Motor Vehicle Insurance मोटार व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय व त्याचे किती प्रकार आहेत ?अलीकडे वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या जशी वाढली आहे, तशीच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे. अशा वेळेस आपल्या वाहनाच्या आणि आपल्याही सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी व नुकसान टाळण्यासाठी मोटार वाहन विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो. या संदर्भातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे-

प्रश्न १: मोटार व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय व त्याचे किती प्रकार आहेत ?

मोटार व्हेईकल इन्शुरन्स हा वाहन मालक व इन्शुरन्स कंपनी यांच्यातील एक करार असून यामुळे आपल्या वाहनाच्या अपघात, चोरी यासारख्या घटनांनी होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई पॉलिसीमधील अटी व शर्ती नुसार वाहन मालक असलेल्या पॉलिसीधारकास इन्शुरन्स कंपनीकडून दिली जाते. आपल्याला वाहनाच्या किमतीनुसार वार्षिक प्रीमियम मात्र त्यासाठी भरावा लागतो.

मोटार इन्शुरन्सचे खालील दोन प्रकार आहेत

  • थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स: हा मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार अनिवार्य आहे. 
  • हा तुमच्या वाहनामुळे इतरांच्या मालमत्तेचे किंवा जीविताचे नुकसान झाल्यास भरपाई देतो.
  • कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स (सर्वसमावेशक विमा): हा थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबतच तुमच्या वाहनाचे स्वतःचे
  • नुकसान, चोरी, आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून संरक्षण करतो.
Court on motor insurance compensation
निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू झाल्यास विमा संरक्षण मिळणार नाही – सर्वोच्च न्यायालय (प्रातिनिधिक छायाचित्र)

प्रश्न २: इलेक्ट्रिक वाहनासाठीची मोटार व्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी कशी असते?

२०२४-२५ पासून बॅटरीच्या क्षमतेनुसार प्रीमियम आकारला जाणार आहे. त्यानुसार थर्ड पार्टी कार इन्शुरन्स प्रीमियम ३० किलोवॅट क्षमतेच्या वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.१७८०, तर ३० ते ६५ किलोवॅट क्षमतेच्या वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.२९०४ असेल व ६५ किलोवॅट क्षमतेवरील वाहनासाठी वार्षिक प्रीमियम रु.६७१२ इतका असेल. इलेक्ट्रिक वाहनच्या इन्शुरन्समध्ये प्रामुख्याने बॅटरी, तसेच अन्य इलेक्ट्रिक पार्टस, बॅटरीचार्जिंग स्टेशन, सबंधित अक्सेसरीज यांचा समावेश असतो. याशिवाय अन्य बाबी म्हणजे चोरी, अपघात, नैसर्गिक आपत्ती यातून होणारे नुकसान तसेच थर्ड पार्टी क्लेम यांचाही समावेश असतो.

प्रश्न ३ :क्लेम नाकारला जाण्याची प्रमुख करणे काय असतात?

  • 1) वाहक विना परवाना गाडी चालवत असेल तर…
  • 2) वाहन परवाना आहे परंतु तो त्या प्रकारच्या वाहनास लागू नव्हता. (उदा: दुचाकीचा परवाना असताना कार,ट्रक, ट्रॅक्टर यासारखे वाहन चालविताना झालेला अपघातादी)
  • 3) वाहन चालक वाहन चालविताना मद्य किंवा अन्य अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत असल्यास
  • 4) वाहनाचा कुठल्याही प्रकारच्या गैरवापर होत असताना (बेकायदेशीर कारणासाठी वापर होत होता असे आढळल्यास )

प्रश्न४: मोटारव्हेईकल इन्शुरन्स पॉलिसी घेताना प्रामुख्याने कोणत्या बाबी गोष्टी विचारात घ्याव्यात?

  • 1) आपण जे इन्शुरन्स कव्हर घेत आहोत ते समजून घ्या त्यात समाविष्ट असलेल्या व नसलेल्या बाबी काय आहेत ते पहा व त्यानुसार पॉलिसी योग्य व आपल्या सोयीची आहे हे पाहूनच पॉलिसी घ्या. गाडी विक्रेता देत असलेली पॉलिसीच घेतली पाहिजे असे नाही. आपण स्वतंत्रपणे आपल्याला हव्या त्या इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेऊ शकता. शक्य तोवर कॉम्प्रिहेनसीव्ह इन्शुरन्स पॉलिसीच घ्या. केवळ प्रीमियम कमी आहे म्हणून फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घेऊ नका. आपल्याला जर नजिकच्या काळात गाडी विकायची असेल तरच थर्ड पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घ्या.
  • 2) आयडीव्ही (इंस्युर्ड डीक्लेअर्ड व्हॅल्यू ) संकल्पना समजून घ्या. या आयडीव्हीनुसार प्रीमियम लागू होत असतो. योग्य त्या आयडीव्हीची पॉलिसी घ्या .
  • 3) नो क्लेम बोनस समजून घ्या. अशा किरकोळ दुरुस्तीसाठी क्लेम करू नका की, ज्यामुळे नो क्लेम बोनस मिळणार नाही.
  • 4) पॉलिसीसोबत मिळणारे अतिरिक्त (अॅडऑन) आवश्यकतेनुसारच घ्या.
  • 5) स्वेछा कपात (व्हॉलंटरी डीडक्टेबल ) म्हणजे काय ते समजून घ्या. त्यानुसार प्रीमियम कमी- अधिक होत असतो. झीरो डीडक्टेबल पर्याय निवडल्यास प्रीमियम वाढतो हे लक्षात घ्या.

प्रश्न५: इन्शुरन्स क्लेम कसा करावा? 

  • विमा कंपनीला अपघाताची किंवा नुकसानाची वाहन चोरीची माहिती त्वरित द्या.
  • पोलीस एफआयआरची प्रत क्लेमसोबत आवश्यक असल्यास जोडावी .
  • विमा कंपनीच्या मागणीप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करा.
  • विमा कंपनीचा निरीक्षक वाहनाची पाहणी करेल आणि नुकसानीचा अंदाज घेईल.