महारत्न दर्जा प्राप्त, एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) लिमिटेड ही सरकारी कंपनी आपल्या उपकंपन्या/सहयोगी आणि संयुक्त उपक्रमांसह प्रामुख्याने राज्य वीज कंपन्यांना मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती आणि विक्री करते. एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी असून ती गेल्या पाच दशकांहून अधिक काळ विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या ऊर्जेसह देशाच्या विकासाला चालना देत आहे. पन्नास वर्षांपूर्वी (१९७५) स्थापन झालेली एनटीपीसी औष्णिक ऊर्जा जनरेटरपासून वैविध्यपूर्ण ऊर्जा कंपनीमध्ये विकसित झाली आहे. कंपनी पारंपरिक आणि अक्षय्य ऊर्जा उत्पादनापासून कोळसा खाणकाम, वीज व्यापार, ई-मोबिलिटी आणि ग्रीन हायड्रोजनपर्यंत संपूर्ण मूल्य साखळीत कार्यरत आहे.
व्यवसाय विभाग
- वीजनिर्मिती: एनटीपीसी भारतातील सर्वात मोठी वीजनिर्मिती कंपनी असून कंपनीची एकूण स्थापित क्षमता ७६,५९८ मेगावाॅट आहे, जी देशाच्या एकूण क्षमतेच्या ~१७ टक्के आणि एकूण वीजनिर्मितीच्या २४ टक्के आहे.
- इतर: एनटीपीसी समूहाच्या इतर व्यवसायांमध्ये सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण, ऊर्जा व्यापार, तेल आणि वायू शोध आणि कोळसा खाणकाम यांचा समावेश आहे.
अणुऊर्जा व्यवसाय
कंपनी तिच्या स्वच्छ ऊर्जा (क्लीन एनर्जी) उद्दिष्टासाठी अणुऊर्जेत प्रवेश करत आहे. त्यासाठी कंपनी अणुप्रकल्प विकसित करण्यासाठी २,८०० मेगावाॅटचा अश्विनी, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत एक संयुक्त उपक्रम राबवत असून, एनटीपीसी भारतीय परमाणू ऊर्जा निगम, ही पूर्ण मालकीची उपकंपनी, त्यांच्या व्यापक अणुऊर्जा प्रयत्नांवर देखरेख करण्यासाठी स्थापन केली आहे.
ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी कंपनीने कोल इंडियासोबत २१४.४५ एमएमटी आणि सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेडसोबत २७.९९ एमएमटी इंधनपुरवठा करार केले आहेत, जे २० वर्षांसाठी वैध आहेत. तसेच एनटीपीसीचे गेलसोबत दीर्घकालीन गॅसपुरवठा करार आहेत, जे जुलै २०२६ पर्यंत वैध आहेत, तसेच १.३६ एमएमसीएमडी रीगॅसिफाइड एलएनजीचा पुरवठा आहे.
मार्च २०२५ मध्ये, एनटीपीसी समूहाने छत्तीसगडमध्ये अनेक सामंजस्य करारांद्वारे ९६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये, जागतिक गुंतवणूकदार शीखर परिषदेत मध्य प्रदेश सरकारसोबत अनेक सामंजस्य करार केले, ज्यामध्ये २० गिगावाॅट क्षमतेच्या अक्षय्य ऊर्जा प्रकल्प, ८०,००० कोटी रुपये नॉन-फॉसिल इंधन वीज प्रकल्पांसाठी आणि ४,००० कोटी रुपये आणि ८०० मेगावाॅट क्षमतेच्या पंपयुक्त जलसाठा प्रकल्पाचा समावेश आहे.
कंपनीने सप्टेंबर २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीत ४४,७८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५,०६९ कोटींचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो केवळ ३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीची ऊर्जा उत्पादन क्षमता १० टक्क्यांनी वाढून ८३,८९३ मेगावाॅटवर पोहोचली आहे. तर सहमाहीच्या नफ्यात १० टक्के वाढ होऊन तो १०,८० कोटींवर गेला आहे. कंपनी २०३२ पर्यंत ६० गिगावाॅट अक्षय्य ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवून आणि अणुऊर्जा, बॅटरी ऊर्जा साठवणूक, कार्बन कॅप्चर आणि ग्रीन केमिकल्स यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात गुंतवणूक करून शाश्वत भविष्याकडे वाटचाल करत आहे. सध्या ३३० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेली एनटीपीसी एक प्रदीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
माझा पोर्टफोलिओ
- एनटीपीसी लिमिटेड (बीएसई कोड ५३२५५५)
- प्रवर्तक: भारत सरकार
- वेबसाइट: http://www.ntpc.co.in
- बाजारभाव: रु.३२८ /-
- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: थर्मल पॉवर
- भरणा झालेले भाग भांडवल: रु. ९६९६.६७ कोटी
- शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
- प्रवर्तक ५१.१०
- परदेशी गुंतवणूकदार १६.४०
- बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २९.९३
- इतर/ जनता ३.५७
- पुस्तकी मूल्य: रु. १९०
- दर्शनी मूल्य: रु.१०/-
- लाभांश: ८४%
- प्रति समभाग उत्पन्न: रु. २४.४९
- किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३.४
- समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८.६
- डेट इक्विटी गुणोत्तर: १.३६
- इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३.४७
- रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लाॅइड (ROCE): ९.९५
- बीटा : १.१
- बाजार भांडवल: रु. ३१८,१९५ कोटी (लार्ज कॅप)
- वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३८५/२९३
- गुंतवणूक कालावधी: २४ महिने
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
