नव्याने शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केलेल्या तरुण आणि उत्साही गुंतवणूकदारांना एक प्रकारची गुंतवणूक आवडते किंवा त्यात नेहमीच करावीशी वाटते ती म्हणजे मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणूक. गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ बांधताना कोणत्या प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याचे आदर्श सूत्र वगैरे नसते. पण एक गोष्ट निश्चित ती म्हणजे स्थिर उद्योग, उद्योगातील वाढीचा आणि सतत होणाऱ्या नफ्याचा खात्रीशीर अंदाज यामुळे ‘ब्लूचिप कंपन्या’ गुंतवणूकदारांसाठी पहिला पर्याय असायला हव्यात.

मिडकॅपमध्ये गुंतवणूक का करतात?

मिडकॅप म्हणजेच ज्यांचे बाजारमूल्य मध्यम आकाराचे आहे, अशा कंपन्या होय. मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आकर्षक मुद्दा असतो तो म्हणजे आकाराने मोठ्या असलेल्या महाकाय कंपन्यांच्या तुलनेत मिडकॅप कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कमी वेळेत जास्त वाढ होताना दिसते. मिडकॅप कंपन्या एकदा गुंतवणूकदारांच्या गळ्यातला ताईत बनल्या की त्यामध्ये सतत वाढ होताना दिसते. २०२३ या वर्षाचा विचार केल्यास निफ्टीपेक्षा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळाला आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांक आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक या दोहोंनी वर्षभरात ३० टक्क्यांहून अधिक असा घसघशीत परतावा दिला आहे. विद्यमान वर्षातील जून महिना मिड आणि स्मॉलकॅपसाठी सुगीचाच ठरला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस लांबलेला असला तरी जवळपास ४०० स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांनी दोन अंकी परतावा फक्त जून महिन्यात दिला.

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

एखादा शेअर नेमका कशामुळे वाढतो?

या प्रश्नाचे उत्तर वाटते तेवढे सोपे नाही. फक्त कंपनीचा नफा आणि विक्री यांचे आकडे, कंपनीचे बाजारपेठेतील स्थान, भविष्यकालीन गुंतवणूक आणि त्यावरील परताव्याचे गणित यामुळेच नेमका एखादा शेअर वाढतो हे आपण ठरवू शकत नाही. कारण मिडकॅप इंडेक्समधील अनेक कंपन्यांचा परतावा बघितल्यावर नेमका याच वर्षी या कंपन्यांनी असा काय नेत्रदीपक नफा नोंदवला आहे? असा प्रश्न पडणे सहाजिकच. शेअरच्या भावांमधील अचानक होणाऱ्या वाढीमागे एक कारण आहे, ते म्हणजे गुंतवणूकदारांनी त्या शेअरकडे मोर्चा वळवणे. गेल्या दोन ते तीन वर्षांत मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरला गुंतवणूकदारांनी महत्त्व द्यायला सुरुवात केली. मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंडदेखील जोरदार चर्चेत आहेत. या फंड योजनांमध्ये जमा झालेल्या पैशांचा फक्त मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर घेण्यासाठीच वापर करता येत असल्यामुळे शेअरची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून की काय मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांना सुगीचे नाही तर सोन्याचेच दिवस आले आहेत.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास ऑगस्ट महिन्यामध्ये वीस हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक म्युच्युअल फंडात झाली. यातील मिडकॅप तर स्मॉलकॅप फंडामध्ये गुंतवणूकदारांनी अनुक्रमे दोन हजार कोटी आणि चार हजार कोटी रुपये ओतले. एका खासगी गुंतवणूक दलाली पेढीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मिडकॅपपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकातील सुझलॉन, कोचीन शिपयार्ड, बीएसई, आरव्हीएनएल, माझगाव डॉक या कंपन्यांच्या शेअरमध्ये १२५ टक्के ते १७५ टक्के वाढ झाली. त्याचबरोबर जीटीएल इन्फ्रा, वेलस्पन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, गोदरेज प्रॉपर्टीज, आरईसी या कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील भरघोस वाढ दिसून आली आहे. निफ्टी आणि सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये झालेली वाढ आणि या मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेली वाढ या दोघांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्या कंपनीने समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना जाहीर केली, पुढील पाच ते सात वर्षे पुरेल एवढ्या कालावधीचे कंत्राट त्या कंपनीला मिळाले, परदेशातील कंपनीशी एखादा करार वगैरे झाला अशी ठळक कारणे असल्यास कंपनीच्या भावामध्ये सतत वाढ होत असते. पण मिड आणि स्मॉलकॅपमध्ये अशी वाढ होण्यास सर्वच कंपन्यांच्या बाबतीत अशी कारणे सापडणे कठीण आहे. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेणे आवश्यक आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये फक्त मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर असतील तर तो पोर्टफोलिओ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असायला पाहिजे. दिलेल्या तक्त्यामध्ये मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांशी संबंधित म्युच्युअल फंड योजनांमध्ये किती रुपये गुंतवणूक झालेली आहे हे दिले आहे.

· एचडीएफसी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी फंड : ४७,००० कोटींहून अधिक

· निप्पोन इंडिया ग्रोथ फंड १८,००० कोटींहून अधिक

· कोटक इमर्जिंग इक्विटी ३३,००० कोटींहून अधिक

· मिरे असेट मिडकॅप ११,००० कोटींहून अधिक

· निप्पोन इंडिया स्मॉलकॅप ३६,००० कोटींहून अधिक

· एचडीएफसी स्मॉलकॅप २२,५०० कोटींहून अधिक

काही निवडक म्युच्युअल फंड योजनांचे मागील तीन वर्षांचे परताव्याचे आकडे पुढीलप्रमाणे.

· क्वान्ट मिडकॅप फंड ३६ टक्के

· एचडीएफसी मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी फंड ३३ टक्के

· निप्पोन इंडिया ग्रोथ फंड ३२ टक्के

· कोटक इमर्जिंग इक्विटी फंड ३० टक्के

बाजारात मिड आणि स्मॉलकॅपमध्ये आलेली तेजी किती दिवस टिकून राहील हे येणारा काळच ठरवेल. जर बाजाराने एखादे मोठे वित्तीय संकट अनुभवले तर मिडकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये जशी तेजी आली त्या प्रकारे मंदीदेखील येऊ शकते. गुंतवणुकीच्या संदर्भातील कायम लक्षात ठेवावा असा नियम पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सांगायची वेळ जवळ आली आहे, तो म्हणजे आपल्याकडील सर्व पैसे एकाच प्रकारच्या पर्यायांमध्ये गुंतवायचे नसतात.

हेही वाचा – दिवस सुगीचे सुरू जाहले…

आपल्या पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉलकॅप हमखास असायला हवे यात काही शंकाच नाही. पण जर तुम्ही अल्प किंवा मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक करणार असाल तर जसे शेअर वाढतात तसे नफावसुली करणे आणि बाजारात करेक्शन म्हणजेच अल्पकालीन पडझड झाल्यावर पुन्हा त्यात चांगल्या कंपन्यांची खरेदी करणे हे धोरण यशस्वी गुंतवणूकदार म्हणून तुम्ही आचरणात आणायला हवे. लहानपणी वाचलेल्या एका गोष्टीमध्ये वाघाच्या गुहेमध्ये आत जाणाऱ्याचे ठसे दिसतात पण बाहेर येणाऱ्याचे ठसे दिसत नाहीत. तसेच आपल्या गुंतवणुकीबाबत चुकीचे निर्णय घेऊन एकदा हात पोळले तर पुन्हा आपल्याला शेअर गुंतवणूक करायलाच नको! अशी भावना निर्माण होते. तशी नकारात्मक भावना निर्माण होऊ नये यासाठीच हा लेखप्रपंच.

** या लेखात ज्या कंपन्यांच्या शेअरची, फंड योजनांची नावे आली आहेत ती फक्त उदाहरण म्हणून घेतली आहेत. गुंतवणूकदारांसाठी कोणत्याही प्रकारची खरेदीची शिफारस केलेली नाही. गुंतवणूकदारांनी जोखीम समजून घेऊन, आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊनच आपली गुंतवणूक करावी.