भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने फोकस्ड फंड या फंड प्रकाराला वर्ष २०१७ मध्ये अस्तित्वात आणला. विविध फंड घराण्यांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या काही फंडाचे वर्गीकरण फोकस्ड फंड गटात केले, काही फंडांनी फोकस्ड फंडांचा नव्याने ‘एनएफओ’ आणला. एचएसबीसी फोकस्ड फंड २२ जुलै रोजी पाच वर्षे पूर्ण करीत आहे.

एल अँण्ड टी म्युच्युअल फंडाचे एचएसबीसी म्युच्युअल फंडाने अधिग्रहण केले. २५ नोव्हेंबर २०२२ पासून दोन फंड घराण्यांच्या विविध फंडांचे विलीनीकरण होऊन सध्याचे फंड अस्तित्वात आले. ‘सेबी’ने फंड सुसूत्रीकरणाचे नियम लागू केल्यापश्चात एप्रिल २०१८ पासून हे नवीन नियम लागू झाले. एप्रिल २०१८ पासून फोकस्ड फंड गटात अस्तित्वात असलेले १५ फंड आहेत, तर मागील ५ वर्षांपासून अस्तित्वात असलेले २० फोकस्ड फंड आहेत.

या २० फंडांचा पोर्टफोलिओ तपासाला असता, बहुसंख्य फोकस्ड फंड हे लार्जकॅप केंद्रित आहेत. सक्रियपणे व्यवस्थापित लार्ज-कॅप इक्विटी फंडांनी दिलेल्या परताव्याचा विचार केल्यास पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून अस्तित्वात आलेले २९ फंड आहेत. १ एप्रिल २०२० ते ३० जून २०२५ या कलावधीत ‘निफ्टी १०० टीआरआय’ने २५.११ टक्के वार्षिक परतावा दिला असून यापेक्षा अधिक परतावा देणारे केवळ ८ लार्जकॅप फंड आहेत.

तीन वर्षाच्या कालावधीतील वार्षिक परतावा तपासाला असता ८५ टक्के फंडांना मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविणे जमलेले नाही. म्युच्युअल फंड अभ्यासक या नात्याने फोकस्ड इक्विटी फंड तुमच्या पोर्टफोलिओमधील लार्ज-कॅप फंडांना पर्याय ठरू शकतात. या फंड गटाला कमाल ३० कंपन्यांत गुंतवणुकीचे बंधन आहे. परंतु सर्व मार्केटकॅप प्रकारात गुंतवणूक करण्याची आणि योग्य वाटेल ते प्रमाण ठेवण्याची अनुमती आहे. बहुसंख्य फोकस्ड फंडांनी त्यांच्या एकूण मालमत्तेच्या दोनतृतीयांश मालमत्ता लार्ज-कॅप कंपन्यांत ठेवली असल्याने फोकस्ड इक्विटी फंड काहीसे लार्ज-कॅप फंडाच्या धाटणीचे आहेत.

सप्टेंबर २४ ते मार्च २५ या मोठ्या घसरणीनंतर बाजार बऱ्यापैकी सावरला आहे. पुनरुज्जीवित झालेल्या बाजारात लार्ज-कॅप केंद्रित असलेल्या आणि विस्तृत बाजार निर्देशांकापेक्षा अधिक परतावा कमाविण्यात यशस्वी झालेल्या फोकस्ड फंडांत एचएसबीसी फोकस्ड फंडाचा समावेश होतो. फोकस्ड फंड दीर्घकालीन बचत करू इच्छिणाऱ्या आणि सरासरीपेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे.

एचएसबीसी फोकस्ड फंड त्याच्या फंड गटात सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळविलेला फंड आहे. मूळ एल अँण्ड टी फोकस्ड इक्विटी फंड ऑक्टोबर २०१८ मध्ये अस्तित्वात आला. तर एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंड हा दोन करोना लाटांच्या दरम्यान जुलै २०२० मध्ये अस्तित्वात आला. या दोन फंडाचे विलीनीकरण होऊन सध्याचा फंड २५ नोव्हेंबर २०२२ रोजी अस्तित्वात आला. एचएसबीसी फोकस्ड फंडाची (नवीन नाव इक्विटी हा शब्द वगळण्यात आला आहे) १,७२० कोटींची आहे. एल अँण्ड टी फोकस्ड इक्विटी फंडाच्या सुरुवातीला सौमेंद्र्नाथ लाहिरी आणि विहंग नायक हे निधी व्यवस्थापक होते. तर एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाची धुरा निलोत्पल सहानी यांच्याकडे होती. गेल्या पाच वर्षाच्या काळात फंडाला ६ निधी व्यवस्थापक लाभले.

सध्या या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा निलोत्पल सहानी आणि सोनल गुप्ता यांच्याकडे आहे. या फंडाने एक तिमाही वगळता सातत्याने त्याच्या मानदंड सापेक्ष सरस कामगिरी केली असल्याने, हा फंड पाच ते सात वर्षे कालावधीसाठी ‘एसआयपी’ मार्गाने गुंतवणूक करण्याचे एक चांगले साधन आहे. गेल्या एक, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीतील ‘पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न’चा विचार केला तर, एचएसबीसी फोकस्ड फंडने त्याच्या मानदंड असलेल्या ‘निफ्टी ५०० टीआरआयला’ ५ ते ७ टक्क्यांनी मागे टाकले आहे.

जानेवारी २०२१ ते जून २०२५ या कालावधीतील फंडाने २४.२२ टक्के वार्षिक परतावा मिळविला आहे याच कालावधीतील तीन वर्षांच्या ‘रोलिंग रिटर्न‘’चा विचार केला तर, फंडाने त्याच्या ‘बेंचमार्क’पेक्षा ६८ टक्के वेळा मानदंड सापेक्ष सरस कामगिरी केली आहे. वरील कालावधीत फंडासाठी सरासरी तीन वर्षांचा ‘रोलिंग रिटर्न’ २२ टक्के आहे, ज्यामुळे तो फोकस्ड फंड गटात सर्वोत्तमपैकी कामगिरी असणाऱ्या पहिल्या पाचातील एक फंड आहे. याच कालावधीत ‘निफ्टी ५०० टीआरआय’ने १८.४२ टक्के वार्षिक परतावा मिळविला आहे. मागील एक वर्षात फंडाने १०.६६ टक्के ‘एसआयपी’ परतावा मिळविलेला आहे, तर मागील पाच वर्षात १६.९३ टक्के ‘एसआयपी’ परतावा मिळविलेला आहे.

जुलै २०२२ ते जून २०२५ दरम्यानची आकडेवारी असे सांगते की, फंडाचा ‘अपसाइड कॅप्चर रेशो’ १०२.२ आहे, म्हणजेच तो तेजीदरम्यान मानदंड ‘निफ्टी ५०० टीआरआय’पेक्षा थोडा जास्त परतावा देतो तर ‘डाउनसाइड कॅप्चर रेशो’ फक्त ७८.७ आहे, जो सूचित करतो की, बाजाराच्या घसरणीदरम्यान फंडाच्या ‘एनएव्ही’त कमी घसरण होते. एचडीएफसी फोकस्ड फंड या श्रेणीसाठी असलेल्या आदेशानुसार २५-२७ कंपन्यांत गुंतवणूक करतो. तथापि, आघाडीच्या ४ कंपन्या वगळता सर्व कंपन्यांतील गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत नव्याने सूचिबद्ध झालेल्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा समावेश आहे. फंडाच्या पोर्टफोलिओ लार्ज-कॅप केंद्रित आहे.

व्यापक बाजारपेठेतील संधींमुळे अलीकडच्या काळात लार्जकॅपचे प्रमाण आधीच्या तुलनेत कमी झाले आहे. सध्या ७० टक्के फंडाची गुंतवणूक लार्ज-कॅपमध्ये आहे. एकूण गुंतवणुकीच्या १५ टक्के मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्या असून ७ टक्के रोकड २.२५ टक्के ‘ट्रेप्स’ ५ टक्के चालू मालमत्ता आहे. फंडाच्या आघाडीच्या चार गुंतवणुका बँक आणि वित्तीय सेवा आहेत. मूल्यांकन आणि उद्योग गतिमानतेच्या (बिझनेस डायनॅमिक्स) आधारावर निधी व्यवस्थापकांनी इतर क्षेत्रांतील कंपन्यांची निवड केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पर्धक निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज यांसारख्या वेगळ्या कंपन्या फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. एकंदरीत, पोर्टफोलिओला सुरक्षित ठेवण्यासाठी मूल्य आणि वृद्धी यांचे मिश्रण पोर्टफोलिओ बनवताना घेतल्याचे दिसते. या फंडाचा जोखीम समायोजित परतावा फंड गटाच्या सरीसरीपेक्षा अव्वल आहे. हा फंड पाच ते सात वर्षे कालावधीसाठी ‘एसआयपी’ मार्गाने गुंतवणूक करण्याचे एक चांगले साधन आहे.