भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गुरुवारी फरार व्यावसायिक मेहुल चोक्सीची बँक खाती आणि समभाग आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर टाच आणत ते जप्त करण्याचे आदेश दिले. गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीशी संबंधितप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या फसवणुकीच्या प्रकरणात सेबीने ऑक्टोबर २०२२ मध्ये चोक्सीला ठोठावलेला दंड यातून वसूल केला जाणार आहे.
नीरव मोदीचे मामा चोक्सी हे गीतांजली जेम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तसेच ते प्रवर्तक गटातही सामील होते. चोक्सी आणि नीरव या दोघांवर सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेची १४,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वर्ष २०१८ च्या सुरुवातीला हा पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी आणि मोदी दोघेही भारतातून पळून गेले. चोक्सी अँटिग्वा येथे असल्याचे सांगितले जात आहे, तर नीरव मोदी ब्रिटिश तुरुंगात असून आणि त्याने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला आव्हान दिले आहे.
हेही वाचाः Good News : खाद्यतेल आणखी स्वस्त होणार; मोदी सरकारकडून आयात शुल्कात कपात
थकबाकी वसूल करण्यासाठी, सेबीने सर्व बँका, डिपॉझिटरीज – सीडीएसएल आणि एनएसडीएल आणि म्युच्युअल फंडांना चोक्सीच्या खात्यातून कोणताही निधी काढला जाणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. मात्र खात्यात नव्याने भर घातली जाणार असल्यास त्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढे, सेबीने बँकांना चोक्सीची लॉकर्ससह सर्व खाती परस्परांशी संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने १८ मे रोजी चोक्सीला दंडाची नोटीस पाठवून या प्रकरणात ५.३५ कोटी रुपये भरण्यास सांगितले होते आणि १५ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास मालमत्ता तसेच बँक खाती जप्त करण्यासह, अटक करण्याचा इशारा दिला होता.
हेही वाचाः भारतात प्रामुख्याने ‘या’ दोन देशांतून येणाऱ्या पामतेलाची आयात घटली