कोटक महिंद्र बँकेबद्दल खरे तर जास्त लिहायची गरज नाही. कोटक समूह हा रिटेल बँकिंग, ट्रेझरी आणि कॉर्पोरेट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, स्टॉक ब्रोकिंग, व्हेईकल फायनान्स, सल्लागार सेवा, मालमत्ता व्यवस्थापन, आयुर्विमा आणि सामान्य विमा यासह बँकिंग आणि वित्तीय सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करणारा मोठा वित्तीय सेवा समूह आहे. खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची कोटक महिंद्र बँक आपल्या १,९४८ शाखांसह (दुबई आणि गिफ्ट सिटी शाखा वगळून) भारतभरात पसरलेली आहे. बँकेच्या ४५ टक्के शाखा मोठ्या शहरात असून २२ टक्के शाखा निम-शहरात तर ३३ टक्के शाखा ग्रामीण भागात आहेत. नजीकच्या काळात बँकेचा आणखी १५० नवीन शाखांसह विस्तार करण्याचा मानस आहे.
गेल्या वर्षभरात कोटक महिंद्रच्या शेअरने विशेष कामगिरी केलेली नाही. त्यातून गेल्याच महिन्यात रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधांमुळे बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. रिझर्व्ह बँकेने कारवाईचा बडगा उगारत या बँकेला ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरित करण्यावर निर्बंध लादले आहेत. अर्थात यामुळे, कोटक महिंद्र बँक त्यांच्या विद्यमान क्रेडिट कार्ड ग्राहकांसह बँकिंग सेवा प्रदान करणे सुरू ठेवू शकणार आहे. त्यांच्या व्यवहारांत कोणत्याही अडचणी येणार नसून ते नेहमीप्रमाणे सुरू राहतील. फक्त ऑनलाइन, मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक आणि नवीन क्रेडिट कार्डचे वाटप करता येणार नाही. बँकेने आपल्या ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी आणि संबंध दृढ करण्यासाठी एक योजना तयार केली आहे. बँकेच्या शाखा नवीन ग्राहकांना सामावून घेणे सुरू ठेवतील आणि त्यांना केवळ नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्याव्यतिरिक्त बँकेच्या सर्व सेवा प्रदान करतील. तसेच बँकेने आपल्या आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि लवकरात लवकर उर्वरित समस्यांचे निराकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेसोबत काम करणे सुरू ठेवणार आहे.
हेही वाचा…विदेशी गुंतवणूकदार माघारी, मे महिन्यात २२,००० कोटी मूल्याच्या समभागांची विक्री
कोटक महिंद्रने आर्थिक वर्ष २०२४ साठीचे आर्थिक कामगिरीचे निकाल जाहीर केले असून बँकेने सर्वच बाबतीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत बँकेच्या उत्पन्नात भरीव वाढ (२६ टक्के) झाली असून ते ४२,१५१ कोटींवरून ५६,२३७ कोटींवर गेले आहे. नक्त नफ्यातही २२ टक्के वाढ होऊन तो १४,९२५ कोटींवरून वधारून १८,२१३ कोटींवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्ज वितरणात १८ टक्के वाढ साधली आहे, ते आता ३.७६ लाख कोटींवर गेले आहे. बँकेच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि ते ४.७९ लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या कालावधीतल्या तिमाहीच्या तुलनेतही बँकेने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. तिमाहीतील नक्त नफ्यात १८ टक्के वाढ होऊन तो ३,४९६ कोटींवरून ४,१३३ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या मुदत ठेवीत देखील तब्बल ३५ टक्क्यांची भरीव वाढ होऊन त्यात २.२५ लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. त्या गेल्यावर्षी याच तिमाहीत १.६७ लाख कोटी रुपये होत्या.
गेल्याच वर्षांत बँकेने लखनऊमधील सोनाटा मायक्रो फायनान्स ही कंपनी ताब्यात घेऊन सूक्ष्मवित्त क्षेत्रात प्रवेश केला आहे. सोनाटाच्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह इतर राज्यात मिळून ६५५ शाखा आहेत. याचा फायदा आगामी कालावधीत दिसून येईल. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचा बँकेच्या नफ्यावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही. पुढील आर्थिक वर्षात करपूर्व नफा २ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील खर्च १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्र बँकेच्या स्टॉक ब्रोकिंग, वित्तीय सल्लागार सेवा, मालमत्ता व्यवस्थापन, आयुर्विमा आणि सामान्य विमा उपकंपन्या असून आगामी काळात त्याचा भरीव फायदा भागधारकांना होऊ शकेल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कोटक बँकेचा शेअर नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.
हेही वाचा…सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
कोटक महिंद्र बँक लिमिटेड
(बीएसई कोड: ५००२४७)
वेबसाइट: http://www.kotak.com
प्रवर्तक: उदय कोटक
बाजारभाव: रु. १,६९७/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बँकिंग
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९९३.२८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक २५.९०
परदेशी गुंतवणूकदार ३७.५९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २३.४०
इतर/ जनता १३.११
पुस्तकी मूल्य: रु. ५६३
दर्शनी मूल्य: रु. ५/-
गतवर्षीचा लाभांश: ४०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ९१.६
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८.५
हेही वाचा…तीन सत्रातील घसरणीला लगाम, सेन्सेक्समध्ये २६० अंशांची भर
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ११.१
नेट इंट्रेस्ट मार्जिन: ४.९%
सीएएसए गुणोत्तर: ४५.५%
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): ८.७५%
नक्त अनुत्पादित कर्ज: ०.३%
बीटा: ०.९०
बाजार भांडवल: रु.३३७,८०० कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,०६४/१,५४४
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. हा गुंतवणूक सल्ला नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.