कर्मचारी निवृत्ती वेतन योजना (EPS) अंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज संपणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पात्र सदस्यांना उच्च पेन्शन पर्याय निवडण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जुलै २०२३ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून जास्त पेन्शनसाठी अर्ज केला नसेल, तर आज मुदत संपण्यापूर्वी हे काम पूर्ण करा. EPFO ​​ने आधीच दोनदा मुदत वाढवली आहे.

ऑनलाइन सुविधा उपलब्ध

कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, EPFO ​​ने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पर्याय/संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी पेन्शनधारक/सदस्यांकडून अर्ज प्राप्त करण्याची व्यवस्था केली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची अंतिम मुदत ३ मे २०२३ होती, ती २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा मुदत वाढवून ११ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली.

१.१६ टक्के अतिरिक्त पेमेंट घेतले जाणार

मे महिन्याच्या सुरुवातीलाच कामगार मंत्रालयाने हे स्पष्ट केले होते की, उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडणाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १.१६ टक्के अतिरिक्त योगदान EPFO ​​संचालित सामाजिक सुरक्षा योजनेत नियोक्ताच्या योगदानातून घेतले जाणार आहे. सध्या सरकार कर्मचारी पेन्शन योजनेत १५,००० रुपयांच्या मर्यादेत मूळ वेतनाच्या १.१६ टक्के योगदान अनुदान म्हणून देते. आतापर्यंत कर्मचारी EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा योजनेत १२ टक्के योगदान देतात, तर नियोक्ता १२ टक्के योगदान देतो. नियोक्ताने दिलेल्या योगदानापैकी ८.३३ टक्के योगदान EPS मध्ये आणि ३.६७ टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते.

हेही वाचाः २०७५ पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकेल : गोल्डमन सॅक्स

‘हे’ कर्मचारी उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडू शकतात

EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या वेतन मर्यादेपेक्षा ५००० रुपये किंवा ६५०० रुपयांपेक्षा जास्त वेतन योगदान दिले आणि EPS ९५ चे सदस्य असताना सुधारित योजनेसह EPS अंतर्गत निवड केली, ते उच्च पेन्शनसाठी पात्र असतील. तसेच वाढीव लाभासाठी पात्र सदस्यास आयुक्तांनी विहित केलेल्या अर्जामध्ये आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील.

हेही वाचाः ‘या’ चार भारतीय महिलांनी फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान, हे आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लगेच अर्ज करा

सर्व प्रथम ई-सेवा पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
आता होम पेजवरील पेन्शन ऑन हायर पर्यायावर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, जेथे येथे क्लिक करा पर्याय दिसेल.
येथे क्लिक करा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर UAN क्रमांक आणि इतर माहिती विचारली जाईल.
तुम्ही नियुक्त केलेल्या ठिकाणी UAN, नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पडताळणीसाठी एक ओटीपी येईल, तो देऊन पडताळणी करावी लागेल.