मागील आठवड्यात खूप दिवसांनी माझ्या मित्र-मैत्रिणींचा चमू एकत्र जमला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी वेगवेगळी व्यक्तिमत्त्व एकत्र येऊन मस्त गप्पा मारत होती. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, आव्हानं वेगळी आणि कामगिरीसुद्धा वेगळी. पुढे काय करणार याबाबत मात्र दोन मतं होती-काही जणांना नोकरीतील अस्थिरता जाणवत होती आणि म्हणून पुढे काय करायचं यावर सतत विचारमंथन चालू होतं, तर दुसरीकडे असेही काही लोक होते जे पुढचं पुढे बघू म्हणून शांत होते. परंतु एका बाबतीत मात्र सर्वांचं एकमत होतं की, आपली नोकरी आपल्या वयाच्या पन्नाशीपलीकडे टिकणं कठीण आहे. यावर अजून चर्चा वाढली तशी ही प्रकर्षाने जाणवणारी कारणं लक्षात आली. कमी वयात आलेला क्षीण (मानसिक आणि शारीरिक) ज्याला आपण ‘Burn Out’ म्हणतो, नवीन पिढीकडून प्रत्येक वर्षी वाढणारी स्पर्धा, कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक मंदी आणि कंपन्यांकडून राबवले जाणारे महागाई प्रतिसादात्मक उपक्रम. कारण काहीही असो, पण परिस्थिती कठीण आहे हे नक्की. सर्वसाधारणपणे ४०-५० या वयोगटातील कुटुंबांमध्ये मुलं अजून शिकत असतात. काही ठिकाणी गृहकर्जाचे हफ्ते चालू असतात तर काही ठिकाणी वयस्कर मंडळींची जबाबदारी वाढलेली असते. तेव्हा आपल्या नोकरीसंबंधी निर्णय घेणं तेवढं सोप्पं नसतं, जेवढं ते २०-३० च्या वयात असतं. या मोठ्या बदलासाठी स्वतःची आणि कुटुंबाची मानसिक आणि आर्थिक तयारी वेळीच केलेली बरी म्हणून आजचा हा लेख.
आज आपण सर्वत्र पाहात आहोत की, जागतिक मंदीच्या नावाखाली अनेकांना कामावरून कमी केलं जात आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘टीसीएस’, ‘गूगल’सारख्या नामवंत मोठ्या कंपन्यांनी मागील काही महिन्यांत हजारोंच्या संख्येने नोकऱ्या कमी करण्याचं जाहीर केलं आहे. वाढलेली महागाई, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, कमी होणारी मिळकत या सर्व कारणांमुळे कंपन्यांचा नफा कमी होतोय. येत्या काळात तो अजून कमी होईल. त्यावर सर्वात पहिला उपाय काय – खर्च कमी करणे आणि त्यात पहिला क्रमांक असतो तो मनुष्यबळाच्या खर्चाचा. अशा वेळी सामान्य कौशल्य लागणाऱ्या नोकऱ्यांना पहिला फटका बसतो. स्वस्तात मिळणारं तरुण कौशल्य निवडलं जातं, मध्यम व्यवस्थापन (Middle Management) कामात कपात केली जाऊन कंपन्या अधिकाधिक सपाट अधिकारी रचनेसाठी (Flat Structure Organisation) तयार होतात. अर्धवेळ (पार्ट-टाइम) आणि कंत्राटी काम करणारे लोक वाढतात. जेणेकरून कंपनीला मिळकत कमी होत असेल तर पगाराचा खर्चसुद्धा कमी ठेवता येतो. कधी काम वाढलं तर अधिक लोक कामावर न ठेवता अशा प्रकारच्या लोकांकडून कामं करून घेता येतात.
अशी परिस्थिती असल्यास आपल्याकडे काही पर्याय असतात-पहिला पर्याय म्हणजे नवीन नोकरी शोधणं आणि त्यासाठी जो काही कौशल्य विकास करावा लागेल तो वेळीच करणं, दुसरा पर्याय म्हणजे जिथे काम करत आहोत तिथेच पुढे जाण्यासाठी/वाढीव जबाबदारीसाठी प्रयत्न करणे, तिसरा म्हणजे स्वतःच्या कौशल्यांचा व्यवस्थित विचार करून नवीन व्यवसायाची सुरुवात करणं आणि अगदी शेवटचा पर्याय म्हणजे जमेल तोवर आहे त्या ठिकाणी आणि त्याच कामात टिकून राहणं. यापैकी कोणताही पर्याय स्वीकारला तरी त्यासाठी आर्थिक नियोजन हे झालंच पाहिजे. तेव्हा खालील गोष्टींची तरतूद ठेवल्याने असा काळ सोयीस्कर करता येतो:
१. योग्य विमा कवच – आयुर्विमा आणि आरोग्य विमा हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. नोकरी गेल्यास किंवा व्यवसायाची नवीन जबाबदारी घेतल्याने कुटुंबाचं आर्थिक अवलंबित्व वाढतं. दुर्दैवाने कोणाला आजारपण आलं किंवा अनपेक्षित जीवित हानी झाली तर हे विमा कवच कुटुंबाला आर्थिक आधार देतं. अनेकदा आपण कंपनीतील विमा पॉलिसी घेऊन शांत बसतो. परंतु नोकरी गेली तर हे कवच उपलब्ध होत नाही. वय वाढल्यावर आरोग्याच्या कुरबुरी सुरू झाल्यावर आरोग्य विमा मिळवतानासुद्धा त्रास होतो.
२. कर्ज व्यवस्थापन – आपल्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि नोकरी गेली किंवा व्यवसाय सुरू केला तर हा नियमित असणारा खर्च कसा भागणार हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. राहत्या घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना आपली गुंतवणूक कमी ना करता एकीकडे नियमित हफ्ते भरून, दुसरीकडे आपली गुंतवणूक चांगले परतावे कसे देईल यावर लक्ष ठेवावं. ८ टक्के ते ९ टक्के दराने कर्ज घेतल्यास गुंतवणुकीतील परतावा ११ टक्के ते १२ टक्के असेल तर उत्तम, पण गुंतवणुकीतील परतावा कमी असल्यास कुटुंबाचं रोख व्यवस्थापन (Cash Management) तपासावं. एकदा कर्ज फेडलं की मोठी रक्कम हातातून जाते आणि जर गुंतवणूक पुरेशी नसेल तर पुढचे खर्च भागवणं कठीण होईल. आज आपल्या आजुबाजूला अशी अनेक उदाहरणं आपण बघतो जिथे निवृत्ती जवळ असताना शैक्षणिक कर्ज घेतली गेली आहेत. मुलांना कमी पगाराच्या नोकऱ्या मिळाल्याने कर्जाची परतफेड करताना नाकी नऊ येत आहेत. तेव्हा कर्जावर जेवढं जास्त नियंत्रण असेल तेवढं उत्तम.
३. स्थलांतर – मागील काही वर्षांपासून परदेशी गेलेली अनेक कुटुंबं मायदेशी परत यायचा विचार करत आहेत. अमेरिकेत व्हिसामुळे अनेक जणांना नोकरीची खात्री देता येत नाहीये. कधी कधी कुटुंबातील वयस्कर सदस्यांची जबाबदारी असल्यामुळेसुद्धा असे निर्णय घ्यावे लागतात. अशा कुटुंबांना तर त्यांच्या आर्थिक आराखड्याबाबत अजून जास्त विचार करावा लागतो. कारण अनेक देशांमध्ये आरोग्य आणि आयुर्विमा ???????????????विमा????????????? सरकारी योजनेअंतर्गत पुरवला जातो, पण दुसऱ्या देशात तो कदाचित विकत घ्यावा लागेल. शिवाय निवृत्ती निधीसुद्धा त्या देशात जमा होत असतो. आपल्या देशात परत यायच्या किंवा दुसऱ्या देशात जायच्या आधी विम्याचा प्रश्न, दोन्ही देशांतील करदायित्व, निवृत्ती निधी, स्थावर मालमत्ता आणि इतर गुंतवणुकीबद्दल निर्णय किमान एक-दोन वर्षं आधी घ्यावे लागतात. हे सर्व अजिबात सोप्पं नाहीये. पुढे मुलांच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा विचार करावा लागतो, कारण हे खर्च प्रत्येक देश आणि तेथील शिक्षणाच्या सुविधांवर अवलंबून असतात. पुढे निवृत्तीनंतर लागणारं सामाजिक आयुष्यसुद्धा महत्त्वाचं असतं. तेव्हा कोणत्या देशात आपण उरलेलं आयुष्य घालवायचं हे ठरवायच्य
४. आपत्कालीन निधीमध्ये वाढ – साधारणपणे ४-६ महिन्यांचा निधी आपण अचानक उद्भवलेल्या खर्चांसाठी जवळ बाळगतो. परंतु मिळकतीसंदर्भात साशंकता वाढल्यास हा निधी १२ महिन्यांसाठी तयार करावा. आपल्या गुंतवणुकीतील जोखीम कमी करावी. पुढे नियमित मिळकत सुरू झाल्यास किंवा व्यवसायाचा जम चांगला बसल्यास परत आपत्कालीन निधी कमी आणि जोखीम जास्त करता येईल. परंतु तोवर हाताशी सुरक्षित पैसे बाळगावे.
५. कुटुंबातील वयस्कर सदस्यांचे अवलंबित्व – अनेकदा असंसुद्धा होतं की, कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांची सोय करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. दोन्ही नवरा-बायको नोकरी करत असतील तर घरी कोणीतरी पूर्णवेळ सांभाळ करायला माणूस ठेवावा लागतो. किंवा एकाला तरी तडजोड करावी लागते. हवी तशी बदली किंवा बढती घेता येत नाही. आहे ती नोकरी गेली तर कामाच्या ठिकाणी मिळालेलं आरोग्य विमा कवच पुढे मिळत नाही. त्यामुळे आपत्कालीन निधी जास्त ठेवावा लागतो. खर्च वाढून, गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होतो. इथे कधी कधी आर्थिकपेक्षा भावनिक त्रास जास्त होतो. तेव्हा ही बाजू सांभाळताना जास्त समजूतदारपणा असायला लागतो.
साधारणपणे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलंच असेल की, मध्यावयात होणारे बदल हे भावनिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असतात. त्यातून साजेलसा मार्ग काढता यावा यासाठी पूर्वतयारी चांगलीच करायला लागते. तेव्हा सर्व बाजूने, सारासार विचार करून घेतलेले निर्णय अशा कठीण परिस्थितीतून आयुष्यात पुढे जायला नक्की मदत करतील.
तृप्ती राणे
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.