Online Gaming Bill 2025: ऑनलाइन गेम्समधील जुगारावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत विधेयक मांडले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ हे विधेयक सादर केल्यानंतर ते चर्चेविनाच संमत करण्यात आले. तसेच आज (२१ ऑगस्ट) राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या कायद्यामुळे सरकारला आता मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. पण लोकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे केंद्राने सांगितले आहे.
या विधेयकाच्या माध्यमातून रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाइन बेटिंगला चाप लावला जाणार आहे. याचे व्यसन लागल्यामुळे पैसा आणि वेळेचा प्रचंड अपव्यव होत असून सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित असल्याबाबत बुधवारी चिंता व्यक्त करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हे विधेयक बुधवारी कॅबिनेट बैठकीत मांडले. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ते लोकसभेत सादर करण्यात आले. तसेच आज राज्यसभेत मांडले गेले. विरोधकांनी बिहारमधील मतदार यादीमधील घोळासंदर्भात घोषणाबाजी केल्यामुळे चर्चेविनाच सदर विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.
राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. कायदा झाल्यास पैशावर आधारीत गेमिंगमध्ये सहभागी असलेल्या संस्थांविरुद्ध कारवाई प्रामुख्याने राज्य सरकारे करतील. निर्धारित तरतुदींचे उल्लंघन म्हणून ऑनलाइन मनी गेमिंग सेवा देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील. खेळांसंबंधी जाहिराती देण्यावर प्रतिबंध असेल. अशा प्रसंगी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्हीही शिक्षांची विधेयकात तरतूद आहे.
कायदा झाल्यास कोणत्या भारतीय ॲप्सना फटका बसणार?
व्हेंचर कॅपिटल फर्म लुमिकाईच्या मते, २०२९ पर्यंत अशा गेम्सची भारतीय बाजारपेठ ३.६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल.
ड्रीम११ : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि सेलिब्रिटींनी जाहिरात केल्यामुळे आणि मार्केटिंगचे तंत्र वापरल्यामुळे ड्रिम ११ हे ॲप बरेच लोकप्रिय झाले आहे. क्रिकेट, कबड्डी आणि इतर काही खेळांची फँटसी टीम ड्रीम११ वर तयार केली जाते. ड्रीम ११ या स्टार्टअपचे बाजार मूल्य ८ अब्ज डॉलर इतके आहे.
ड्रीम११ वर युजर ८ रुपयांपासून पुढे त्यांचा संघ लावण्याची संधी मिळते. एका सामन्यावर कोट्यवधींचा पैसा लावला जातो. आयपीएलमुळे या ॲपला बरीच प्रसिद्धी मिळाली.
मोबाइल प्रिमियर लीग : मोबाइल प्रिमियर लीग हे आणखी एक फँटसी टीम लावण्याचे ॲप असून त्याचे बाजारमूल्य २.५ अब्ज डॉलर्सचे आहे.
इतर ॲप्स कोणते?
- माय ११ सर्कल (My11Circle)
- हाऊजॅट (Howzat)
- एसजी११ फँटसी (SG11 Fantasy)
- विन्झो (WinZO)
- गेम्स २४ बाय ७ (Games24x7)
- जंगली गेम्स (Junglee Games covers Rummy & Poker)
- पोकरबाजी (PokerBaazi)
- गेम्सक्राफ्ट (GamesKraft)
- नझारा टेक्नॉलॉजिस (Nazara Technologies)