीडिया ॲपची स्थपना केली. हे ॲप देशात लोकप्रिय झाले. ‘टाइम’ मॅगझिनच्या प्रोफाइलनुसार, दुरोव्ह यांना रशियन सरकारकडून युजर्स डेटा आणि सेन्सर सामग्री शेअर करण्यासाठी वाढत्या दबावाचा सामना करावा लागला. त्यानंतर ते रशिया सोडून गेले. १४ ऑगस्ट २०१३ रोजी पावेल आणि त्यांच्या भावाने टेलीग्रामची स्थापना केली. हे ॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला केंद्रस्थानी ठेवणारे आहे, असे सांगण्यात आले.

निकोलाईने ॲपचे एन्क्रिप्शन डिझाइन केले. ॲपने मोठ्या गटांच्या निर्मितीलादेखील परवानगी दिली; ज्यामुळे सध्या ॲपमध्ये एका गटात दोन लाख सदस्य असू शकतात. टेलीग्राम वापरकर्त्यांच्या एकापेक्षा जास्त उपकरणांशीही जोडले जाऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे या ॲपने व्हॉट्सॲपसारख्या ॲप्सला टक्कर दिली. २०२४ च्या सुरुवातीला ९०० दशलक्ष वापरकर्त्यांसह टेलीग्राम ॲप जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ॲप्सपैकी एक ठरले आहे. या ॲपच्या यशामुळे दुरोव्ह यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहे.