Apple CEO Tim Cook iphone sale in USA : भारत गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत उत्पादनावर मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. केंद्र सरकारची त्यासंबंधीची धोरणं आता यशस्वी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या बाजारातही मेड इन इंडिया वस्तूंचं प्रमाण वाढलेलं दिसतं आहे. प्रामुख्याने अ‍ॅप्पल कंपनीची मेड इन इंडिया उत्पादने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अ‍ॅप्पलचे सीईओ टिम कूक यांनी स्वतः देखील याची माहिती दिली आहे. तसेच आगामी काळात अमेरिकेतील मेड इन इंडिया आयफोन्सची संख्या वाढेल असा विश्वासही कूक यांनी व्यक्त केला आहे. तसेच कंपनी आता भारतातील उत्पादन देखील वाढवणार आहे.

टिम कूक म्हणाले, “या वर्षाच्या पहिल्या तिमाहित म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत अमेरिकेत विक्री झालेल्या एकूण आयफोन्सपैकी ५० टक्के आयफोन्स हे भारतात तयार करण्यात आले होते. आम्ही हे स्मार्टफोन भारतात तयार करून त्यांची अमेरिकेत विक्री केली आहे. तसेच जूनपर्यंतच्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात) अमेरिकेत मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री वाढणार आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात भारतातून स्मार्टफोन्स मागवले आहेत.”

भारतीय बनावटीच्या फोन्सची विक्री वाढणार

टिम कूक म्हणाले, “जूनमध्ये संपणाऱ्या दुसऱ्या तिमाहित अमेरिकेत विकले जाणारे जवळपास सगळेच आयफोन हे भारतात बनललेले असू शकतात. तसेच आम्ही भारतातील आयपॅड, मॅक, अ‍ॅप्पल वॉच, एअरपॉड्सचं उत्पादन वाढवलं आहे. मात्र, ही उत्पादने प्रामुख्याने व्हिएतनाममधून आयात केली जात आहेत. आम्ही चीनच्या बाहेर जास्तीत जास्त उत्पादन करण्यावर भर देत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा भारताला फायदा?

अ‍ॅप्पल कंपनी आता चीनमधील उत्पादन कमी करत आहे. चीनमधील उत्पादन भारतात करण्यावर कंपनीचा भर असेल. भारतासह व्हिएतनाममध्ये देखील उत्पादन वाढवलं जाणार आहे. अमेरिका व चीनमध्ये सध्या ट्रेड वॉर (व्यापार युद्ध) व टॅरिफ वॉर (आयात शुल्क) चालू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर भरमसाठ आयात शुल्क लादलं आहे. अमेरिकेने चीनमधील वस्तूंवर जास्तीत जास्त १४५ टक्के आयात शुल्क लावलं आहे. तर, चीनने जास्तीत ३४ टक्के आयात शुल्क लावलं आहे. परिणामी अमेरिकेत चीनमधील आयात होणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. चीनमध्ये अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.