निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंडाने (पूर्वाश्रमीचे नाव निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड) ८ ऑक्टोबर १९९५ रोजी पहिली ‘एनएव्ही’ जाहीर केली होती, पुढील बुधवारी हा फंड अस्तित्वात येऊन ३० वर्षे पूर्ण होत आहेत. याच वर्षी ‘क्रिसिल’ने म्युच्युअल फंड मानांकन (सीएमएफआर) जाहीर करायला सुरुवात केली. १२० तिमाहीत सर्वाधिक वेळा ‘टॉप क्वारटाइल’मध्ये राहण्याचा विक्रम निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंडाच्या नावे आहे. ऑगस्ट २०२५ च्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी फंडाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ३८,३६९ कोटींवर पोहोचली आहे.
या योजनेचे उद्दिष्ट मिडकॅप कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली नफा मिळविणे हे आहे. तत्कालीन रिलायन्स म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती लाभली त्यात निप्पॉन इंडिया ग्रोथ आणि निप्पॉन इंडिया व्हिजन (लार्ज अँड मिडकॅप) या दोन फंडांचा सिंहाचा वाटा आहे. फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा ३० वर्षांपैकी १४ वर्षे सुनील सिंघानिया यांच्याकडे होती.
त्यानंतर फंड घराण्याने निधी व्यवस्थापक म्हणून मनीष गुनवाणी यांना नियुक्त केले. हे दोघेही फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी होते. जानेवारी २०२३ पासून फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून रुपेश पटेल पाहत आहेत. निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंडाने एक, दोन, तीन, पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस आणि तीस वर्षांच्या कालावधीत मानदंड निफ्टी मिडकॅप १५० टोटल रिटर्न इंडेक्स, परताव्याला लीलया मागे टाकले आहे. १ ऑक्टोबर २००५ ते २६ सप्टेंबर २०२५ या वीस वर्षांत फंडात १०,००० ची ‘एसआयपी’ करणाऱ्याच्या २४ लाखांच्या गुंतवणुकीचे १.७४ कोटी झाले आहेत. वार्षिक परताव्याचा दर १७.२० टक्के आहे. म्हणूनच दीर्घकालीन पद्धतशीर गुंतवणुकीसाठी (एसआयपी) या फंडाला चाणाक्ष गुंतवणूकदार पसंती देतात. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने ३० वर्षांच्या इतिहासात २२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
विद्यमान निधी व्यवस्थापक रुपेश पटेल यांच्या कारकीर्दीत १ जानेवारी २०२३ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत २६.४७ टक्के वार्षिक परतावा दिला आहे, तर याच कालावधीतील ‘एसआयपी’ वार्षिक परतावा २१.२० टक्के आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड, एक मिड-कॅप फंड गटात एक वेगाने संपत्ती निर्मिती करणारा फंड राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत (१ ऑक्टोबर २०२२ ते २६ सप्टेंबर २०२५) या २५.१४ टक्के आणि पाच वर्षांत (१ ऑक्टोबर २०२० ते २६ सप्टेंबर २०२५) २९.२१ टक्के वार्षिक परतावा दिलेला फंड आहे. हा देदीप्यमान परतावा देण्यास ज्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यापैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुनील सिंघानिया यांच्या नंतर रुपेश पटेल यांच्यासारख्या कसबी निधी व्यवस्थापकाकडे या फंडाची सूत्रे आली.
हा फंड ‘बॉटम अप’ रणनीतीचा अवलंब करणारा फंड आहे. करोनापश्चात मिड-कॅप कंपन्यांत उपलब्ध गुंतवणुकीच्या अनेक अद्वितीय संधींचा लाभ घेतला. करोनापश्चात फंडाने दोन उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. पहिले म्हणजे ग्राहक विवेकाधिकार क्षेत्र, तसेच थेट ग्राहकांशी संबंधित व्यवसायांना (बी२सी) निधी व्यवस्थापकांनी पसंती दिल्याचे दिसते. (बीएसई, व्होल्टास, विशाल मेगामार्ट) तसेच ज्या क्षेत्रात वाढ ‘प्रीमियमायझेशन’मुळे येऊ शकते, असे व्यवसाय (वन ९७ कम्युनिकेशन, प्रेस्टीज इस्टेट, आयसीआयसीआय लोम्बार्ड, इन्फोएज) मुख्यत: नवतंत्रज्ञान कंपन्या आहेत.
फंडाच्या उत्तम कामगिरीला कारण ठरलेला एक व्यवसाय म्हणजे रुग्णालये. सातत्याने नफ्यात होणारी वाढ होत असल्याने (अपोलो हॉस्पिटल, आर्टेमिस मेडिकेअर, आश्का हॉस्पिटल्स, आत्मज हेल्थकेअर, अमांता हेल्थकेअर) या कंपन्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. बाजार मंच, ब्रोकर आणि विमा कंपन्यांशी वित्तीय सेवा क्षेत्रात कर्ज देण्याच्या क्षेत्रात नसलेल्या कंपन्या हा आणखी एक व्यवसाय ज्यावर निधी व्यवस्थापक परताव्यासाठी निर्भर असल्याचे दिसते. फंडाच्या पोर्टफोलिओत बीएसई आणि चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या गुंतवणुका आहेत. निधी व्यवस्थापकांनी अतिशय वैविध्यपूर्ण परंतु जोखीम सुव्यवस्थापित करणारा पोर्टफोलिओ बनविला आहे. निधी व्यवस्थापकांनी कधीही गुंतवणुकीचे ध्रुवीकरण केले नाही. निधी व्यवस्थापक मूल्यांकनाबद्दल खूप जागरूक असल्याचे दिसते.
आज, मूल्यांकनाच्या बाबतीत मिड-कॅप शेअर सर्वात महाग आहेत. ‘निफ्टी मिडकॅप १५०’ निर्देशांक मूल्याच्या ३५ पटींत (पीई) व्यवहार करत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे मूल्यांकन खूपच महाग आहे. परंतु याला अनेक सकारात्मक पैलू आहेत. समष्टी अर्थशास्त्राच्या दृष्टीने वातावरण सकारात्मक आहे. वित्तीय तुटीची चिंता करावी, अशी परिस्थिती नाही.
चलनविषयक धोरणे, बँकांचे आणि कंपन्यांचे ताळेबंद सुदृढ असणे, कंपन्यांच्या मूल्यांकनात प्रतिबिंबित होत आहे. कंपन्यांच्या कमाईत वाढ न झाल्यास तात्पुरती मोठी घसरण संभवते. वाजवी मूल्यापेक्षा सध्याचे मूल्यांकन जास्त असल्याने नवीन गुंतवणूक किमान ७ वर्षे राखून ठेवण्याच्या उद्देशाने केली पाहिजे. परंतु निर्देशांकाच्या मूल्यांकनाबाबत चिंता न करता निधी व्यवस्थापक त्यांची गुंतवणूक असलेल्या प्रत्येक व्यवसायाच्या गुणवत्ता, वाढीच्या संधी आणि जोखीम-परतावा गुणोत्तराच्या दृष्टीने पाहात असल्याने जवळच्या काळातील मूल्यांकनापेक्षा दूरच्या कमाईच्या संधींवर (फॉरवर्ड पीई) पाहत असल्याचे दिसते.
मागील पाच वर्षांत पोर्टफोलिओमध्ये मिडकॅप कंपन्यांचा सरासरी वाटा ६६.२७ टक्के, तर लार्जकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे १८.६८ टक्के आणि १२.४८ टक्के होता. फंडाच्या पोर्टफोलिओत १९ उद्योग क्षेत्रे आहेत. वित्तीय सेवांमध्ये सर्वात जास्त वाटप (२४.१९ टक्के), त्यानंतर भांडवली वस्तू (११.६८ टक्के), आरोग्य सेवा (१०.९२ टक्के), ग्राहक सेवा (९.०६ टक्के) आणि वाहन आणि वाहनपूरक व्यवसाय (६.३४ टक्के) यांचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी १५० कंपन्या असतात. यापैकी ४६ कंपन्या (पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, चोलामंडलम फायनान्शियल होल्डिंग्ज, वरुण बेव्हरेजेस आणि बीएसई) पाच वर्षांपेक्षा जुन्या आहेत.
हल्ली ‘हिडन जेम’ हा परवलीचा शब्द झाला आहे. परंतु हा फंडसुद्धा एका अर्थाने ‘हिडन जेम’ आहे. कारण सर्वात मोठी ‘एनएव्ही’ असल्याने कमी युनिट मिळतील, या गैरसमजामुळे या फंडात गुंतवणूक करत नाहीत. हा फंड सर्वात वेगाने संपत्तीनिर्मिती केलेला फंड आहे. म्हणून या फंडाची ‘एनएव्ही’ जास्त आहे. नवरात्रात देवीची वेगवेगळ्या रूपांत पूजा केली जाते. नवरात्रीतला आजचा दिवस महालक्ष्मी पूजनाचा या निमित्ताने महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभलेल्या या फंडाची ही शिफारस.
(वार्षिक परतावा २६ सप्टेंबर २०२५ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार)