एखादा विषय अनेक दिवस मनात घोळत असतो, कधी कधी मध्येच डोकं वर काढतो आणि मग नेहमीची कामं सुरू झाली की परत विसर पडतो, असं काहीसं आजच्या विषयाच्या बाबतीत घडलं. अनेकदा लिहायला सुरुवात केली, पण काही ना काही कारणांमुळे हवं तसं मांडता येत नव्हतं. पण मागच्या आठवड्यात दोन प्रसंग असे आले, जिथे समोरच्या व्यक्तीने याबाबत काही प्रश्न विचारले आणि आपोआप यावर लिहायला नव्याने प्रेरणा मिळाली.

एखादं साधारण कुटुंब पाहिलं तर त्यात दोघे नवरा-बायको किंवा कोणीतरी एक कमावती व्यक्ती असते, गुंतवणूक करत असते आणि कुटुंबीयांच्या गरजा पुरवत असतं. पुढे आपल्यापुरता निवृत्ती निधी साठवला जातो आणि त्यातील बराचसा खर्च होऊन जातो. म्हातारपणी मुलांकडे मागण्याची वेळ येऊ नये, हे त्यामागचं खूप दृढ कारण असतं. इथे मुळात गरजांच्या पलीकडे फार काही नसतं आणि त्यामुळे संपत्ती काही फारशी तयार होत नाही. प्रत्येक पिढी स्वतःपुरती सोय करते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही.

माझा व्यक्तिगत सल्ला लोकांना हाच असतो की, आपण जे कमावतो त्याचा उपभोग आपल्या उमेदीच्या काळात करायचा आणि मग उरलेलं पुढच्यांसाठी ठेवायचं. परंतु जेव्हा पुढच्या पिढीसाठी आधीची पिढी ठेवून जाते ते का जपायला आणि वाढवायला हवं? त्याचं काय आणि कसं करायचं यावर लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आजचा हा लेख.

आज आपल्या आजुबाजूला आपण जे वातावरण अनुभवतोय ते एका बाजूला प्रगतिशील वाटतंय, परंतु दुसऱ्या बाजूने ते तितकंच साशंकतेने दाटलेलं आहे. एकीकडे नवीन नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कामं कमी होत आहेत. आधी आपण निवृत्त होईस्तोवर काम करू शकत होतो, परंतु आता पन्नाशीत नोकरी टिकेल की नाही ही भीती आहे. ‘बर्न आऊट’मुळे अनेक जण लवकर निवृत्त होऊ पाहात आहेत. काही नशीबवान व्यक्तींच्या बाबतीत आयुष्यात खूप लवकर खूप मोठं यश मिळतं आणि त्याबरोबर भरपूर पैसेसुद्धा, परंतु दुसऱ्या बाजूला असे अनेक तरुण आहेत, ज्यांना भरपूर शिकूनसुद्धा साजेशी नोकरी आणि त्यानुसार पगार मिळत नाहीये. एकीकडे भरपूर पगाराची नोकरीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या महागाईनुसार खर्चसुद्धा भरपूर आहेत. यामुळे हवी तशी गुंतवणूक होत नाहीये. खूप गुंतवणूक पर्याय आहेत, वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूकदारांवर जाहिरातींचा भडिमार होतोय. समाजमाध्यम सतत आपलं लक्ष विचलित करत आहे आणि आपणच सुरू केलेल्या स्पर्धांमध्ये आपण नक्की कुठे चाललोय आणि कुठे पोचणार हे कळत नाहीये. एकीकडे भरपूर पैसे आहेत आणि त्यांना योग्य वाट मिळत नाही तर दुसरीकडे पैसेच कमी आहेत. तर अशा परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडायचं म्हटलं तर काही गोष्टी वेळीच करणं गरजेचं आहे.

१. वारसाहक्कातून मिळालेली संपत्ती : या संपत्तीला ‘लॉटरी’ न समजता तिला पुढच्या पिढीसाठी कसं सांभाळता आणि वाढवता येईल, यावर नीट लक्ष द्यायला हवं. या पुढच्या पिढीसाठी ‘करिअर’ करायची संधी कितपत सहज असेल, याबाबत खूप साशंकता आहे. निरनिराळे विषय शिकून जी पिढी तयार होतेय, त्यात खरंच यश मिळवणाऱ्या आणि त्यातून संपत्ती निर्मिती करणाऱ्या मंडळींची संख्या खूप कमी असेल. शिवाय अनेकजण स्वतःचं राहणीमानसुद्धा नीट ठेवू शकतील की नाही हेसुद्धा आज कळत नाहीये. एकेरी आयुष्य, कमी होत चाललेली कुटुंब व्यवस्था, मानसिक संभ्रमात होणारी प्रचंड वाढ या सर्वांमुळे आहे त्यावर लक्ष देणं कठीण होतंय. तेव्हा पुढील पिढीसाठी आधीच्या पिढीने जमेल तितकी संपत्ती संभाळावी.

२. स्वकमाईतून संपत्ती निर्मिती – महागाई ज्या पद्धतीने वाढत आहे, त्यानुसार येत्या काळात अनेक तरुण लोकांना स्वतःची आर्थिक प्रगती साधने आव्हानात्मक होणार आहेत. आपला देश विकसित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जसं इतर प्रगत देशांच्या बाबतीत सध्या घडत आहे, तेच इथेसुद्धा लागू होईल. घर घेणं महाग, राहणीमानाचे खर्च जास्त, शिक्षणाचे खर्च अधिक आणि खर्च करून पैसे उरले तर गुंतवणूक पर्यायसुद्धा भरपूर आहेत. इथे राहणीमानाचा खर्च आटोक्यात ठेवून पुढचं निभावण्यासाठी काटेकोर आर्थिक नियोजन प्रभावी ठरेल. योग्य वेळी, योग्य पर्यायात गुंतवणूक, नीटनेटके जोखीम व्यवस्थापन आणि स्वतःच्या भावनांवर संयम, हे नियम पाळल्याने स्वतःचं आयुष्य तर चांगलं होईलच परंतु पुढच्या पिढीसाठीसुद्धा काही ठेवता येईल. इतरांच्या तुलनेमध्ये आपलं राहणीमान कसं चांगलं ठेवता येईल, यापेक्षा पुढील आव्हानांसाठी कसं तयार राहता येईल, यावर वेळीच लक्ष ठेवलं की फायदा होईल. तेसुद्धा योग्य वेळी निर्णय आणि कृती दोन्ही झाली तरच हे शक्य आहे. नुसती स्वप्नं आणि आराखडे बांधून काहीच उपयोग नाही.

३. परदेशी स्थायिक होणारी मुलं – मागील प्रगती आणि काही ठरावीक क्षेत्रांतील संधी पाहून अनेक मुलं परदेशी जातात खरी, पण प्रत्येकाचं आयुष्य सुंदर नसतं बरं का. उत्तम नोकरी, व्यवसाय आणि चांगली मिळकत असेल तर ज्या देशात वास्तव्य आहे, त्या देशातून दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती किती शक्य आहे हे जाणून घ्यावं. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रगत देशांची अर्थव्यवस्था कमजोर व्हायची लक्षणं दिसत आहेत. तिथे असणाऱ्या सामान्य गुंतवणूक संधी फार काही परतावे देतील असं सध्यातरी वाटत नाहीये. तेव्हा अशा मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी इतर देशांमधून कशी गुंतवणूक करून आपली आर्थिक ध्येयं साधता येतील यावर वेळीच लक्ष दिलेलं बरं. प्रत्येक देशातील महागाई, तिथे मिळणारे परतावे, चलनामध्ये होणारी वाढ हे सर्व लक्षात ठेवून विविध गुंतवणूक साधनांमध्ये आणि वेगवगेळ्या ठिकाणी गुंतवणूक ठेवावी.

४. वारसाहक्क, कर आणि संपत्ती व्यवस्थापनासाठी आयत्यावेळी काम करून उपयोग होत नाही. इथे आधी सल्ला, मग कृती आणि पुढे काही कायदेशीर बदल झाल्यास त्यानुसार आर्थिक आराखड्यामध्ये करायचे बदल हे व्यवथित करायला हवं. प्रत्येक देशाचे वारसाहक्क कायदे, कर नियम वेगळे असतात. कुठे भेट, नामनिर्देशन, कुठे इच्छापत्र करावं यालासुद्धा नियम पाहावेत. प्रत्येक गोष्टीचे खर्चसुद्धा असतात. तेव्हा खर्च आणि होणारा फायदा याची जुळवाजुळव करून मग निर्णय घ्यावे लागतात.

५. संपत्तीचं हस्तांतरण करायच्या आधी तिचं स्वरूप योग्य आहे की नाही हे वेळीच तपासलेलं बरं. जमीन, शेअर, म्युच्युअल फंड, घरं, बँकेतील ठेवी या नीट हस्तांतरित होतात. परंतु कोणाकडून करायची वसुली परत मिळवणं कठीण असतं. शिवाय काही देशांमध्ये मिळालेली संपत्ती कर कार्यक्षम नसते. इथे आपल्याला म्युच्युअल फंडांचं उदाहरण घेता येईल. अमेरिकेत राहणाऱ्या अपत्याला जर त्याच्या वारसाहक्काने भारतीय म्युच्युअल फंड मिळाले तर त्याला तिथल्या कर नियमानुसार दरवर्षी त्यावर कर भरावा लागणार. तसं जर करायचं नसेल तर त्याला ते विकावे लागतील आणि मग करपश्चात मिळालेली रक्कम स्वतःच्या गरजेनुसार वापरावी लागेल.

घराच्या बाबतीत असं होतं की, ते जर जुनं झालेलं असेल तर त्यावर आधी खर्च करावा लागतो आणि मग पुढे त्यासंदर्भात काही निर्णय घेता येतो. त्यासाठी पुन्हा पुन्हा एकतर भारतात यावं लागतं किंवा मग कोणाला तरी लक्ष देण्यासाठी कामावर ठेवावं लागतं. म्हणून शक्यतो स्थावर मालमत्ता न देता आर्थिक मालमत्ता द्यावी. आपल्यानंतर आपल्या वारसदारांना आपली संपत्ती सांभाळता पण आली पाहिजे आणि म्हणून ती जितकी सुटसुटीत हस्तांतरित होईल तितकं चांगलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपत्ती संवर्धनाचा पसारा तसा खूप मोठा आहे. या लेखातून मी फक्त काही मुद्दे मांडू शकले आहे. वाचंकांनी मात्र नीट माहिती मिळवून योग्य वेळी, योग्य सल्ला घेऊन कृती करावी. आपल्या संपत्तीचा वटवृक्ष व्हावा, अशी जर इच्छा असेल तर आज बी पेरून, उद्या वाढवून, परवा सांभाळून मग नंतरच्यांसाठी ठेवता येईल. एका पिढीने कष्टाने तयार केलेली संपत्ती जर पुढच्या पिढीने चांगली सांभाळली आणि वाढवली आणि हे चक्र असंच चालू राहिलं तर खऱ्या अर्थाने त्या कष्टांचं आणि संपत्तीचं चीझ झालं असं म्हणता येईल. तृप्ती राणे trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण : हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.