करदात्याने कोणतीही भांडवली संपत्ती विकली तर त्याला भांडवली नफा किंवा तोटा होतो. भांडवली नफा हा करपात्र असतो तर तोटा हा इतर भांडवली उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यावरील भराव्या लागणाऱ्या करासाठी काही सवलती दिल्या आहेत. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावरील करबचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय नाहीत. दीर्घमुदतीच्या संपत्तीच्या भांडवली नफ्यावरील करबचतीसाठी घर, रोख्यांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय निवडल्यास करदात्याचे करदायित्व कमी करता येते किंवा संपूर्ण वाचविता येते. या सवलती कोणत्या आहेत? कोणत्या संपत्तीसाठी आहेत? त्यासाठी कोणत्या अटी आहेत? हे जाणून घेतले पाहिजे.

‘कलम ५४’ नुसार घरात गुंतवणूक :

एक घर (मूळ संपत्ती) विकून नवीन घरात गुंतवणूक केल्यास ‘कलम ५४’नुसार वजावट घेता येते. घर विकून झालेला भांडवली नफा करपात्र आहे. या कलमानुसार दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास नवीन घरातील गुंतवणुकीएवढीच वजावट मिळून बाकी रक्कम करपात्र असते. या कलमानुसार वजावट घेताना खालील अटींची पूर्तता करावी लागते.

१. ही गुंतवणूक मूळ संपत्ती विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्या तारखेपासून दोन वर्षात (खरेदी केल्यास) किंवा तीन वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे.

२. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदात्यांनाच मिळते.

३. ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली, त्यावर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, भांडवली नफ्याएवढी रक्कम भांडवली नफ्याअंतर्गत (कॅपिटल गेन) बँकेत जमा करावी लागते. या खात्यात पैसे मुदतीत जमा न केल्यास वजावट मिळत नाही. या खात्यातील पैसे नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठीच वापरता येतात. करदाता मुदतीत घर विकत घेऊ शकला नाही किंवा बांधू शकला नाही तर तीन वर्षानंतर ती रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते.

४. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते. याला एक अपवाद आहे, मूळ संपत्तीच्या विक्रीवरचा भांडवली नफा जर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याने एका ऐवजी दोन घरात गुंतवणूक केल्यास ती ग्राह्य धरली जाते. ही सवलत करदात्याने एकदा घेतल्यास पुन्हा त्याच्या जीवनकाळात परत घेता येत नाही.

५. या कलमानुसार खरेदी केलेले किंवा बांधलेले नवीन घर तीन वर्षात न विकण्याची अट आहे. काही कारणाने हे नवीन घर खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी (मूळ संपत्ती विकताना) घेतलेली वजावट रद्द होते. नवीन घराच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना पूर्वी घेतलेली भांडवली नफ्याची वजावट (मूळ संपत्तीच्या विक्रीवर) खरेदी किमतीतून वजा होते आणि त्यानुसार गणलेल्या दीर्घ किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो. आर्थिक नियोजन करताना या तरतुदीचा विचार न केल्यास जास्त कर भरावा लागू शकतो.

६. या कलमानुसार मिळणारी सवलत फक्त घर किंवा त्याला संलग्न जमीन विक्रीच्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यासाठी आहे. नुसती जमीन, दुकान किंवा व्यावसायिक जागेच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यासाठी नाही. तसेच या कलमानुसार वजावट घेताना नवीन घर हे मालकी असणे गरजेचे आहे. नवीन घर पागडी तत्त्वावर खरेदी केल्यास वजावट मिळत नाही, असे निवाडे आहेत.७. या कलमानुसार कमाल १० कोटी रुपयांपर्यंतचीच वजावट मिळते.

‘कलम ५४ ईसी’नुसार रोख्यांमध्ये गुंतवणूक :

ज्या करदात्यांनी जमीन किंवा इमारतीची (मूळ संपत्ती) विक्री केली आहे, अशांनी या कलमानुसार ठरावीक रोख्यांमध्ये गुंतवणूक करून त्याची वजावट घेतल्यास कर वाचू शकतो. ही वजावटसुद्धा दीर्घ मुदतीच्या भांडवली संपत्तीसाठी आहे. या कलमानुसार मूळ संपत्तीची विक्री केल्या तारखेपासून ६ महिन्यांत ठरावीक रोख्यांमध्ये दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याची गुंतवणूक केल्यास त्याची वजावट घेता येते. या ठरावीक रोख्यांमध्ये गुंतवणुकीला ५० लाख रुपये इतकी मर्यादा आहे. ही रोख्यांमधील गुंतवणूक पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षांच्या काळात ही गुंतवणूक रोख रकमेत परावर्तित केल्यास, ज्यावर्षी ती रोख रकमेत परावर्तित केली त्यावर्षीचा भांडवली नफा म्हणून तो करपात्र होईल. हे रोखे तारण ठेऊन कर्ज किंवा आगाऊ रक्कम घेतल्यास ‘कलम ५४ ईसी’मध्ये घेतलेली वजावट रद्द होते. या रोख्यांवर दरवर्षी ५.२५ टक्के दराने व्याज मिळते. हे व्याज करपात्र आहे. या कलमांतर्गत रुरल इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिअन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांनी रोखे आणले आहेत.

‘कलम ५४एफ’नुसार नवीन घरात गुंतवणूक :

हे कलमसुद्धा ‘कलम ५४’सारखे नवीन घरात गुंतवणूक करून वजावट घेण्याचे आहे. या दोन्ही कलमात फरक हा आहे की ‘कलम ५४’मध्ये फक्त निवासी घर आणि त्याला संलग्न जमीन यांची विक्री केल्यावर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर, नवीन घरात केलेल्या गुंतवणुकीची वजावट मिळते आणि ‘कलम ५४ एफ’नुसार कोणत्याही दीर्घ मुदतीच्या भांडवली संपत्तीची निवासी घर सोडून (मूळ संपत्ती) विक्री केल्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर सवलतीची ही तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये नवीन घरात गुंतवणूक केल्यास वजावट मिळते. पागडी तत्त्वावरील असणारे घर किंवा दुकान विकून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी या कलमानुसार गुंतवणूक करता येते. या कलमानुसार नवीन घर घेण्यासाठीचा कालावधी, भांडवली नफ्याच्या तरतुदी, वगैरे ‘कलम ५४’ प्रमाणेच आहेत. ‘कलम ५४ एफ’ या कलमानुसार काही अतिरिक्त अटींची पूर्तता करावी लागते.

१. ‘ कलम ५४ आणि कलम ५४ एफ’मध्ये फरक हा आहे की, ‘कलम ५४’नुसार एक घर विकून दुसऱ्या घरात गुंतवणूक करताना फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास कर भरावा लागत नाही आणि ‘कलम ५४ एफ’नुसार निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतवावी लागते. या कलमानुसार मूळ संपत्तीची संपूर्ण विक्री रक्कम (विक्रीखर्च वजा जाता) म्हणजेच निव्वळ विक्री किंमत नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. निव्वळ विक्री रकमेपेक्षा कमी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास नवीन घराचे मूल्य आणि विक्री किंमत याच्या प्रमाणात वजावट मिळते. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते.

२. करदात्याकडे मूळ संपत्ती विकण्याच्या तारखेला एकापेक्षा जास्त (नवीन घर सोडून) घरे असतील तर करदाता वजावट घेऊ शकत नाही,

३. करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर दोन वर्षाच्या आत कोणतेही घर खरेदी (नवीन घराव्यतिरिक्त) केले तर, किंवा करदात्याने मूळ संपत्तीच्या विक्रीनंतर तीन वर्षात कोणतेही घर बांधले (नवीन घराव्यतिरिक्त) तर ही वजावट रद्द होते.४. नवीन घर (ज्या घराच्या गुंतवणुकीवर वजावट घेतली होती) खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी घेतलेली वजावट रद्द होते.