देशातील वाढत्या बेरोजगारीची सर्वाधिक चिंता आजच्या तरुणांना आहे. तरुणांचा असा विश्वास आहे की, आज शिक्षणानंतर नोकरी शोधणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. पूर्वीच्या तुलनेत आज नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. कमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे, असा विश्वासही १५ ते ३४ वयोगटातील ३६ टक्के भारतीय तरुणांनी व्यक्त केला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले १६ टक्के तरुण हे गरिबी ही सर्वात मोठी समस्या मानतात. तर १३ टक्के तरुणांनी सांगितले की, महागाई ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६ टक्के तरुणांनी भ्रष्टाचार ही सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.

लोकनीती-CSDS ने या महिन्याच्या सुरुवातीलाच या अहवालाचा भाग प्रसिद्ध केलाय. यात तरुणांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित आव्हाने राष्ट्रासमोरील सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे लोकनीती-CSDS चा अहवाल करिअरच्या आकांक्षा, नोकरीची प्राधान्ये आणि तरुण भारतीयांच्या अपेक्षा याविषयांवरून करण्यात आला आहे. ४० टक्के तरुणांच्या मते ऑनलाइन शिक्षण ही मोठी समस्या आहे. तसेच ४ टक्के तरुणांच्या मते वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या १८ टक्के लोकांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

तरुणांना सतावतेय नोकरीची चिंता

बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या म्हणून ओळखणाऱ्या तरुणांचे प्रमाण २०१६ मधील अशाच सर्वेक्षणाच्या निकालांच्या तुलनेत १८ टक्के गुणांनी वाढले आहे. प्राथमिक चिंता म्हणून किंमत वाढ ओळखणाऱ्यांचा वाटा ७ टक्क्यांनी वाढला आहे. लोकनीती-CSDS ने १८ राज्यांमध्ये (उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, गुजरात, ओडिशा, केरळ, झारखंड, आसाम, पंजाब, छत्तीसगड आणि दिल्ली) हे सर्वेक्षण केले. १५ ते ३४ वयोगटातील ९३१६ तरुणांना यात सामील करण्यात आले होते. सर्वेक्षणाचे फिल्डवर्क नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये करण्यात आले. या सर्वेक्षणात तरुणांना देशातील सर्वात मोठी समस्या विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी बेरोजगारीला सर्वात वरचे स्थान दिले.

हेही वाचाः १ कोटींचा निधी जमवायचाय, मग म्युच्युअल फंडात १५X१५X१५ चा फॉर्म्युला वापरा अन् मग बघा…

बहुतांश तरुणांना कलेत रस

सर्वेक्षणात तरुणांना त्यांच्या अभ्यासाच्या क्षेत्राबाबत विचारणा करण्यात आली. सर्वेक्षणात सामील असलेल्या एक तृतीयांश म्हणजे ३५ टक्के तरुणांनी कला/मानवविद्येला अभ्यासासाठी त्यांची पहिली पसंती असल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २० टक्के तरुणांनी विज्ञानात रस दाखवला. ८ टक्के तरुणांनी कॉमर्सला आपली पसंती असल्याचे सांगितले. तसेच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तरुणांपैकी केवळ ५ टक्के तरुणांनी विज्ञान/तंत्रज्ञानाला आपली पसंती सांगितली आहे, तर १६ टक्के तरुणांनी मिश्र विषयात आपली निवड असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या उर्वरित तरुणांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

हेही वाचाः टीसीएसच्या मदतीनं BSNL 4G/5G मध्ये करणार क्रांती; तेजस नेटवर्कला मिळाली ‘इतक्या’ कोटी रुपयांची ऑर्डर

२३ टक्के तरुण स्वयंरोजगार करतात

सर्वेक्षणात सहभागी तरुणांच्या रोजगार प्रोफाइलचीही तपासणी करण्यात आली. असे आढळून आले की, सुमारे एक चतुर्थांश म्हणजे २३ टक्के तरुण स्वयंरोजगार करतात. म्हणजेच त्यांचे स्वतःचे काही काम आहे. तसेच सर्वेक्षणात सहभागी तरुणांपैकी १६ टक्के डॉक्टर आणि अभियंता यांसारख्या व्यवसायांशी संबंधित होते. १५ टक्के तरुणांचा शेतीशी संबंध होता. १४ टक्के तरुण अर्ध-अकुशल आणि १३ टक्के कुशल कामात गुंतलेले आहेत. सरकारी नोकरी हे तरुणांचे सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र आहे, त्यानंतरही केवळ ६ टक्के तरुण सरकारी नोकऱ्यांमध्ये असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

१६ टक्के तरुणांना आरोग्य क्षेत्रात करिअर करायचेय

सर्वेक्षणात सहभागी तरुणांना त्यांच्या करिअर नियोजनाबाबतही विचारण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६ टक्के तरुणांना आरोग्य क्षेत्रात (डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी) करिअर करायचे होते. २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असेही सूचित करण्यात आले होते की, तरुणांचा एक महत्त्वपूर्ण भाग आरोग्य क्षेत्रात सामील होऊ इच्छित आहे. कोविड १९ ने आरोग्य क्षेत्रात स्वारस्य असलेल्या तरुणांची संख्या वाढवण्यास मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

सरकारी की खासगी नोकरी?

सर्वेक्षणात तरुणांना सरकारी किंवा खासगी नोकरी यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितले गेले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६१ टक्के तरुणांनी सरकारी नोकरीला आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. २७ टक्के तरुणांनी स्वत:चा व्यवसाय, उपक्रम किंवा स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. केवळ ६ टक्के तरुणांना खासगी नोकरी करायची होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(विभा अत्री लोकनीती-CSDS च्या संशोधक आहेत. संजय कुमार CSDS मध्ये प्राध्यापक आहेत)