scorecardresearch

Premium

विमा क्षेत्रात ग्राहकाभिमुखतेचे नवयुग

आगामी दशक भारताच्या विमा क्षेत्राच्या दमदार वाढीचे असेल, इतकेच नव्हे तर जगातील ६ वी सर्वात मोठी विमा बाजारपेठ भारताची असेल.

Customer Orientation Insurance Sector
विमा क्षेत्रात ग्राहकाभिमुखतेचे नवयुग (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

– अनुप सेठ

आगामी दशक भारताच्या विमा क्षेत्राच्या दमदार वाढीचे असेल, इतकेच नव्हे तर जगातील ६ वी सर्वात मोठी विमा बाजारपेठ भारताची असेल. अर्थव्यवस्थेतील गतिमान वाढीचे वातावरण, वाढते दरडोई उत्पन्न आणि अनुकूल नियमन या त्रिसूत्रीमुळे येत्या काही वर्षांत हे क्षेत्र चांगली गती पकडताना दिसेल.

Persistent, IT company, Anand deshpande
वर्धानपनदिन विशेष : पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्राचे रूप पालटणारा ‘आनंद’
china, electric vehicle, build your dreams, BYD motors, elon musk, Tesla
चिनी ‘बीवायडी’ मोटर्सने हादरवले ‘टेस्ला’चे साम्राज्य! जगात अव्वल, लवकरच भारतात…
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता
Munia Conservation Reserve
मुनिया संवर्धन राखीव क्षेत्रात कोळ्याच्या तब्बल ४६ प्रजाती

निकटच्या काळात अनेक प्रवाह सकारात्मकता दर्शवतात, पण उल्लेखनीय बाब अशी की नुकत्याच वितरणासंबंधी नियमांमध्ये सुलभता आणली गेल्याचा या क्षेत्रावर चांगला परिणाम दिसून येईल. नियामकांनी ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ हा दृष्टिकोन राखून अनेक उपायांची घोषणा केली आहे. त्यातून सुकर झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे विमा कंपन्यांना कॉर्पोरेट एजंट्स नेमण्याची कमाल मर्यादा ३ वरून ९ पर्यंत वाढवली गेली आहे. या निर्णयामुळे बँकअश्युरन्स क्षेत्रात मोठे बदल घडतील आणि या क्षेत्रात ग्राहकाभिमुखतेच्या नव्या युगाचा प्रारंभ होईल.

हेही वाचा – दिव्याखाली अंधार

येऊ घातलेले महत्त्वपूर्ण बदल खालीलप्रमाणे आहेत :

१. बँकिंग क्षेत्राच्या वाढीस चालना : नवीन निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या वितरणास चालना मिळेलच, पण बरोबरीने बँकिंग क्षेत्राच्या वाढीसही चालना मिळू शकेल. बँकांचे विमा विक्रीमुळे होणारे उत्पन्न वाढेलच पण आता बँका त्यांच्या ग्राहकांच्या बदलणाऱ्या गरजांनुसार त्यांना विविधांगी उपाययोजना प्रदान करू शकतील. बहुविध भागीदारीमुळे बँकांना निवडीचे व्यापक स्वातंत्र्य तर मिळेलच पण बँका आता ग्राहकांना सर्वसमावेशक वित्तीय सल्लामसलतीची सेवा सक्षमपणे देऊ शकतील. डिजिटल बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड ग्राहक इत्यादीसारख्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या गरजा समजून घेता येतील व व्यवसायात वाढीचे नवीन मार्गही त्यांना सापडतील. वैयक्तिकीकृत विम्याचे उपाय वेगवेगळ्या ग्राहकांना प्रदान करण्यासाठी बँका आता विमा भागीदारांना सांगू शकतील.

२. स्पर्धात्मकतेला चालना :

अधिक कंपन्यांबरोबर भागीदारी करणे शक्य झाल्यामुळे बँकअश्युरन्स क्षेत्र हे अधिक स्पर्धात्मक बनेल. परिणामी विशेषकरून ज्यांच्या उत्पादनांचा प्रसार बँकेकडून केला जात नाही अथवा बँकेद्वारे प्रवर्तित नसलेल्या काही विमा कंपन्या आता भविष्यात चांगले काम करू शकतील. उत्पादनातील नावीन्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीच्या आधुनिक कंपन्यांना त्यामुळे वाव निर्माण होऊ शकेल.

३. ग्राहक हाच राजा :

भारताचा भौगोलिक विस्तार पाहता, इच्छित ग्राहकांपर्यंत पोहोचता येणे ही विमा क्षेत्राला भेडसावणारी मोठी समस्या आहे. बँकांकडे वितरणासाठी आवश्यक सुविधांचे जाळे असते, परिणामी ते अगदी दुर्गम भागातही विमा कंपनीच्या वतीने पोहोचू शकतात. त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा ग्राहकवर्ग असतो, जो त्याची बचत गुंतवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात. आता अधिकाधिक विमा कंपन्यांशी भागीदारी करणे शक्य झाल्याने बँकांना आता त्याचा उपयोग करून अधिक चांगली नावीन्यपूर्ण उत्पादने ही ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजांनुसार त्यांना उपलब्ध करून देऊ शकतील. भागीदारांमधील या वैविध्यामुळे विमा कंपन्याही आपली उत्पादने सर्वसमावेशक बनवून ग्राहकांना समग्रतेचा अनुभव मिळवून देऊ शकतील.

हेही वाचा – ‘एमएसएमई व्यवसायांना मागणी निर्माण करण्याकडेही कल हवा’; शचिंद्र नाथ, कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

४. बँकांच्या सल्लागार भूमिकेचा कायापालट :

प्रत्येक ग्राहकाचे त्याचे शिक्षण, सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी यानुसार गरजाही वेगवेगळ्या असतात. त्यांच्या आर्थिक प्राधान्यक्रमानुसार, विमा सुरक्षेच्या गरजाही बदलतात. उदाहरणार्थ काही ग्राहकांना ‘मायक्रो इन्शुरन्स’ उत्पादने हवी असतात. त्यामुळे बँकांना आता त्यांच्या भागीदारांचे विशिष्ट उत्पादन विभागातील विशेष कौशल्याचा वापर करून आपल्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजांच्या पूर्ततेसाठी चोखंदळपणे निवड करता येऊ शकेल.

५. अंतिम फलितात सुयश :

संरचनेत खुलेपणा आणि लवचीकतेतून एकंदर क्षेत्राला कसा लाभ मिळतो हे बहारदार कामगिरी सुरू असलेल्या म्युच्युअल फंड बाजारपेठेने दाखवून दिले आहे. कारण हे क्षेत्र सल्लागारांवर खूपच अवलंबून होते. म्युच्युअल फंड व्यवसायात वाणिज्य बँकांनी पदार्पण केल्यानंतर या बाजारपेठेने मोठी झेप घेतल्याचे दिसून आले. मोठा प्रस्थापित ग्राहकवर्ग असल्यामुळे बँकांना म्युच्युअल फंड उत्पादनेही अधिक मोठ्या वर्गापर्यंत नेणे शक्य झाले. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांबद्दल जागरूकता मोठ्या प्रमाणावर वाढलीच पण याचा बँकांनासुद्धा ग्राहकांची बचत वळवण्यासाठी आकर्षक लाभदायी आणि गुणात्मक पर्याय प्राप्त झाला. साधारणपणे भारतीय पगारदार वर्ग हा त्याच्या उत्पन्नापैकी २५-३० टक्के रक्कम ही वित्तीय उत्पादनांमध्ये गुंतवण्यावर भर देतो. यातून आयुर्विमा उत्पादनांना वाढीसाठी चांगली संधी आहे असे अधोरेखित होते. करोना महासाथीने विम्याचे सुरक्षा कवच किती गरजेचे आहे, याची प्रत्येकाला जाणीव करून दिली. आता जसजशा विमा कंपन्या त्यांचे वितरण जाळे वाढवत आहेत तसतसा ते नवनवीन ग्राहकांपर्यंत त्यांची पोहोचही वाढीस लागेल. विशेषकरून लहान कंपन्यांना स्पर्धेचा सामना आता एकसमान नियम व आखाड्यावर करता येईल आणि त्यांच्या ग्राहकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करता येतील.

(लेखक एडेल्वाइस टोक्यो लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New era of customer orientation in insurance sector ssb

First published on: 09-04-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×