लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक कल आणि त्यापरिणामी देशांतर्गत आघाडीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि भारती एअरटेलच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांक वधारले. सलग तीन सत्रातील घसरणीला लगाम बसत सेन्सेक्सने ५४२ अंशांची झेप घेतली होती.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २६०.३० अंशांनी वधारून ७२,६६४.४७ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ५४२.३७ अंशांची कमाई करत ७२,९४६.५४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९७.७० अंशांची भर घातली आणि तो २२,०५५.२० पातळीवर विसावला.

आणखी वाचा-‘महारत्न’ तेल कंपन्या ‘बीपीसीएल’, ‘एचपीसीएल’ कडून भागधारकांना नजराणा; बक्षीस समभाग आणि भरीव लाभांशही

शुक्रवारच्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. मात्र घटलेला मतदानाच्या टक्क्यामुळे निवडणुकीची धाकधूक आणि देशांतर्गत भांडवली बाजारातील समभागांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे बाजारात नफावसुलीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. महागाईची चिंता आणि त्यापरिणामी मध्यवर्ती बँकांकडून दरकपातीस होणार विलंब, कंपन्यांचे तिमाहीतील कामगिरी यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. शिवाय त्यांच्याकडून समभाग विक्री करून भांडवल सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाते आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-बाजार रंग : लाटांवर स्वार होताना

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, आयटीसी, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक वधारले. तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस, विप्रो, महिंद्र अँड महिंद्र आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ६,९९४.८६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ७२,६६४.४७ २६०.३० ०.३६%
निफ्टी २२,०५५.२० ९७.७० ०.४४%

डॉलर ८३.४९ -१ पैसा
तेल ८४.२२ ०.४१