केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने २०२५-२०२६ साठी प्राप्तीकर विवरणपत्र म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख १५ ऐवजी आता १६ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र समोर आलेल्या नव्या माहितीनुसार ITR अर्थात विवरण पत्र भरण्याची मुदत आणखी सात दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.
मुदत आणखी सात दिवसांनी वाढणार?
प्राप्तीकर विभागाने ३१ जुलै ते १५ सप्टेंबर अशा कालावधीत आयटीआर भरण्याची मुदत दिली होती. १५ सप्टेंबर रोजी साईटवर आलेल्या प्रचंड ट्रॅफिकमुळे ही मुदत एक दिवसाने म्हणजेच आज १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली. आता आयटीआरला आणखी सात दिवसांची मुदतवाढ मिळणार अशी चिन्हं आहेत. याबाबतचा निर्णय जाहीर झाला तर प्राप्तीकर विवरण भरण्यासाठी करदात्यांना २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
प्राप्तीकर विभागाने काय सांगितलं?
प्राप्तीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार या वेळी १५ सप्टेंबरपर्यंत ७.३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते, जे गेल्या वर्षीच्या ७.२८ कोटी फाइलिंगच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. हे सतत वाढती कर अनुपालन आणि कर बेसचा विस्तार दर्शवतं आहे. अनेक करदात्यांनी आणि चार्टर्ड अकाउंटंटनी सोशल मीडियावर तक्रार केली की पोर्टलवर लॉग इन करणे, आयटीआर अपलोड करणे, आगाऊ कर भरणे आणि एआयएस डाऊनलोड करणे यात समस्या येत आहेत. यावर, विभागाने स्पष्ट केले की पोर्टल “योग्यरित्या काम करत आहे” आणि लोकांना ब्राउझर कॅशे क्लिअर करण्याचा किंवा दुसरा ब्राउझर वापरण्याचा सल्ला दिला. तसेच, विभागाने ईमेल आयडीवर पॅन आणि मोबाइल नंबर पाठवण्याचा पर्याय देखील दिला, जेणेकरून वैयक्तिक समस्या सोडवता येतील.
ITR भरणं का आवश्यक आहे?
ITR वेळेत नोंदवणं आवश्यक आहे कारण त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त दंडाची रक्कम भरावी लागणार नाही. आयटी अॅक्टच्या अंतर्गत २३४ फ कलमानुसार आखून दिलेल्या डेडलाईनच्या नंतर रिटर्न फाइल करण्यात आले तर करदात्यांना दंड भरावा लागू शकतो. जर एखाद्या करदात्याचं उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त आहे तर आयटीआर उशिरा फाईल केल्याबद्दल त्याला ५ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. ज्यांचं उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना १ हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.