scorecardresearch

Money Mantra: गृहकर्ज घेताना काय करावं? काय टाळावं?

उत्तम पगाराची नोकरी असते तेव्हा अनेक तरुण गृहकर्ज घेण्याचा विचार करतात. पण तेवढंच पुरेसं नसतं अनेकदा नोकरीची ठिकाणं बदलतात, कधी नोकरी जाते याशिवायही अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे कर्ज घेतना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. तर काय करावं आणि काय टाळावं?

what to do what to avoid while taking a home loan
गृहकर्ज घेताना काय करावं? काय टाळावं? (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

स्वतःच घर घेणं हे जवळपास प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं. आपल्या मागच्या पिढीतील माणसं नोकरीतून निवृत्त झाल्यावर स्वतःचं घर बांधत. त्यासाठी ते आपला प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, निवृत्त होताना मिळणारे काही अधिक भत्ते यांचा उपयोग करीत, त्याचबरोबर आयुष्यभर केलेली बचत, स्वतःचं घर बांधण्यासाठी वापरली जात असे. हे पैसे अपुरे पडल्यास गृहिणींसाठी केलेले सोन्याचे दागदागिने विकून सुद्धा पैसे उभे केले जात. घरासाठी कर्ज घेण्याचा प्रघात जवळपास नव्हता. परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षात मात्र कर्ज घेणं हा घर खरेदी करण्यामधील एक सर्वात महत्वाचा भाग झाला आहे.

आजचा तरुण स्वतःच घर घेण्यासाठी निवृत्तीची आणि त्यावेळी मिळणाऱ्या पैशांची वाट न पाहता नोकरी किंवा व्यावसायिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच स्वतःच घर घेतो. त्यासाठी बँकेकडून आवश्यक तितकं कर्जही घेतो. बँक आणि आर्थिक संस्था अशा तरुणांना कर्ज द्यायला उत्सुक असतात. सर्वसाधारणतः गृहकर्ज पाच, दहा, पंधरा किंवा त्याहीपेक्षा अधिक काळासाठी घेतलं जातं. म्हणजेच गृह कर्ज घेतल्यावर आपल्या आयुष्यातला प्रदीर्घ काळ ते कर्ज फेडण्यात जाणार असतो. घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरता आले नाहीत तर ते घर आयुष्यभर ताण आणि मनस्ताप देत राहत. परंतु, वेळेत हप्ते देऊन कर्ज योग्य वेळी फेडलं तर आपलं घर ही आपली सर्वात फायदेशीर आणि आयुष्यभर उपयुक्त ठरणारी गुंतवणूक ठरते.

heart attack right chest pain Know the signs and symptoms Warning Signs of a Heart Attack
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते ‘हे’ हार्ट अटॅकचे लक्षण? वेळीच व्हा सावध अन् लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला
Things Mother Should Keep In Mind
Parenting Tips: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी प्रत्येक आईला माहीत असल्या पाहिजेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
What Happens To Body If You Eat Dry Fruits Kaju Badaam Manuka Everyday Health Expert Tells Benefits What to Do and Not
तुम्ही रोज काजू, बदाम, मनुक्यासारखा सुकामेवा खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
okra bhindi ladys finger twice a week bhindi benefits 10 Amazing Nutrition and health Benefits of Lady Finger
भेंडीची भाजी आठवड्यातून किती वेळा खावी? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याबाबत अन् भेंडी खाण्याचे फायदे …

गृहकर्ज फेडताना आपल्यावर कोणताही अतिरिक्त तणाव येऊ नये आणि घरामध्ये केलेली गुंतवणूक आनंदी आणि फायदेशीर ठरावी यासाठी गृहकर्ज घेताना अनेक अंगानी सखोल विचार करणं आवश्यक आहे.

गृहकर्ज घेताना तीन पातळ्यांवर विचार करावा :

१. स्वतःच्या परिस्थितीच नेमकं मूल्यमापन
२. गृहकर्जापासून मिळू शकणारे विविध फायदे
३. गृहकर्ज देणाऱ्या विविध बँकांचे व्याजदर व त्या देत असलेल्या सुविधा आणि घालत असलेले नियम

गृहकर्ज घेताना सर्वप्रथम आपण घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ, आणि मानसिकदृष्ट्या कणखर आहोत का याचं स्वतःच तटस्थपणे मूल्यमापन करणं गरजेचं आहे. बरेच तरुण नोकरी मिळाल्यावर साधारण वर्ष-दोन वर्षामध्ये घर घेण्याचा विचार करतात. भाड्याने घर घेऊन राहणारे तरुण तर घराचं भाडं भरण्याऐवजी गृहकर्ज घेऊन घर विकत घेऊन कर्जाचा इएमआय भरला तर कर्ज फिटल्यावर स्वतःच्या मालकीचं घर झालं… असाही विचार करतात. ते योग्यही आहे, परंतु आपल्याला याच नोकरीत कायम राहायचं आहे का याचा सुद्धा विचार करावा. बऱ्याच वेळा त्या तरुणाचं त्या वेळच्या नोकरीमुळे ज्या शहरात वास्तव्य असतं त्याच शहरात घर घेण्याचं तो ठरवतो. बँकसुद्धा त्याच शहरात घर घेण्यासाठी अधिक सहजतेने कर्ज देते. पण आपण जिथे घर घेतो आहोत त्याच शहरात आपल्याला कायमच स्थायिक होण्याची इच्छा आहे का आणि ते शक्य आहे का याचा सुद्धा सांगोपांग विचार करावा.

हेही वाचा… Money Mantra : कॉर्पोरेट एफडी आणि बँक फिक्स डिपॉझिटमध्ये फरक काय?

२००८ च्या सुमाराला पुण्याजवळ हिंजेवाडी मध्ये ‘इन्फर्मेशन टेकनॉलॉजी पार्क’ उभं राहत होतं. आयटी क्षेत्रातल्या अनेक नामवंत कंपन्यांनी तिथे आपली कार्यालयं सुरु केली होती . या क्षेत्रातील कंपन्या अनेक तरुणांना भरपूर पगाराच्या नोकऱ्या देऊन आपल्या सेवेत रुजू करून घेत होत्या. दिल्ली, बंगाल, ओरीसा, राजस्थान या सारख्या दूरदूरच्या राज्यातून तरुण येथे नोकरीसाठी येत होते. त्याच वेळी जवळपासच्या आकुर्डी, निगडी सारख्या गावांमध्ये वसाहती उभ्या रहात होत्या. भरपूर पगार मिळवणाऱ्या या तरुणांना ते बंगले विकत घेण्यासाठी कर्ज द्यायला बँका तत्पर होत्या. त्या तरुणांना त्यावेळी मिळत असलेल्या पगारात बँकेचा इएमआय भरणं सहज शक्य होतं. त्या तरुणांनी बँकेककडून मोठी कर्ज घेऊन बंगले विकत घेतले.

काही वर्ष सर्वसुरळीत चाललं. त्यानंतर आयटी उद्योगाला आलेला बहर ओसरू लागला. अनेक तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पाठोपाठ आलेल्या कोविड महासाथीत बहुसंख्य तरुणांना पुणे सोडून आपल्या मूळ शहरात परत जावं लागलं. त्या बंगल्याचा त्यांना आता काहीच उपयोग नव्हता. ते बंगले त्यांना अत्यंत कमी किमतीत विकावे लागले. त्यामुळे बंगले विकून सुद्धा त्यापैकी बहुसंख्य तरुण आजही बँकेचं कर्ज फेडू शकलेले नाहीत. त्यांच्या मागे बँकेचा कर्ज वसुलीचा ससेमिरा लागला आहे. बँक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याकडून कर्ज वसूल करत आहे. आपली नोकरी स्थिर आहे का? आणि ‘आपल्याला या दूरच्या राज्यात लगेच घर घेण्याची आवश्यकता आहे का?’ या दोन मुद्यांचा विचार न करता गृहकर्ज घेतल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली.

गृहकर्ज देताना घराच्या किमतीपैकी साधारण दहा ते वीस टक्के रक्कम कर्जदाराने स्वतः भरावी अशी अपेक्षा बँक करते. घराच्या एकूण किमतीतून तितकी रक्कम वजा करून उरलेल्या रकमेचं कर्ज बँक देते. म्हणजे समजा आपल्याला पन्नास लाख रुपयांचं घर खरेदी करायचं असेल तर आपल्याकडे किमान दहा लाख रुपये जमा असणं आवश्यक असतं. जर इतकी रक्कम जमा नसेल तर तितक्या रकमेचं पर्सनल लोन किंवा अन्य प्रकारचं कर्ज घेऊन ती रक्कम उभी करण्याचा विचार केला जातो. मात्र हे टाळावं! गृह कर्जाच्या हप्त्यांबरोबरच दुसऱ्या कर्जाचे हप्ते देणं अतिशय अवघड होऊन बसतं. त्यामुळे अपेक्षित असलेली रक्कम भरण्या इतकी आर्थिक क्षमता आपली असेल तरच गृहकर्ज घ्यावं.

गृहकर्ज घेतलं की प्रत्येक महिन्याला आपल्या उत्पन्नातील एक ठराविक रक्कम इएमआयसाठी बाजूला काढून ठेवावी लागते. त्यामुळे आपल्या इतर खर्चांवर मर्यादा येतात. अनेक आवडींना मुरड घालावी लागते. हे कर्ज दीर्घ मुदतीचा असतं. इतका दीर्घकाळ मर्यादित खर्च करत रहाणं आणि आपल्या हौस आणि मौजेला मुरड घालत रहाणं त्रासदायक वाटू शकत. त्यामुळे गृहकर्ज घेतानाच या गोष्टीचा प्रगल्भपणे विचार करावा. गृहकर्ज घेण्यापूर्वी ते कर्ज फिटेपर्यंत काहीसा संयमित खर्च करण्याची आपली आणि आपल्या कुटुंबीयांची मानसिक तयारी आहे, याची खात्री करून घ्यावी.

गृहकर्ज घेतल्यानंतर करामध्ये सवलत मिळते हा गृहकर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. तसेच स्वतः जवळचे सर्व पैसे घर घेण्यात गुंतवले तर अनपेक्षितपणे आलेल्या अडीअडचणींसाठी आपल्याला पर्सनल लोन किंवा तत्सम एखादं कर्ज घ्यावं लागतं, या कर्जाचा व्याजदर गृहकर्जाच्या व्याजदरपेक्षा कितीतरी अधिक असतो. तसेच आपल्या जवळचे पैसे शेअर किंवा तत्सम इतर ठिकाणी योग्य रीतीने गुंतवल्यास आपण गृहकर्जाच्या व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा अधिक पैसे कमवू शकतो. त्यामुळे घर खरेदी करताना गृहकर्ज घेणं फायद्याचं ठरू शकतं.

हेही वाचा… Money Mantra : आयुर्विमा पॉलिसी आणि क्लेम सेटलमेंटचं गणित

आपलं उत्पन्न उत्तम असेल आणि घर घेण्यासाठी गृहकर्जाखेरीज आवश्यक असलेली १० ते २० % रक्कम भरायची आपली तयारी असेल तर अनेक बँका आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार असतात. कर्ज घेण्यासाठी बँकेची सुयोग्य निवड करणं सुद्धा आवश्यक असतं. गृहकर्ज देणाऱ्या बँकांचे प्रामुख्याने एसबीआय सारख्या सरकारशी संलग्न बँका आणि कोटक महिंद्र किंवा यस बँके सारख्या खाजगी बँका असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सरकारशी संलग्न बँका आणि खाजगी बँका यांच्या व्याज दरात तफावत असते. आजच्या दिवशी तीस लाख रुपयांपर्यंतच्या
गृहकर्जावर स्टेट बँक ऑफ इंडिया ८.४% व्याजदर आकारते तर कोटक महिंद्रसारखी खाजगी बँक ८.% व्याज दरानं गृहकर्ज देते आहे.

गृहकर्जासाठी बँक निवडताना व्याज दर हा महत्वाचा निकष असला तरी फक्त त्या एकाच निकषावर बँक निवडू नये. कर्ज देण्यासाठी बँक आकारत असलेलं शुल्क, बँकेची कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यातील तत्परता, कर्ज देण्यासाठी बँक मागत असलेली कागदपत्रे आणि घालत असलेल्या अटी, मुदतपूर्व कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असलेला किमान कालावधी, मुदतपूर्व कर्ज फेडीसाठी बँक आकारत असलेलं शुल्क, एखादा इएमआय न भरल्यास अथवा उशिरा भरल्यास बँक आकारत असलेली लेट फी आणि दंड, बँकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि बँकेच्या शाखेचं आपल्या निवासस्थानापासून अथवा कार्यालयापासूनच्या अंतराची सोयिस्करता या सर्व लहान मोठ्या घटकांचा सर्वांगीण विचार करून बँक निवडल्यास गृहकर्जाने येणारा ताण कमी होऊन कर्ज मिळवणं आणि ते फेडणं सहज आणि सोपं होऊन जातं.

आपण कितीही उंच शिखरावर पोहोचलो तरीही त्या प्रवासाची सुरुवात स्वतःच्या घरातून झालेली असते. गृहकर्ज घेणं म्हणजे एक प्रकारे आपलं स्वतःच घर निर्माण करण्यासाठी सुरु झालेला प्रवास प्रवास असतो. सखोल आणि सर्वांगीण विचार करून केला की तो प्रवास आनंददायक आणि यशस्वी होतो!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know what to do and what to avoid while taking a home loan mmdc dvr

First published on: 20-11-2023 at 18:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×