शेवियट कंपनी लिमिटेड
(बीएसई कोड – ५२६८१७)
वेबसाइट : http://www.groupcheviot.net
प्रवर्तक : बी डी कनोरिया
बाजारभाव : १,१८०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : बारदाने/ ज्यूट बॅग
भरणा झालेले भागभांडवल : रु. ५.८४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.८८
परदेशी गुंतवणूकदार ०.३३
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.१७
इतर/ जनता २४.६२
पुस्तकी मूल्य : रु. १,०८२
दर्शनी मूल्य : रु. १०/-
लाभांश : ५०%
प्रति समभाग उत्पन्न : रु. ९९.६२
किंमत उत्पन्न गुणोत्तर : ११.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : १४.४५
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०१
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १९६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई) : १०%
बीटा : ०.५
बाजार भांडवल : रु. ७१० कोटी (मायक्रो कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : १,६५३/९७३
गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने
वर्ष १८९७ मध्ये ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेली डेल्टा ज्यूट मिल्स कंपनी, १९७६ मध्ये बी डी कनोरिया यांनी ताब्यात घेऊन शेवियट कंपनी लिमिटेड (सीसीएल) नामाकरण केले. पश्चिम बंगालमधील सीसीएल ही कनोरिया कुटुंबाचा एक भाग आहे आणि शेवियट समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. कंपनी थ्री स्टार एक्सपोर्ट हाऊस म्हणून प्रमाणित असून ताग (ज्यूट), चहा आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. विशेष तागाचे तंतूपासून धागा आणि उच्च दर्जाचे हेसियन आणि कापड व त्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आणि निर्यात करते. कंपनी दरवर्षी ५० दशलक्षाहून ज्यूट पिशव्या/ पोती तयार करते. ज्या केवळ भारत सरकारद्वारे अन्नधान्याच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जातात. कंपनी आपली उत्पादने बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, इटली, अमेरिका, सौदी अरेबिया, तुर्की, जपान, इंडोनेशिया इ. देशांत निर्यात करते.
प्रमुख उत्पादन :
अ) ज्यूट :
कंपनी अमेरिका, नेदरलँड्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी उच्च दर्जाचे ज्यूट धागे, कापड, पोतं आणि जिओ-टेक्स्टाइल, फूड ग्रेड बॅग्ज आणि तांत्रिक कापड यांसारख्या उत्पादनांची निर्मिती करते.
ब) चहा :
कंपनीकडे १,५०० हेक्टर बिन्नाकंडी टी इस्टेट आहे. कंपनी गोल्डन हॉर्स ब्रँड नावाने ५०, १०० आणि २५० ग्रॅम पिशवीबंद चहाची विक्री करते. तसेच लिलाव केंद्रांमध्ये बिन्नाकंडी नावाने हा चहा विकला जातो. कंपनीचे पश्चिम बंगालमध्ये दोन उत्पादन प्रकल्प आहेत. बज-बज येथील प्रकल्पाची १६० मेट्रिक टन दैनिक उत्पादन क्षमता असून फाल्टा स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील निर्यातकेंद्रित युनिटमध्ये १०० हून अधिक ऑटोमॅटिक सल्झर लूम आहेत. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ४० टक्के महसूल निर्यातीतून येतो. कंपनीचा ३.१४ मेगावाॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह ऊर्जा प्रकल्पदेखील आहे.
मार्च २०२५ या आर्थिक वर्षांत कंपनीने ४६८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५७.७४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. तर यंदाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत २६ टक्के वाढ नोंदवून १२० कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८.७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेली अनेक वर्षे कंपनीने कामगिरीत सातत्य राखले आहे. कंपनीच्या उत्पादनांना देश-विदेशांत वाढती मागणी असून पर्यावरणाचा विचार करता ती अजून वाढेल अशी अपेक्षा आहे. आपल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनीने दोन वर्षांपूर्वी कंपनीने विव्हिंग युनिटदेखील चालू केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षांत कंपनी वाढीव उत्पादन क्षमतेने काम करेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी प्रवर्तक, उत्तम गुणवत्ता, अल्प भांडवल आणि कुठेही कर्ज नसलेली कंपनी असून त्याचा शेअर पुस्तकी मूल्याच्या जवळपास उपलब्ध आहे. म्हणूनच हा शेअर एक फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
- वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.