खर्च आणि पैसे यांची मिळवणी करणे हे एका यशस्वी होम मेकर पुढील टास्क असतं ! एप्रिल ते जुलै-ऑगस्ट हे महिने जरा कमी खर्चिक असतात, जसजसे श्रावण महिन्यातील सण सुरू होतात तसे खर्च वाढू लागतात ते अगदी दिवाळीपर्यंत ते सुरूच राहतात. आपण पैसे का कमावतो ? उत्तर सोपं आहे, खर्च करण्यासाठी, पण ते खर्च करताना तुम्ही स्मार्ट असलात तर नक्कीच आपलं बजेट आणि आपल्या मनात असलेली शॉपिंगची इच्छा मॅच होण्यास मदत होईल.

चला समजून घेऊ कसे करायचे स्मार्ट खर्च?

सप्टेंबरच्या सुरुवातीला पुढील तीन-चार महिन्यात जे सण-उत्सव, तुमच्या घरातील समारंभ असणार आहेत त्यांची एक यादी बनवा. प्रत्येक दिवशी आपल्याला सजावट, खाद्यपदार्थ, पाहुण्यांना देण्याच्या भेटवस्तू, प्रवास खर्च असे कोणते खर्च करावे लागणार आहेत याची सविस्तर माहिती लिहा.

याचे एक उदाहरण पाहूया,

दसरा या सणाच्या दिवशी तुमच्याकडे येणारे पाहुणे एकूण – सहा ; त्यातील पुरुष दोन , स्त्रिया दोन ज्येष्ठ नागरिक एक आणि एक लहान मुलगा. त्यांना देण्यासाठी भेटवस्तू कोणत्या घ्यायच्या ? दोन पुरुष व्यक्तीना परफ्यूमचे सेट, काकूंना एक पर्स/हँडबॅग, ताईसाठी इमिटेशन ज्वेलरी/स्मार्टवॉच, लहान मुलाला एक खेळणे/पुस्तक, आजोबा/आजी यांना थंडीसाठी शाल/पायमोजे. दुपारी जेवणाचा मेन्यू , काय असेल त्यात किती पदार्थ असतील, आपण किती पदार्थ घरी बनवणार आहोत आणि किती पदार्थ विकत आणणार आहोत ?

आता हा प्लॅन उलट झाला, जर तुम्हाला दसऱ्याला नातेवाईकांकडे जायचं असल्यास वरील खर्च तेच राहतील, फक्त जेवणाचा खर्च तुम्हाला करायला लागणार नाही, त्याऐवजी प्रवास खर्च करावा लागेल. त्यासाठी टॅक्सीला किती खर्च येईल याचा अंदाज घ्या. या पद्धतीने 4 महिन्याच्या गरजांचा अंदाज घ्या.

शॉपिंगचा प्लॅन बनवून मगच खरेदीला सुरुवात करा.

तुम्हाला येत्या काळात कोणत्या प्रकारचे कॉमन खर्च करायचे आहेत त्यांची यादी करा,म्हणजे ऑनलाइन किंवा होलसेल मार्केटमध्ये कॉम्बिनेशन डिल्स मध्ये खरेदी करता येईल.

खाद्यपदार्थ खरेदी करताना ऑनलाइन डिल्स स्वस्त मिळतात म्हणून बिस्किटे, चॉकलेट, तेल, तांदूळ, सुका मेवा या वस्तूंची जोरदार खरेदी केली जाते, मात्र खरेदी केलेल्या वस्तूंची Expiry Date वस्तू घरी आल्यावर लगेचच तपासून घ्या. त्या महिन्याभरात वापरायच्या असल्या तर त्या वाया जातात. यातील दुसरी बाजू म्हणजे अनावश्यक प्रमाणात खरेदी केली जाते, त्याची खरोखरच आवश्यकता नसते.

खरेदी ऑनलाइन का बाजारात जाऊन?

खरेदी करताना ऑनलाइन माध्यमातूनच अधिक स्वस्तात खरेदी होते असे गृहीत धरू नका, बऱ्याच वेळा शहरातील घाऊक बाजारात सणासुदीच्या आधी काही दिवस ‘सेल’ सुरू होतात, त्यात मिळणारे डील आणि ऑनलाइन याची तुलना करा. कदाचित ऑनलाइन पेक्षा दुकानात जाऊन तीच खरेदी स्वस्तात होऊ शकेल.

आणखी वाचा: Money Mantra: हार्वेस्टिंग मशीनचं पीक

खरेदी कुटुंब आणि मित्रांसोबत

सण-उत्सव साजरे करणे यात बरेचदा समान वस्तूंची खरेदी करावी लागेल, तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी यांचा एक ग्रुप करून सर्वांनाच एकत्र लागणाऱ्या वस्तू कोणीतरी एकाच मित्राने घाऊक खरेदी केल्या तर सगळ्यांनाच फायदा होतोच पण आपल्याकडे असलेला वेळ पण वाचतो.

आयत्यावेळी खरेदी नकोच !

मिठाई आणि नाशिवंत पदार्थ वगळता सगळी खरेदी आधीच करून ठेवली पाहिजे हे आपले टारगेट ठेवा, त्यामुळे आयत्यावेळी वायफळ खर्च टाळता येतो, नाईलाजाने महाग वस्तू घेणे टाळता येते.

क्रेडिट कार्ड्स वापरताय?

खरेदी करताना क्रेडिट कार्ड्स वापरण्याची आपली नवीन सवय आपल्याला पैशाची ताकद देते, अशावेळी सटासट कार्ड्स स्वाईप करून खरेदी केली जाते, तुमच्या कार्डच्या क्रेडिट सायकलचा अभ्यास करा.

तुम्ही अंदाजे किती खर्च करू शकणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला किती पगार आहे ? तुम्हाला कंपनीच्या वतीने किती बोनस मिळणार आहे ? तुम्ही एखादी एफडी मोडून, केलेली गुंतवणूक विकून खर्च करणार आहात का ? याचा पक्का गृहपाठ करून घ्या.

पुढील वर्षाची सोय यावर्षीच कशी कराल?

यावर्षी खर्चाचा अंदाज आला की एक रिकरिंग अकाउंट बँकेत उघडून घ्या, त्यात दर महिन्याला पैसे भरून पुढील वर्षी खर्चाला लागणारे पैसे थोडे तरी पैसे मिळतील याची खात्री असेल.

पैसे आपलेच, नियोजनही आपलेच !