लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सोन्याच्या किमती अस्मानाला भिडलेल्या असतानाही वाढलेल्या विक्रीतून, दागिन्यांची विक्री करणाऱ्या संघटित क्षेत्रातील सराफांच्या उत्पन्नात चालू आर्थिक वर्षात १७ ते १९ टक्के वाढ होण्याचा अंदाज ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव अपेक्षेपेक्षा अधिक काळ ताणला गेला. याचवेळी रिझर्व्ह बँकेसह अनेक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात त्याकडे वाढलेल्या आकर्षणामुळे सोन्याच्या भावात निरंतर तेजी दिसून येत आहे. पर्यायाने आभूषण विक्रेत्या सराफांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. ग्राहकांच्या दृष्टीने जमेची बाब म्हणजे,  सोन्याचे भाव वाढत असताना विक्री कायम राखण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सराफांकडून ग्राहकांसाठी विविध योजना सादर केल्या जातील, असाही क्रिसिलचा कयास आहे.गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात सराफांचा कार्यान्वयन नफ्यातील वाढ कमी राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात कार्यान्वयन नफा ०.२ ते ०.४ टक्क्याने वाढून ७.७ ते ७.९ टक्क्यांवर जाईल. याचबरोबर सोन्याच्या भावातील वाढ आणि नवीन दालनांचा विस्तार यामुळे सराफांच्या भांडवली खर्चात वाढ होईल, असेही क्रिसिलने नमूद केले आहे.

हेही वाचा >>>भांडवली बाजाराचा पाच ट्रिलियन डॉलरचा पराक्रम, ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्याची ऐतिहासिक कामगिरी

संघटित क्षेत्राचा केवळ एक तृतीयांश वाटा

देशातील सराफा बाजारपेठेत संघटित क्षेत्राचा वाटा एक तृतीयांशपेक्षा किचिंत जास्त आहे. याउलट असंघटित क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या भावात १५ टक्के वाढ होऊन तो मार्चअखेरीस प्रति १० ग्रॅमसाठी ६७ हजार रुपयांवर पोहोचला. सध्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ७४ हजार रुपयांवर गेला आहे.