बाजाराच्या ‘निफ्टी ५०० टीआरआय’ (विस्तृत बाजारपेठ), ‘निफ्टी १०० टीआरआय’ (लार्जकॅप) आणि ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’, अशा तीन प्रमुख निर्देशांकांची कामगिरी १ ऑगस्ट २०१५ ते ३१ जुलै २०२५ या दहा वर्षाच्या कालावधीत ५ वर्षाच्या चलत सरासरी वर तपासली असता ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ने सातत्याने वेगवेगळ्या कॅलेंडर वर्षात मागे टाकले आहे. ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ने नकारात्मक परतावा दिलेल्या वर्षांची संख्या कमी होती. त्याच वेळी, निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ने ५ वर्षांच्या कालावधीत १५ ते २० टक्के दरम्यान २५.८७ टक्के वेळा, तर २० टक्क्यांपेक्षा अधिक ३०.९२ टक्के वेळा परतावा दिला आहे. ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’मध्ये विस्तृत बाजारपेठेत उच्च जोखीम समायोजित परतावा देण्याची क्षमता आहे.

बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंड येत्या शनिवारी म्हणजे ९ ऑगस्ट २०२५ रोजी २० वर्षे पूर्ण करून एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. मागील २० वर्षांत (९ ऑगस्ट २००५ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान) निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआयने १५.४९ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. तर बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर गुंतवणूकदारांना वार्षिक १३.८१ टक्के दराने परतावा मिळाला आहे. बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये गुंतविलेल्या १ लाखाचे ३१ जुलै रोजी १३,२६,५१० रुपये झाले आहेत. बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाला आजपर्यंत अजय बोडके, त्रीदीप पाठक, अंकुर अरोरा, अनिरुद्ध नाहा, अनुप भास्कर, निशिता शहा, हर्ष भाटीया, मनीष गुनवाणी, राहुल अगरवाल, रितिका बेहरा, आणि गौरव सुत्रा असे निधी व्यवस्थापक लाभले. या फंडाच्या व्यवस्थापनाची धुरा प्रदीर्घकाळ अनुप भास्कर यांच्याकडे होती. मनीष गुनवाणी यांच्याकडे फंडाची धुरा २८ जानेवारी २०२३ पासून आहे. ते या फंड घराण्याचे समभाग गुंतवणुकीचे प्रमुख आहेत.

भारतीय शेअर बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीत, विस्तृत निर्देशांकाने घसरण अनुभवली आहे. सध्या सर्वच निर्देशांक त्यांच्या सर्वकालीन उच्चांकापासून ८ ते १० टक्के खाली आहेत. बाजारातील वेळ साधण्याऐवजी, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून घेतलेल्या ‘एसआयपी’ संथपणे त्यांची समभाग गुंतवणूक वाढविण्याची चांगली संधी सध्याचा बाजार देत आहे. बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाची पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या ‘एसआयपी’साठी शिफारस करत आहे. मागील वीस वर्षात या फंडाने आकर्षक कामगिरी केली नसली, तरीही गेल्या अडीच वर्षांतील (निधी व्यवस्थापक बदलानंतर) कामगिरी फंडात नव्याने ‘एसआयपी’ करावी असे चित्र आहे.

पोर्टफोलिओ रचना

ऑगस्ट २००५ मध्ये त्याच्या आयडीएफसी क्लासिक इक्विटी म्हणून सुरू झालेला हा फंड, भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणानंतर आयडीएफसी कोअर इक्विटी म्हणून ओळखला जावू लागला. फंड घराण्याने १३ जून २०२५ पासून फंडाचे नांव बदलून बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंड असे केले. धोरणात्मकबाबींवर लक्ष केंद्रित करून, बाजार भांडवलानुसार पहिल्या २५० कंपन्यांचा या फंडाच्या गुंतवणूक परिघात समावेश होतो. फंडाला लार्जकॅप आणि मिडकॅपमध्ये प्रत्येकी ३५ टक्के गुंतवणूक राखणे अनिवार्य आहे. फंडाच्या सक्रीय व्यवस्थापन गुंतवणुकीचे मुख्य तीन निकष आहे. पहिला ‘मोमेंटम स्टॉक्स’ सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनात गुंतलेले असते, तेव्हा व्यवसायांना योग्य मूल्यांकन मिळते. दुसरा निकष ते मोठ्या संख्येने असलेल्या पोर्टफोलिओतील कंपन्या (जून अखेरीस कंपन्यांची संख्या १०५) विविध ३५ उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. लार्ज अँण्ड मिडकॅप फंड गटात गुंतवणुक असलेल्या कंपन्यांच्या संख्येच्या तुलनेत हा फंड दुसऱ्या स्थानी आहे. तिसरा निकष, हा फंड नव्याने विकसित होत असलेले कल समजून ‘थीमॅटिक’ आणि आर्थिक आवर्तनानुसार गुंतवणूक करतो. पोर्टफोलिओ मुख्यत्वे तीन भागांमध्ये

निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय पाहता, बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंड पारंपारिकरित्या या फंडाच्या गुंतवणुकीचा ६५ टक्के हिस्सा ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’मधील कंपन्यांत गुंतवलेला असतो. याव्यतिरिक्त, फंडाचा ३० ते ३५ टक्के हिस्सा मिड-स्मॉल कॅप कंपन्यांत असतो. ‘सेबी’ने म्युच्युअल फंड योजनांचे सुसूत्रीकरण करण्यापूर्वी (एप्रिल २०१८ ) बंधन कोअर इक्विटी, प्रामुख्याने लार्ज-कॅपवर केंद्रित फंड होता. फंड सुसुत्रीकरणापूर्वी लार्जकॅपची मात्रा ६० टक्क्यांहून अधिक होती. फंड लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांत गुंतवणूक करतो. जोखीम व्यवस्थापन निधी व्यवस्थापकांची प्राथमिकता राहिली आहे. फंडाच्या गटाच्या तुलनेत या फंडातील उद्योग क्षेत्रांची आणि कंपन्यांची संख्या जास्त आहे. फंडाने केलेली गुंतवणुकीत खासगी बँका, आरोग्य निगा वित्तपुरवठा, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने माहीती तंत्रज्ञान, पेट्रोलियम उत्पादने आणि विद्युत उपकरणे यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंडाल्को, भारती एअरटेल, अॅव्हेन्यू सुपरमार्ट या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. फंडाने अलीकडे

बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाची कामगिरी

बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या कामगिरीत २०१९ पासून जोरदार घसरण झाली आणि २०२० मध्ये हा फंड ‘बॉटम क्वार्टाइल’मध्ये फेकला गेला. बंधन लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाच्या कामगिरीत मागील ३ वर्षे सातत्याने सुधारणा झालेली दिसत आहे. ‘लोअर मिड क्वार्टाइल’ (२०२१), ‘अप्पर मिड क्वार्टाइल’ (२०२२) आणि ‘टॉप क्वार्टाइल’ (२०२३) असा फंडाचा प्रवास राहिला आहे. ‘पॉइंट-टू-पॉइंट ट्रेलिंग रिटर्न’नुसार (३१ जुलै रोजी), फंडाचा एका वर्षात ०.०९ टक्के, तीन वर्षात २७.२९ टक्के आणि पाच वर्षांच्या कालावधीत २६.६५ टक्के परतावा फंड गट आणि मानदंड ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ सापेक्ष चांगला आहे. फंड सरासरीपेक्षा जास्त परतावा कमवीत असतांना निधी व्यवस्थापाकांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून येते. मिरे अॅसेट लार्ज अँण्ड मिडकॅप, कॅनरा रोबेको लार्ज अँण्ड मिडकॅप आणि एसबीआय लार्ज अँड मिडकॅपसारख्या फंड गटातील मोठी मालमत्ता असणाऱ्या फंडांपेक्षा मासिक चलत सरासरीद्वारा मोजले जाणारे वार्षिक प्रमाणित विचलन अधिक चांगले आहे.

नेहमीच्या निकषांवर फंडाचे विश्लेषणकेले असता, फंडाची दीर्घ कालीन कामगिरी प्रभावी नसली तरी गेल्या पाच वर्षातील कामगिरी आकर्षक आहे आणि तीन वर्षातील कामगिरी नक्कीच दखल घेण्याजोगी आहे.

मंगेश पाडगावकरांच्या शब्दांचा आधार घेत सांगायचे तर,

पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं,

तुम्हीच ठरवा!

तेव्हा या फंडात नव्याने ‘एसआयपी’ करायची की नाही हे वाचक हो तुम्हीच ठरवा.