वर्ष १९४४ मध्ये स्थापन झालेली एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड (पूर्वाश्रमीची एस्कॉर्ट्स लिमिटेड) ही भारतातील आघाडीच्या अभियांत्रिकी समूहांपैकी एक असून कंपनी कृषी-यंत्रसामग्री, बांधकाम, साहित्य हाताळणी उपकरणे आणि रेल्वेशी संबंधित उपकरणे तयार करते. वर्ष २०२० मध्ये कंपनीने जपानच्या कुबोटाबरोबर भागीदारी केली. कुबोटाने एस्कॉर्ट्समधील १० टक्के हिस्सा घेतला. सध्या कुबोटाचा हिस्सा ५४.०७ टक्के आहे. गेल्याच वर्षी कंपनीने आपल्या उत्पादनांना आणि व्यवसायाला पूरक म्हणून एस्कॉर्ट कुबोटा फायनान्स लिमिटेड, या वित्तीय कंपनीची स्थापना केली आहे.
कुबोटाच्या सहकार्याने कंपनीने देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत वाढीच्या आकांक्षेसाठी धोरणात्मक दिशानिर्देशांबद्दल मध्यावधी व्यवसाय योजना तयार केली आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट २०२८ पर्यंत महसूल २.५ पट वाढवणे आहे. योजनेअंतर्गत, कंपनी कुबोटा, फार्मट्रॅक आणि पॉवरट्रॅक या तीन नाममुद्रांच्या ट्रॅक्टरसाठी उत्पादने डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी जागतिक संशोधन आणि विकास केंद्र तयार करण्यात गुंतवणूक करेल.
व्यवसाय विभाग
१) कृषी यंत्रसामग्री: या विभागाअंतर्गत उत्पादनांमध्ये ट्रॅक्टर, इंजिन, अवजारे, सुटे भाग आणि ल्युब्स यांचा समावेश आहे.
२) बांधकाम उपकरणे : मटेरियल हाताळणी, रोड कॉम्पॅक्शन आणि अर्थ मूव्हिंग इक्विपमेंटमधील व्यापार.
कंपनीचा देशांतर्गत ट्रॅक्टर बाजारात सुमारे १२ टक्के वाटा असून निर्यात ट्रॅक्टर बाजारपेठेत त्यांचा वाटा ५ टक्के आहे. बांधकाम उपकरणांच्या क्षेत्रात, क्रेनच्या उत्पादनात त्यांचा वाटा ४० टक्के तर कॉम्पॅक्टरच्या उत्पादनात त्यांचा वाटा सुमारे ८ टक्के आहे.
उत्पादन सुविधा
कृषी यंत्रसामग्री: कंपनीचे एकूण पाच उत्पादन प्रकल्प असून त्यातील तीन फरिदाबाद, हरियाणा येथे आहेत. ज्यांची एकूण स्थापित क्षमता १,२०,००० युनिट आहे. एक प्रकल्प पोलंडमध्ये असून त्याची वार्षिक उत्पादन क्षमता २,५०० युनिट आहे. तर भारतात एक संयुक्त उपक्रम असून त्याची वार्षिक स्थापित क्षमता ५०,००० ट्रॅक्टर आहे.
बांधकाम उपकरणे: कंपनीचा हरियाणातील बल्लभगड येथे प्रकल्प आहे, ज्याची वार्षिक क्षमता १०,००० युनिट आहे.
रेल्वे उपकरण विभाग: त्यांचा हरियाणातील फरीदाबाद येथे १ प्रकल्प आहे.
भांडवली खर्च: कंपनी ट्रॅक्टरची क्षमता दुप्पट करण्यासाठी, इंजिन आणि उपकरण बांधणीसाठी राजस्थानमध्ये एक मोठा प्रकल्प उभारत आहे. कंपनीची आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत दरवर्षी ३ लाख ट्रॅक्टरपर्यंत उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आहे. ज्यामध्ये वार्षिक ३५०-४०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च योजना आहे.
कार्यादेश
आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत, कंपनीकडे रेल्वे उपकरण विभागात ९०० कोटी रुपयांचे कार्यादेश होते.
नवीन उत्पादने
गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने रेल्वे विभागांतर्गत तीन नवीन उत्पादने सादर केली आहेत, ज्यात इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल आणि मेट्रो कोचसाठी ब्रेक पॅड आणि वंदे भारत कोचसाठी डँपर यांचा समावेश आहे. कंपनी इलेक्ट्रिक वाहन बाजार, उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक आणि क्षमता निर्माण करत आहे.
कंपनीचे जून २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने यंदाच्या तिमाहीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने २,५०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३६९ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १८ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्याच तिमाहीत कंपनीने आपली रेल्वे ईक्विपमेंट डिव्हिजन सोना कॉमस्टारला १,६०० कोटी रुपयांना विकले आहे. याचा कंपनीला फायदाच होईल.
उत्तम उत्पादनांचा मोठा पोर्टफोलियो, अनुभवी प्रवर्तक आणि कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी गुंतवणुकीस आकर्षक वाटते. सध्या ३,३५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड (बीएसई कोड ५००४९५)
वेबसाइट: www.escortskubota.com
प्रवर्तक: कुबोटा कार्पोरेशन, जपान
बाजारभाव: रु. ३,३५०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ट्रॅक्टर, शेती अवजारे, बांधकाम उपकरणे
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १११.८८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६८.०४
परदेशी गुंतवणूकदार ५.२२
बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ११.४३
इतर/ जनता १५.३१
पुस्तकी मूल्य: रु. ९२७
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: २८०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ११३
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४०.८
डेट इक्विटि गुणोत्तर: ०.०१
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ६४.२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १३.६%
बीटा: १
बाजार भांडवल: रु. ३७,४७९ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४,४२२/२,२७६
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
• हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
Stocksandwealth@gmail.com