भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार आता प्रत्यक्षात आला आहे. युरोपबरोबरच ब्रिटनशी आपले व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘फ्री ट्रेड’ म्हणजे ‘मुक्त व्यापार करार’ यामध्ये दोन देश एकमेकांकडून ज्या वस्तू विकत घेतात म्हणजेच आयात-निर्यात करतात त्यावर भरमसाट कर लागले जात नाहीत. आपण मागे ‘बाजार रंग’मधून तीन लेखांच्या माध्यमातून व्यापार युद्ध हा भाग पाहिला आहे. काहीसे याच्या पूर्णपणे विरुद्ध याचे स्वरूप आहे. यामध्ये दोन देश एकत्र येऊन व्यापारासाठीच्या मैत्रीचा हात पुढे करतात. ब्रिटनशी झालेला हा करार भारतासाठी दीर्घकालीन महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या विचार करायचा झाल्यास दोहोंमधील व्यापार म्हणावा एवढा जास्त नाही. विशेषतः भारत आणि अमेरिका व भारत आणि चीन यांच्यामध्ये जेवढा व्यापार होतो तेवढा ब्रिटनशी होत नाही. आता बदललेल्या व्यापारी सूत्रानुसार हा व्यापार नवनवीन उद्योगांमध्ये येण्यास सुरुवात होईल. ‘विकसित भारत’ या आपल्या रणनीतीचा भाग म्हणून भारतात वस्तू बनवण्यासाठीच्या उपक्रमाला पुन्हा एकदा गती द्यायचे ठरविले आहे. ब्रिटनचा विचार करायचा झाल्यास जगातील अन्य देशांपेक्षा भारताशी कमी असलेल्या व्यापार वाढवण्याची त्यांची मन:स्थिती आता तयार झाली आहे. व्यापार वाढल्यावर आपोआपच त्याचा थेट ‘जीडीपी’मध्ये वाढीच्या रूपात फायदा होत असतो.भारताचा विचार करायचा झाल्यास भारताला ब्रिटनकडून आयात केल्या गेलेल्या वस्तूंवरचा कर कमी करून तो कमीत कमी ठेवावा लागणार आहे. जवळपास ९० टक्के वस्तूंवरचा कर आता कमी होणार आहे. ब्रिटनच्या बाजूने या करारामध्ये वाहन उद्योग समाविष्ट करण्यात आला आहे, यामुळे स्वस्तातील वाहने भारतात येऊ शकतील. याचबरोबर भारतातील इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड वाहने कोटा यंत्रणेच्या माध्यमातून ब्रिटनला जातील. भारत सरकारने ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सरकारी उपक्रमांसाठी लागणारी उत्पादने परदेशी कंपन्यांनी भारतात बनवावीत असे धोरण आखले होते. ताज्या करारानंतर परदेशातून येणारी उत्पादने भारताच्या बाजारांमध्ये निर्माण करण्याला म्हणजेच प्रत्यक्ष कारखाने स्थापन करून विकण्याला प्राधान्य मिळेल. एका उदाहरणाने समजून घेऊ.
सरकारी उपक्रमांसाठी खरेदी करताना मेक इन इंडियाच्या अंतर्गत ५० टक्के किंवा जास्त स्थानिक पातळीवर बनवलेला माल हवा अशी अट होती. आता नवीन कराराने ब्रिटनमधील कंपन्या पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, ऊर्जा निर्मिती, शिक्षण, वाहतूक आणि संरक्षण क्षेत्र यामध्ये आपली गुंतवणूक भारतात वाढविण्यास सुरुवात करतील. त्यांनी मोठे कारखाने सुरू केल्यावर त्यांच्यासाठी लागणारे सुटे भाग भारतातील मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांनी बनवावेत अशी यामागे प्रेरणा आहे. अर्थातच या सगळ्याची ही सुरुवातच आहे. पाच ते सात वर्षानंतर या कराराची फळ दिसायला सुरुवात होईल.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील सदर कराराने उच्च दर्जाचे मद्य आणि जीन यावरील कर १५० टक्क्यांवरून कमी करून ७५ टक्के आणि दहा वर्षानंतर अवघा ४० टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतातील मद्य निर्मिती कंपन्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
भारतासाठी असे दीर्घकालीन व्यापारी संबंध महत्त्वाचे आहेतच. पण युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला लागलेली धक्के पचविणे हे अजूनही त्यांना तितकेसे जमले नाही आणि म्हणून भारत हा ब्रिटिशांचा विश्वासू व्यापारी देश होण्याच्या मार्गावर आहे.
युद्ध ज्वर आणि विराम!
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश असल्याने एका मर्यादेपर्यंत युद्ध वाढेल याची शक्यता नव्हतीच. ताज्या युद्धविरामानेच हेच सिद्ध केले. फायदा दिसला की बाजार पुन्हा एकदा वरच्या दिशेला जाणार यात शंकाच नाही. जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी कंपन्यांची आलेली आकडेवारी व नव्या तोट्याचे आकडे बघता मार्केट आणि पैसा कुठेही जाणार नाहीत! आपण २०२५ साली भारतीय शेअर बाजाराकडे जुन्या शेअर बाजारांसारखे बघता कमा नये. संधी आहे म्हणून पोर्टफोलिओमध्ये कोणताही मोठा बदल करू नये असे नाही. पण तुमच्या पोर्टफोलीओतील डेट म्हणजेच स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुक पर्यायांचा विचार सुरू करता येईल. दहा वर्षाचा ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ असणाऱ्यांनी तो थांबवण्याची घाई करू नये. निफ्टी पुन्हा एकदा २४,००० वर आल्याने तो आणखी खाली जाईल ही भीती आहे. मात्र बाजार फक्त युद्धाच्या बातम्यांवर नाही तर कंपन्यांच्या नफ्यात तोट्यावर चालतात हे विसरू नका.